महिला आयोग अध्यक्ष नियुक्तीबाबत निष्पक्ष व्यक्तीची मागणी.
रविवार, 22 मार्च 2026
Comment
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- दिनांक : २२ मार्च २०२६ महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत सामाजिक कार्यकर्ते डॉ. देवानंद बि. नंदागवळी यांनी मुख्यमंत्री यांना ई-मेलद्वारे निवेदन सादर करून निपक्षपाती व सक्षम व्यक्तीची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महिला आयोगाचे अध्यक्ष पद नुकतेच रिक्त झाले असून हे पद अत्यंत जबाबदारीचे आहे. राज्यातील महिलांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांना न्याय मिळवून देणे आणि अन्यायाविरुद्ध प्रभावीपणे लढा देणे ही आयोगाची मुख्य जबाबदारी आहे. सध्याच्या परिस्थितीत महिलांवरील अत्याचार आणि भेदभावाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने आयोग अधिक सक्षम आणि प्रभावी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
डॉ. देवानंद नंदागवळी यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, या पदावर राजकीय व्यक्तीऐवजी कायद्याचे सखोल ज्ञान, प्रशासनिक अनुभव आणि निष्पक्ष दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी. विशेषतः निवृत्त महिला आयपीएस अधिकारी, न्यायाधीश किंवा सैन्यातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच संबंधित व्यक्तीकडे सामाजिक जाण, नैतिक धैर्य आणि महिलांवरील अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेण्याची क्षमता असावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महिला आयोगाचे कार्य केवळ औपचारिक न राहता प्रत्यक्षात महिलांच्या न्यायासाठी प्रभावीपणे काम करणारे असावे, यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
0 Response to "महिला आयोग अध्यक्ष नियुक्तीबाबत निष्पक्ष व्यक्तीची मागणी."
एक टिप्पणी भेजें