‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान–२’ : तुमसर तालुक्यात प्रशासन नागरिकांच्या दारी.
गुरुवार, 5 मार्च 2026
Comment
दिगंबर देशभ्रतार
"साप्ता.जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- महसूल विभागाच्या वतीने तुमसर तालुक्यात नागरिकांच्या विविध शासकीय कामांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान–२’ अंतर्गत एकदिवसीय समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमधून नागरिकांच्या महसुली व इतर शासकीय योजनांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे सोडवण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे.
ग्रामीण भागातील अनेक नागरिकांची ७/१२ उतारे, फेरफार नोंदी, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अनुकंपा (NA) परवानगी, जमीन मोजणी अर्ज, रेशनकार्ड, पीएम किसान नोंदणी तसेच विविध सामाजिक योजनांचे लाभ यांसारखी कामे प्रलंबित राहतात. या सर्व प्रकरणांचा निपटारा एका ठिकाणी आणि कमी वेळेत व्हावा, या उद्देशाने हे शिबिर नागरिकांसाठी मोठी संधी ठरणार आहे.
या शिबिरांमध्ये महसूल, कृषी, आरोग्य, परिवहन, ग्रामपंचायत, सामाजिक न्याय आदी विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकणार असून प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही केली जाणार आहे. तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन व अर्ज स्वीकृतीची सुविधा देखील उपलब्ध राहणार आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ७ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भात तहसील कार्यालय, तुमसर येथे आयोजित माध्यम प्रतिनिधींच्या बैठकीत उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार श्री. उपेश अंबादे यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित ठिकाणी उपस्थित राहून या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या बैठकीस श्री. नंदकिशोर वाळेकर (गट विकास अधिकारी), श्री. सुहास तिरपुडे प्रतिनिधी (मुख्याधिकारी, नगर परिषद तुमसर), श्री. नारनवरे (उपअधीक्षक, भूमिअभिलेख विभाग), श्रीमती सातपुते (तालुका कृषी अधिकारी), श्री. जांभूळकर (नायब तहसीलदार) तसेच श्री. व्हॅनखेडे(नायब तहसीलदार) यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ त्यांच्या दारीच मिळणार असून, नागरिकांनी जागरूकतेने या शिबिरात सहभागी होऊन प्रलंबित कामे मार्गी लावावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
0 Response to "‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान–२’ : तुमसर तालुक्यात प्रशासन नागरिकांच्या दारी."
एक टिप्पणी भेजें