-->
“दूरदृष्टीचा दीपस्तंभ : शिक्षणमहर्षी गुरुवर्य कै. रा. गे. शिंदे गुरुजी यांना विनम्र अभिवादन”

“दूरदृष्टीचा दीपस्तंभ : शिक्षणमहर्षी गुरुवर्य कै. रा. गे. शिंदे गुरुजी यांना विनम्र अभिवादन”


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

नागपूर :- शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा जिल्हा धाराशिव परंडा तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासात ज्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे, असे शिक्षणमहर्षी गुरुवर्य कै. रामचंद्र गेनुजी शिंदे (गुरुजी) यांची आज पुण्यतिथी. 

त्यांच्या कार्याचा विचार केला की, एक व्यक्ती आपल्या दूरदृष्टी, चिकाटी आणि समाजभानाच्या जोरावर संपूर्ण परिसराचा कायापालट करू शकते, याचा प्रत्यय येतो.
गुरुजींना “गुरुजी” या स्नेहपूर्ण नावानेच सर्वत्र ओळखले जात होते. त्यांनी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव या संस्थेची स्थापना करून शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल उचलले. परंडा सारख्या त्या काळी अत्यंत मागासलेल्या आणि शैक्षणिक सुविधांपासून वंचित असलेल्या शहरात “न्यू कॉलेज” या नावाने पहिले महाविद्यालय सुरू करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. हे केवळ एक शैक्षणिक संस्थेचे उद्घाटन नव्हते, तर तो परंडा तालुक्याच्या प्रगतीचा प्रारंभबिंदू ठरला.
गुरुजींचा ठाम विश्वास होता की, “विद्यार्थी शिकले पाहिजेत, त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळाल्या पाहिजेत आणि त्यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत.” या ध्यासातूनच त्यांनी विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वांगीण विकास यावर विशेष भर दिला. त्यांच्या या विचारसरणीमुळे अनेक ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली झाली.
गुरुजींच्या निधनानंतर त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून “न्यू कॉलेज”चे नामांतर “शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय, परंडा” असे करण्यात आले. आज हे महाविद्यालय केवळ एक संस्था नसून, ज्ञान, संस्कार आणि प्रगतीचे केंद्र बनले आहे.
गुरुजींच्या स्वप्नांना साकार करण्याचे मोठे कार्य संस्थेचे सचिव मा. संजय बप्पा निंबाळकर यांनी केले. आणि या कार्यामध्ये त्यांना संस्थेचे अध्यक्ष सुनील नाना शिंदे यांची साथ मिळाली. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाविद्यालयाने प्रचंड प्रगती साधली. आज या महाविद्यालयात इयत्ता अकरावीपासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत विविध अभ्यासक्रम एम.एस्सी. (प्राणीशास्त्र), एम.एस्सी. (वनस्पतीशास्त्र), एम.कॉम., संगणकशास्त्र, बी.व्होक. इत्यादी यशस्वीपणे चालू आहेत.
आज या संस्थेतून शिक्षण घेतलेले असंख्य विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. कोणी शासकीय व खाजगी नोकऱ्यांमध्ये, कोणी उद्योग व्यवसायात, तर कोणी सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. हे सर्व गुरुजींच्या दूरदृष्टीचे आणि त्यागाचे फलित आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत हे महाविद्यालय धाराशिव जिल्ह्यातील अग्रगण्य महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. NAAC या महत्त्वपूर्ण समितीकडून “A” दर्जा प्राप्त करून महाविद्यालयाने गुणवत्ता आणि उत्कृष्टतेचा मानदंड निर्माण केला आहे.
महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये प्राचार्यांचे योगदानही मोलाचे राहिले आहे. प्राचार्य चंद्रकांत घुमरे, डॉ. दीपा सावळे आणि सध्या प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांनी आपल्या नेतृत्वाखाली संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळली. विशेषतः डॉ. सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाची सुसज्ज इमारत, सुंदर प्रांगण आणि आधुनिक सुविधा विकसित झाल्या आहेत. शिक्षक व कर्मचारी यांच्यातील कौटुंबिक वातावरण आणि विश्वासाचे नाते हे या यशामागील महत्त्वाचे घटक ठरले आहेत.
आज जेव्हा माजी विद्यार्थी महाविद्यालयात परत येतात, तेव्हा त्यांना झालेला आमूलाग्र बदल पाहून आश्चर्य वाटते. एक छोटेसे रोपटे असलेले हे महाविद्यालय आज भव्य वटवृक्षात रूपांतरित झाले आहे.आणि त्या वटवृक्षाच्या मुळाशी आहेत गुरुजींचे कष्ट, त्याग आणि दूरदृष्टी.
आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, या महान शिक्षणतज्ज्ञाला विनम्र अभिवादन करताना आपण त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया. त्यांनी पेटवलेला शिक्षणाचा दीप सदैव प्रज्वलित ठेवणे, हाच त्यांना खरा आदरांजली ठरेल.
 विनम्र अभिवादन!..

    प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे
           सहयोगी प्राध्यापक, 
            प्राणीशास्त्र विभाग
शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे.महाविद्यालय,
       परंडा जि. धाराशिव, महाराष्ट्र.

0 Response to "“दूरदृष्टीचा दीपस्तंभ : शिक्षणमहर्षी गुरुवर्य कै. रा. गे. शिंदे गुरुजी यांना विनम्र अभिवादन” "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article