-->
जागतिक महिला दिन : महामानवांच्या विचारांनी उजळलेला स्त्री-मुक्तीचा प्रवास….

जागतिक महिला दिन : महामानवांच्या विचारांनी उजळलेला स्त्री-मुक्तीचा प्रवास….




आईच्या संस्कारातुन उद्याचा समाज घडतो ,
विज्ञान ,समतेचा दीप तिच्या विचारात पेटतो ,
क्रांतीसूर्य महात्मा फुले - क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या विचारानी दिशा दिली ,
आजची स्त्री समाजाला प्रगतीची वाट दाखवू लागली .

जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करी” — ही म्हण केवळ शब्दांची अलंकारिक मांडणी नाही, तर समाजाच्या भविष्याचा गाभा स्त्रीच्या हातात आहे याची जाणीव करून देणारी सत्यवाणी आहे. कारण आईच्या कुशीतच संस्कारांची बीजे पेरली जातात आणि त्यातूनच उद्याची पिढी घडत असते.

पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. भारतीय समाजात एक काळ असा होता की स्त्रीला शिक्षण, स्वातंत्र्य आणि समानतेपासून दूर ठेवले जात होते. तिच्या आयुष्याभोवती परंपरा, रूढी आणि अंधश्रद्धेच्या भिंती उभ्या केल्या होत्या. अशा काळोख्या वातावरणात काही महान विचारवंतांनी समाजाला नव्या प्रकाशाची दिशा दिली.

स्त्रीच्या सन्मानाचा आणि सामर्थ्याचा आदर्श इतिहासातही दिसतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात स्त्रियांचा सन्मान सर्वोच्च मानला जात होता. युद्धाच्या काळातही स्त्रियांचा अपमान होऊ नये, हा कठोर नियम त्यांनी घातला. स्वराज्याच्या या मूल्यांनी स्त्रीसन्मानाची भक्कम पायाभरणी केली.

यानंतर समाजसुधारणेची क्रांती घडवून आणली ती क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांनी. स्त्रियांना शिक्षण मिळावे, त्यांचे आयुष्य अज्ञानाच्या अंधारातून बाहेर यावे म्हणून त्यांनी मोठा संघर्ष केला. सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तेव्हा समाजाने त्यांना अपमान, विरोध आणि उपेक्षा दिली; पण त्या डगमगल्या नाहीत. त्यांच्या संघर्षामुळे स्त्री शिक्षणाची क्रांती सुरू झाली.

या विचारांना बळ दिले ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी. त्यांनी शिक्षण, आरक्षण आणि सामाजिक समतेच्या धोरणांद्वारे स्त्री-पुरुष समानतेचा मार्ग मोकळा केला. शिक्षण हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे, हा विचार त्यांनी समाजाच्या मनात रुजवला.

आणि या सर्व विचारांना संविधानिक आधार दिला तो भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी. भारतीय संविधान तयार करताना त्यांनी स्त्रियांना समान अधिकार, मतदानाचा हक्क, संपत्तीचा अधिकार आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. त्यांच्या विचारांमुळे स्त्री केवळ घरापुरती मर्यादित राहिली नाही, तर शिक्षण, प्रशासन, विज्ञान, क्रीडा, उद्योग आणि राजकारण या सर्व क्षेत्रात तिने गरुडझेप घेतली.

आजची भारतीय स्त्री अंतराळात झेपावते, विज्ञानाच्या प्रयोगशाळेत संशोधन करते, प्रशासनात निर्णय घेते, तर दुसरीकडे कुटुंब आणि समाज यांची जबाबदारीही समर्थपणे सांभाळते. ही प्रगती म्हणजे शतकानुशतके चाललेल्या संघर्षाचे आणि महामानवांच्या विचारांचे फळ आहे.

मात्र आजच्या स्त्रियांसमोर आणखी एक मोठी जबाबदारी आहे. समाज अजूनही काही ठिकाणी अंधश्रद्धा, अज्ञान आणि चुकीच्या परंपरांमध्ये अडकलेला दिसतो. अशा वेळी स्त्रीने विवेक, विज्ञान आणि मानवतेचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. धार्मिकतेच्या अंधानुकरणापेक्षा विज्ञाननिष्ठ विचार स्वीकारून ती समाजाला योग्य दिशा देऊ शकते.

आई ही मुलांची पहिली गुरू असते. तिच्या शब्दातून, कृतीतून आणि विचारातून मुलांच्या मनात संस्कार रुजतात. जर आईने मुलांना समता, मानवता, विज्ञाननिष्ठता आणि संविधानिक मूल्ये शिकवली, तर समाजात एक आदर्श आणि प्रगत पिढी निर्माण होईल.

जागतिक महिला दिन हा केवळ स्त्रियांचा गौरव करण्याचा दिवस नाही, तर त्यांना घडवणाऱ्या महान विचारांची आठवण करण्याचा दिवस आहे. शिवरायांचे स्त्रीसन्मानाचे स्वराज्य, फुले-शाहूंची सामाजिक समतेची क्रांती आणि आंबेडकरांचे संविधानिक अधिकार — या विचारांच्या प्रकाशामुळेच आज स्त्री प्रगतीच्या नव्या क्षितिजावर उभी आहे.

आज प्रत्येक स्त्रीने या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे. कारण
जिच्या हाती पाळण्याची दोरी आहे, ती केवळ घराचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे भविष्य घडविणारी शक्ती आहे.

महामानवांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्त्रीने विज्ञान, विवेक आणि मानवतेच्या मार्गाने चालत आदर्श पिढी घडवली, तर खऱ्या अर्थाने समाजाचा उद्धार होईल — आणि तेव्हाच जागतिक महिला दिन साजरा करण्याचे खरे सार्थक होईल.

आईच्या संस्कारातून उद्याचा समाज घडतो,
विज्ञान,समतेचा दीप तिच्या विचारात पेटतो,
फुले- शाहू-आंबेडकरांच्या मार्गावर स्त्री पुढे जाते,
म्हणूनच नव्या युगाची पहाट तिच्यामुळे उजाडते.
…जागतिक महिला दिनाच्या माय- माऊल्याना मंगलमय सदिच्छा!..

         …राहूल डोंगरे…
शिवाजी नगर,तुमसर.जि.भंडारा.

0 Response to "जागतिक महिला दिन : महामानवांच्या विचारांनी उजळलेला स्त्री-मुक्तीचा प्रवास…."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article