तुमसर बाजार समिती प्रशासनाची दडपशाही!
शुक्रवार, 17 अप्रैल 2026
Comment
• हमाल माथाडी कृती समितीचा बैठकीवर 'बहिष्कार'!
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील
हमाल व माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी प्रशासनाने कामगार नेत्यांविरुद्धच पोलिसांत धाव घेतल्याने नवा वाद उफाळून आला आहे. प्रशासनाच्या या 'दडपशाही' धोरणाचा निषेध म्हणून हमाल माथाडी कामगार कृती समितीने १७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त बैठकीवर जाहीर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
बाजार समितीमधील हमाल, मापारी आणि टोपलेवाले कामगारांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी कृती समिती गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आहे. यावर सकारात्मक चर्चा होणे अपेक्षित असताना, बाजार समिती प्रशासनाने कामगारांच्या निवेदनांना चक्क 'गुन्हेगारी' स्वरूप देऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एका बाजूला १० एप्रिल रोजी पत्र काढून चर्चेसाठी निमंत्रण द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकरवी दबाव आणायचा, हा प्रशासनाचा दुटप्पी चेहरा असल्याचे कृती समितीने म्हटले आहे.
समितीचे समन्वयक वैभव चोपकर आणि सहसमन्वयक चंद्रशेखर सेलोकर यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. 'जोपर्यंत
'प्रशासनाने चर्चेचे नाटक करण्यापेक्षा कामगारांच्या समस्या गांभीर्याने सोडवाव्यात. कामगारांचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांचा वापर करणे हा लोकशाही हक्कांवर घाला आहे. जर १७ तारखेच्या बैठकीत कामगारांच्या हिताविरुद्ध कोणताही चुकीचा निर्णय घेतला गेला, तर जिल्हाधिकारी आणि कामगार आयुक्तांकडे धाव घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल.
वैभव चोपकर समन्वयक, हमाल माथाडी कामगार कृती समिती,
कामगारांविरुद्धची पोलीस तक्रार मागे घेतली जात नाही आणि कामगारांना सन्मानाची वागणूक मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही चर्चेत सहभागी होणार नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी भंडारा, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भंडारा, पोलीस अधीक्षक यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.
प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे बाजार समितीच्या कामकाजावर भविष्यात मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे. हमाल आणि माथाडी कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने आता जिल्हा प्रशासन या प्रकरणात काय मध्यस्थी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Response to " तुमसर बाजार समिती प्रशासनाची दडपशाही!"
एक टिप्पणी भेजें