-->
विशेष लेख....

विशेष लेख....


बुवाबाजीला मरण नाही !..

संकलन/संग्रह.                     लेखक
हर्षवर्धन देशभ्रतार           डॉ. प्रदीप पाटील
 
देव आणि धर्म म्हटले की हात आपो-आप जोडले जातात,आणि डोळे झाकून सारं काही स्वीकारलं जातं!!
मग तो धर्म आणि देव, खरात-वैद्याचा असो, झाकिर नाईक-मुफ्ती सलमान अझरीचा असो, नाहीतर बजेंदरसिंग पास्टर-चार्लीचा असो...

तिथे प्रश्न विचारायचे नसतात. देव आणि धर्माला प्रश्न विचारायचे नसतात, असे जेव्हा संस्कारातून शिकलेले असते तेव्हा आंधळेपणाने जो जो कोणी देव आणि धर्माविषयी सांगेल तो तो आंधळेपणाने ते स्वीकारतो !!

जेव्हा धर्म आणि देव अशी आंधळेपणाने स्वीकारण्याची मानसिकता निर्माण करतात तेव्हा भक्ताळलेली ही मानसिकता देव आणि धर्माचे नाव काढले की वाटेल ते सांगितलेले स्वीकारू, आचरणात आणू लागते. 

ही मानसिकता गोबर खाते-मुत्र पीते.. गुरुला अवतार मानून लैंगिक संबंध स्वीकारते.. परधर्मीयाचा छळ करते.. जगावर युद्ध लादते, मंतरलेले अशुद्ध पाणी प्यायला लावते.. थोडक्यात काहीही करायला लावते. आंधळी मानसिकतावाले ते करून मोकळे होतात.

अशी मानसिकता बनल्या नंतर जर देवाचे नाव घेऊन धर्माचा बाजार मांडला, आपण देवावतार आहोत असे सांगितले, दोन-चार चमत्कार केले, की, अशा धार्मिक मानसिकतेचे लोटांगण विनाशर्त होते.

अशा अवस्थेत बुवा-महाराज- देवऋषी-गुरु मुजावर-मौलवी-पाद्री यांनी स्त्रियांशी संबंध ठेवले तर ते दैवी संबंध आहेत अशी मानसिकता तयार न झाल्यास नवलच. मग वर्षानुवर्षे अशा बुवांचे थवेच्या थवे तयार होत राहतात.

आसाराम बापू-गुरु गुरमीत राम रहीम यांचे अनेक लैंगिक अत्याचार व बलात्कार घडतात... तुफेल दादापीर पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो-तारीक रमादान हा अनेक स्त्रियांवर लैंगिक अत्याचार करतो...
बजिंदर सिंग बावीस वर्षाच्या मुलीवर-चार्ली १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो.

सर्व धर्म आणि आणि त्यांचे देव हे मानव जातीची चिकित्सक वृत्ती नष्ट करण्याचे काम वर्षानुवर्षे करतच राहिलेले आहेत. आम्हाला प्रश्न विचारायचे नाही असे त्यांनी अलिखित नियम करून टाकले आहेत. आणि जर प्रश्न विचारले तर तुम्हाला नष्ट करून टाकू अशी भीती सुद्धा मनात घट्ट करून ठेवली आहे. मग जन्मल्यापासून मरेपर्यंत ही भीती घेऊन धर्म आणि देवाचा पुरस्कार करणारी भक्ती साधी पोलीस तक्रार करायला जायचं सोडूनच द्या आपल्या स्वतःच्या हक्काच्या माणसांना देखील आपल्यावर झालेला अन्याय व शोषण सांगत नाहीत!

जेव्हा या धर्म आणि देवाचे राजकारण सुरू होते तेव्हा त्या त्या धर्माला आणि देवाला राजकीय संरक्षण मिळते. आणि मग आंधळेपण स्वीकारलेली मानसिकता आणखीनच वाढत जाते.

हजारो वर्षे हे चालू आहे. आत्ताचे खरात किंवा वैद्य कोणीही असो ते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कारणांसाठी निमित्त बनतात. 

जोवर आंधळी समाज मानसिकता देव आणि धर्माच्या बाबतीत राहील तोवर बुवाबाजीला मरण नाही!
 
-डॉ. प्रदीप पाटील

0 Response to "विशेष लेख...."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article