युवकांनी जिंकावेत U.P.S.C.- M.P.S.C. चे किल्ले; प्राचार्य राहूल डोंगरे.
शुक्रवार, 27 फ़रवरी 2026
Comment
. मार्गदर्शन करतानां प्रा.राहुल डोंगरे
• शिवजयंतीतून नवा संदेश.छत्रपती शिवरायांच्या विचारांनी खैरलांजी दुमदुमले.
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- खैरलांजी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित प्रबोधन कार्यक्रम उत्साह, शिस्त आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभलेल्या या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने विचारांची मेजवानी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रीना रामेश्वर भुसारी होत्या. मंचावर देवदास मते (पोलीस पाटील), विजय केवट (अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव), ममता बनसोड , अशोक भोयर, परमेश्वर निमकर, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अनिल भुसारी यांची उपस्थिती लाभली.
प्रमुख वक्ते,प्राचार्य राहूल डोंगरे यांचे प्रभावी प्रतिपादन:-
प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना प्राचार्य राहूल डोंगरे यांनी शिवचरित्राचा सामाजिक व राष्ट्रीय दृष्टिकोन स्पष्ट केला. त्यांनी ठामपणे सांगितले— “शिवरायांचे स्वराज्य हे केवळ सिंहासनाचे स्वप्न नव्हते; ते रयतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे वचन होते. आज प्रत्येक गावाने अन्यायाविरुद्ध उभे राहून एकी, शिक्षण आणि स्त्रीसन्मान यांचा ध्यास घेतला तरच आपण खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करतो.”
ते पुढे म्हणाले—“मोबाईलच्या पडद्यामागे हरवणारी तरुणाई नव्हे, तर कर्तृत्वाने देश घडवणारी तरुणाई हीच शिवरायांना अपेक्षित होती. U.P.S.C. आणि M.P.S.C. चे किल्ले जिंकणारा प्रत्येक युवक हा आधुनिक स्वराज्याचा मावळा आहे.”
प्राचार्य राहूल डोंगरे यांनी अधोरेखित केले की, शिवाजी महाराजांनी कधीही धर्माच्या नावावर अन्याय केला नाही. मस्जिद, मंदिर, गुरुद्वारा सर्वांचा सन्मान राखत सर्वधर्मसमभावाचा आदर्श त्यांनी घालून दिला. स्त्रियांच्या सन्मानासाठी कठोर नियम घालून “शत्रूच्या स्त्रीलाही मातेप्रमाणे” मान देण्याची शिकवण त्यांनी दिली. गावागावात मुलींचे शिक्षण, सुरक्षितता आणि सन्मान सुनिश्चित करणे हीच शिवभक्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ग्रामीण समाजातील जातीयवाद, भेदभाव व आपसातील मतभेद दूर करून एकीचा धागा मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकरी, कष्टकरी आणि गरीब जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणे हेच खरे शिवकार्य असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार अनिल भुसारी यांनी केले. तर आभार प्रदर्शन शिवमती शितल भुसारी यांनी केले.
कार्यक्रमानंतर ग्रामस्थांतून “विचारांची क्रांती गावातूनच सुरू होते” अशी भावना व्यक्त झाली. खैरलांजीतील हा प्रबोधन सोहळा भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरल्याची चर्चा सर्वत्र रंगली. हे विशेष!
0 Response to "युवकांनी जिंकावेत U.P.S.C.- M.P.S.C. चे किल्ले; प्राचार्य राहूल डोंगरे."
एक टिप्पणी भेजें