तई (बु.) येथे वाघाने गोठ्यात शिरून गोऱ्हा केला फस्त, पशुपालकाचे मोठे नुकसान.
मंगलवार, 10 मार्च 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
साप्ता."जनता की आवाज"
लाखांदूर :- गेल्या काही दिवसांपासून परिसरात हिंस्र प्राण्यांचा वावर वाढला असून, लाखांदूर तालुक्यातील तई (बु.) येथे वाघाने गोठ्यात शिरून एका गोऱ्ह्याची शिकार केल्याची घटना दि. 7 मार्च रोजी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पशुपालक दिलीप ठाकरे यांचे सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, तई (बु.) येथील रहिवासी दिलीप ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे ६ मार्च रोजी आपली जनावरे रानात चराईसाठी नेली होती. सायंकाळी जनावरे परतल्यानंतर त्यांनी ती गोठ्यात सुरक्षितपणे बांधून ठेवली होती. मात्र, ६ मार्चच्या रात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने गावात प्रवेश केला आणि ठाकरे यांच्या गोठ्यात शिरकाव केला. वाघाने गोठ्यातील गोऱ्ह्यावर हल्ला करून त्याला जागीच फस्त केले.
दि. ७ मार्च रोजी सकाळी ठाकरे हे जनावरांना सोडण्यासाठी गोठ्यात गेले, तेव्हा त्यांना हा प्रकार दिसून आला. गोऱ्हा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला पाहून परिसरात एकच खळबळ उडाली.
तई (बु.) गाव शिवाराला लागूनच जंगल आणि नदीपात्र आहे. यामुळे शिकारीच्या आणि पाण्याच्या शोधात वाघ वारंवार गावाकडे मोर्चा वळवत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही वाघाने गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या आणि इतर पाळीव जनावरांवर हल्ले करून त्यांना फस्त केल्याचे नागरिकांनी सांगितले.
गावाच्या अगदी वेशीवर वाघाचा वावर वाढल्याने शेतमजूर आणि पशुपालक कमालीचे धास्तावले आहेत. "रात्रीच्या वेळी गावात फिरणे कठीण झाले असून जनावरे सांभाळणेही धोक्याचे बनले आहे," अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे. वनविभागाने नुकसानग्रस्त पशुपालकाला त्वरित आर्थिक मदत देवून वाघाचा बंदोबस्त करावा. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
0 Response to "तई (बु.) येथे वाघाने गोठ्यात शिरून गोऱ्हा केला फस्त, पशुपालकाचे मोठे नुकसान."
एक टिप्पणी भेजें