गावाच्या शाळेतूनच घडतो उज्वल भविष्याचा पाया - प्रितम रामटेके.
गुरुवार, 5 फ़रवरी 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी
गोंदिया :- अर्जुनी मोर तालुक्यातील ग्राम धमदीटोला (अरततोडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भव्य सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रितम रामटेके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना प्रितम रामटेके म्हणाले की, "गावाची शाळा म्हणजे गावाच्या प्रगतीचा कणा आहे. काळाची गरज ओळखून 'गावची शाळा, माझी शाळा' या भावनेतून ग्रामस्थांनी शाळेशी आपुलकी जपली पाहिजे. बालवयात मिळणारे संस्कार व शिक्षण हे आयुष्याची दिशा ठरवतात. त्यामुळे बालकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्या गावातील शाळेमधूनच मिळाले पाहिजे. गावची शाळा टिकवणे व बळकट करणे यातच ग्रामस्थांचे खरे हित सामावलेले आहे."ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांमध्ये अपार गुणवत्ता दडलेली असून योग्य शिक्षण, मार्गदर्शन व संधी मिळाल्यास हीच मुले भविष्यात डॉक्टर, अभियंते, प्रशासक व समाजसेवक म्हणून
देशाची सेवा करू शकतात. यासाठी
शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुनेर सोनटप्पर, झानेश्वर गेडाम, हरिश्चंद्र उईके, लोकेश गोपाल्लीवार सर, अरुण उईके सर, शेठूलाल पालीवाल, उद्धव दुधकवर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही आपल्या भाषणातून थोर प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत शाळा टिकवण्यासाठी ग्रामस्तरावर एकजूट होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला
समाजसुधारक, भारतीयराज्यघटनेचे
शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान
करण्यात आला. या सत्कारामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे शिक्षकांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य, नाटिका व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून व्यक्त उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला ग्रामस्थांकडून भरभरून दादमिळाली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, वक्तृत्वकला, सृजनशीलता व सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षकवृंदांनी केले तर उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये शाळेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून गावची शाळा टिकवण्याचा संकल्प अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.
0 Response to "गावाच्या शाळेतूनच घडतो उज्वल भविष्याचा पाया - प्रितम रामटेके."
एक टिप्पणी भेजें