शिंदे गुरुजी दूरदृष्टीचे शिक्षण तज्ञ होते - डॉ शहाजी चंदनशिवे.
गुरुवार, 23 अप्रैल 2026
Comment
• रा. गे. शिंदे महाविद्यालयात पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम संपन्न
रा गे शिंदे गुरुजींना अभिवादन.
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
धाराशिव :- श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिवचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी कै. रा. गे. शिंदे गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त परंडा येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून परंडा तहसीलचे नायब तहसीलदार विजय बाडकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नायब तहसीलदार विजय बाडकर यांच्या हस्ते शिंदे गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. भाऊसाहेब दिवाने, कार्यालयीन अधीक्षक सौ. पद्मा शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे तसेच महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी आपल्या मनोगतात शिंदे गुरुजींच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. ते म्हणाले की, “शिंदे गुरुजी हे दूरदृष्टीचे शिक्षणतज्ज्ञ होते. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, त्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने त्यांनी परंडा येथे ‘न्यू कॉलेज’ची स्थापना केली. आज हेच महाविद्यालय शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय या नावाने नावारूपाला आले आहे.”
ते पुढे म्हणाले की, “गुरुजींचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली आहे. गुरुजींचे विचार समाजाभिमुख होते. त्यांनी उभारलेले हे शिक्षण संकुल केवळ शिक्षण देणारे केंद्र नसून सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे.” त्यांच्या आदर्शांचा वारसा जपण्याचा निर्धार आपण केला पाहिजे . आज संस्थेतील पदाधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी गुरुजींच्या विचारांचे आत्मसात करून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर कार्यरत आहेत, हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. शेवटी उपस्थितांनी शिंदे गुरुजींना भावपूर्ण अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Response to "शिंदे गुरुजी दूरदृष्टीचे शिक्षण तज्ञ होते - डॉ शहाजी चंदनशिवे."
एक टिप्पणी भेजें