ग्रामसेवकाचा पत्रकारावर हल्ला, ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल लाखनी येथील घटना.
सोमवार, 2 फ़रवरी 2026
Comment
साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होण्याचे सत्र थांबताना दिसत नाहीये. लाखनी येथे एका ज्येष्ठ पत्रकारावर ग्रामसेवकाने जातीवाचक शिवीगाळ करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंचायत समिती परिसरातील सार्वजनिक ठिकाणी भरदिवसा हा प्रकार घडल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली असून, प्रशासकीय वर्तुळातील मुजोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी आरोपी ग्रामसेवक हेमंत पब्बेवार याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पत्रकार कल्याण राऊत हे बुधवार, २८ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयाजवळील एका पानटपरीवर चहा पिण्यासाठी थांबले होते. याच दरम्यान आरोपी ग्रामसेवक हेमंत पब्बेवार (वय ५२, रा. लाखनी) हा आपल्या एका मित्रासह त्याठिकाणी आला. राऊत यांना पाहताच पब्बेवार याने जुन्या आकसापोटी त्यांना लक्ष्य केले. "तुझी औकात काय?" असे म्हणत त्याने राऊत यांच्या जातीचा उल्लेख करून हीन दर्जाची वागणूक देण्यास सुरुवात केली. वाद इतक्यावरच थांबला नाही, तर आरोपीने अधिक आक्रमक होत राऊत यांची कॉलर पकडली. शासकीय कार्यालयांच्या गजबजलेल्या परिसरातच आरोपीने राऊत यांच्या गालावर आणि पाठीवर जोराने प्रहार केले. मारहाणीचे कारण विचारले असता, पब्बेवार याने अधिकच संतापून राऊत यांना आई-बहिणीवरून अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. "तुला जिवंत मारून टाकीन," अशी उघड धमकी देऊन त्याने परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पत्रकार कल्याण राऊत यांनी या घटनेनंतर तातडीने लाखनी पोलीस स्टेशन गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य ओळखून आरोपी हेमंत पब्बेवार विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९६, ११५(२), ३५१(२)(३) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी) कलम ३(२)(va), ३(१)(r) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष बारसे करत आहेत.
एका बाजूला शासन 'पत्रकार संरक्षण कायद्या'च्या गप्पा मारत असताना, दुसऱ्या बाजूला शासकीय कर्मचारीच पत्रकारांना लक्ष्य करत आहेत. कल्याण राऊत यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून, तो सत्य मांडणाऱ्या आवाजावर केलेला प्रहार आहे. ग्रामसेवकाची ही हिंमत झालीच कशी? त्याला कोणाचे पाठबळ आहे? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी विविध पत्रकारांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आरोपी ग्रामसेवकाला तातडीने निलंबित करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. लोकशाहीत पत्रकाराला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, तो कोणी हिरावून घेत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. अशी भावना स्थानिक पत्रकारांनी व्यक्त केली आहे.
*आरोपीची मुजोरी कॅमेऱ्यात कैद?(चौकट)*
घटनेच्या वेळी परिसरात काही नागरिक उपस्थित होते. या मारहाणीचे काही धागेदोरे मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरू केला असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत.
0 Response to "ग्रामसेवकाचा पत्रकारावर हल्ला, ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल लाखनी येथील घटना."
एक टिप्पणी भेजें