उल्हासनगर - ड्रेनेज पाइपलाइन कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.
शुक्रवार, 27 मार्च 2026
Comment
• नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
उल्हासनगर :- महानगरपालिकेच्या मलनिःसारण विभागाच्या अधिकाऱ्यांचे नवीन ड्रेनेज पाइपलाइन टाकण्याच्या प्रकल्पाकडे गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे. काम कोण करत आहे, कामाची प्रगती कशी आहे, याकडे संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पॅनल 18 मधील दहा चाळ परिसर, नालंदा शाळेजवळ गेल्या तीन दिवसांपासून रस्ता खोदून मोठे खड्डे करण्यात आले आहेत. या ठिकाणी नवीन ड्रेनेज पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तीन दिवस उलटूनही हे खड्डे तसेच उघडे ठेवण्यात आले असून कोणतीही पुढील कामगिरी करण्यात आलेली नाही.
दिनांक 24 मार्च रोजी पुन्हा एकदा JCB रस्ता खोदण्यासाठी आला असता स्थानिकांनी कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली. “दोन मोठे खड्डे खोदून रस्ता बंद करून ठेवला आहे, काम कधी सुरू होणार?” असा प्रश्न विचारल्यावर संबंधित कर्मचाऱ्याने “कामगार कामावर येत नाहीत, ठेकेदाराकडे माणसं उपलब्ध नाहीत” असे उत्तर दिले.
दरम्यान, उघडे ठेवलेले हे मोठे खड्डे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. विशेषतः लहान मुले त्या ठिकाणी खेळण्यासाठी जात असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत ॲड. प्रशांत चंदनशिव यांनी पाणीपुरवठा अभियंता मिरकुटे यांना फोन करून काम का थांबले आहे याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ या कामाकडे लक्ष देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.
0 Response to "उल्हासनगर - ड्रेनेज पाइपलाइन कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष."
एक टिप्पणी भेजें