-->
देव्हाडा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ला जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद.

देव्हाडा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ला जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद.



"साप्ता.जनता की आवाज" 
वृत्तपत्र प्रतिनिधी 

भंडारा/तुमसर :- शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ अंतर्गत तुमसर तहसील कार्यालयाच्या वतीने पहिले शिबिर देव्हाडा येथे उत्साहात पार पडले. या शिबिराला परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ५०० लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतला.

या शिबिरात महसूल विभागासह पंचायत समिती, ग्रामपंचायत, कृषी विभाग, भूमी अभिलेख विभाग, आरोग्य विभाग, एस.टी. महामंडळ, नोंदणी विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, सेतू केंद्र व आधार केंद्र आदी विभागांनी आपले स्टॉल लावून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती व सेवा उपलब्ध करून दिली.

शिबिरात नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे विशेष आयोजन करण्यात आले. ८ मार्च ‘जागतिक महिला दिन’ लक्षात घेऊन महिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यात आले असून महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व हार्वेस्टरचे वाटप करण्यात आले. या शिबिराला आमदार श्री राजू कारमोरे यांनी भेट देऊन उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार श्री उपेश अंबादे यांनी समाधान शिबिराचे महत्त्व सांगून शासनाच्या विविध १५ योजनांचा लाभ कसा मिळवता येईल, याबाबत सविस्तर माहिती दिली. शिबिरातील विशेष बाब म्हणजे ‘लक्ष्मी मुक्ती योजने’अंतर्गत ५० महिलांची सातबाऱ्यावर खातेदार म्हणून नोंद करून त्यांना सातबारा वाटप करण्यात आले.

तसेच भूमी अभिलेख विभागामार्फत शिवणी, देव्हाडी व हसारा या तीन गावांतील पांदन रस्त्यांची नोंद नकाशात करून संबंधित नकाशे सरपंचांना प्रदान करण्यात आले.

या शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता १४ मार्च २०२६ रोजी मिटवानी येथे आयोजित पुढील शिबिरात अधिकाधिक नागरिक व शेतकऱ्यांनी सहभागी होऊन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार उपेश अंबादे यांनी केले.

शिबिरात गटविकास अधिकारी श्री नंदकिशोर वाडेकर, उपअधीक्षक भूमी अभिलेख श्री नारनवरे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती दुर्गेश्वरी एकतपुरे यांनी विभागीय स्टॉलद्वारे जनतेला महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नायब तहसीलदार श्री संजय जांभुळकर, श्री अप्पासाहेब वानखेडे, महसूल सहाय्यक श्री सुनील कडव, श्री विक्टर गजभिये, श्री धर्मपाल रामटेके, श्री बोरकर, श्रीमती बारेवार, श्रीमती इंदू कुथे, श्रीमती कुल्लरकर, श्रीमती बनसोड, श्री सुरेंद्र चौराकडे, श्री सूर्यवंशी, श्री हेमराज लांजेवार, श्री गणेश ठवकर, श्री जगदीश हटवार, श्री दीपक वाघमारे तसेच तुमसर महसूल विभागाच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले.

तसेच ग्रामपंचायत देव्हाडा यांनीही शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले.

0 Response to "देव्हाडा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ला जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article