-->
जातीच्या संसर्गापासून मुक्त बौध्द धम्मात जाती निर्माण करू नका !..

जातीच्या संसर्गापासून मुक्त बौध्द धम्मात जाती निर्माण करू नका !..

उपवर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व नोकरीतील आरक्षण व निवडणुकीतील राखीव जागा वाचविण्यासाठी अनुसुचित जातीतील बौध्दांची संख्या कमी होऊ नये, अशी चिंता काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना लागलेली आहे. म्हणून जनगणना २०२६ मधील जातीच्या रकान्यात महार जातीची नोंद करण्याचे पोटतिडकीचे आवाहन ते करीत आहेत. परंतु केवळ याच गोष्टींसाठी विसंगतीचे जीवन प्रदीर्घ काळ चालू ठेवायचे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतरानंतर स्वतःची बौध्द म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची टाकलेली जबाबदारी पार पाडायची याचा सुज्ञपणे विचार बौद्धांनी आतातरी करायला हवा.निवडणुकीतील राखीव जागांचा काही उपयोग होत नाही, असा अनुभव आल्यानंतर बाबासाहेबांनी त्या नकोत, असा आग्रह धरला होता. या संदर्भात शे. का. फे. ने घेतलेल्या ठरावाला मी चिकटून राहू इच्छितो असे ते म्हणाले. ते स्पष्ट करतात की, काँग्रेसवाल्यांना राखीव जागांकरिता स्वतंत्र मतदारसंघ मान्य नव्हता. तेव्हा जे वारे वाहात होते ते संयुक्त मतदारसंघाचे होते. 

याचाही प्रयोग करून पाहावा, असे पुष्कळांना वाटले. चोराची लंगोटी देखील सोडू नये म्हणतात, त्याप्रमाणे राखीव जागा सोडून न देता त्यांचा संयुक्त मतदारसंघाने प्रयोग करावा, असे वाटले.

पण आता असा अनुभव येऊन चुकला आहे की, काँग्रेसच्या तिकिटावर राखीव जागेवर जी माणसे येतात ती आपली तोंडे बंद करून बसतात. अशा त-हेने संयुक्त मतदारसंघामुळे जर गधे लोक निवडून येत असतील, तर निवडणुकांचा व जागांचा उपयोग तरी काय? त्यांचा काही उपयोग होत नाही हे अनुभवाने आता सिद्ध झाले आहे. याच भाषणात ते म्हणाले की, निवडणुकीतील राखीव जागा दहा वर्षांसाठी आहेत. बाबासाहेबांच्या पश्चात जरी त्यांना अजूनही मुदतवाढ मिळत असली, तरी त्यांचा समाजासाठी काही उपयोग होत नाही, हे तोही जाणतो. समाजाचे ऐक्य ही कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक महत्वाची गोष्ट आहे. राखीव जागा गौण आहेत, असे बाबासाहेबांचे म्हणणे होते.

बौध्दांचा अनुसुचित जातींमध्ये समावेश असला तरी बौध्द धर्म जात विरहित आहे. त्यामुळे बौद्धांनी जातीला चिकटून राहणे बाबासाहेबांना अभिप्रेत नाही.ही बाब त्यांनी जिवंतपणी केलेल्या मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन, या संकल्पाला कमीपणा आणणारी आहे. बाबासाहेबांनी बौद्धांना उत्तमरितीने धर्म पाळण्याचा निर्धार करावयास सांगितले आहे. ते म्हणतात की, बौध्द म्हणून इतर लोकांना आदर्श वाटेल, अशी कृती करण्यास आपण सिद्ध झाले पाहिजे. हे आपल्याला साधले तर

.                   जोगेंद्र सरदारे भिवापूर,
                          जि. नागपूर
                        ९४२२१३८३२२

आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उध्दार करू. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. बाबासाहेबांचे बौद्धमय भारताचे स्वप्न पूर्ण न होऊ शकल्याने ती उत्तुंग अशी जबाबदारी आज बौद्धांच्या खांद्यावर आहे, हे विसरायला नकोच. या पार्श्वभूमीवर बहुसंख्येने बौध्द असलेल्या महारांनी जात कायम ठेऊन स्वतःला बौध्द महार म्हणू लागले, तर बौध्द धम्म स्वीकारण्याची इच्छा असणारे इतर

लोकही जातीसह बौद्ध धर्मात प्रवेश करतील. असे झाले तर बाबासाहेबांनी महारांना बौध्द धर्माची दीक्षा देण्याला काहीच अर्थ उरणार नाही. बाबासाहेबांच्या शब्दात महारांनी तो अधोगतीस नेला, असे होईल. अनुसुचित जातीची लोकसंख्या कमी न होऊ देण्यासाठी धर्मांतरीत बौद्धांनी जनगणना २०२६ मधील जातीच्या रकान्यात जातीची नोंद करण्यातून ब्राह्मणवाद्यांचे फावणार आहे. सर्व अनुसूचित जातींना ते हिंदू मानतात. बौध्द धर्म हा हिंदू धर्माचाच भाग आहे ही आरएसएसची विचारधारा आहे. अशाप्रकारे आरएसएसच्या संकल्पनेतील हिंदू राष्ट्राला मूर्त स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी जे बौद्धांना त्यांची जात जनगणनेच्या रकान्यात नमूद करण्याचे आवाहन करतात ते आरएसएसचे स्लिपर सेल आहेत ही बाब उघड होत आहे. वेगवेगळ्या प्रदेशातून वाहणाऱ्या नद्या समुद्राला येऊन मिळाल्यानंतर त्यांचे अस्तित्व लोप पावते. त्याप्रमाणे बौध्द धम्म २५०० वर्षापासून जातीच्या संसर्गापासून मुक्त आहे. पुढेही तसाच राहावा, यासाठी बौद्धांनी जनगणना २०२६ मध्ये धर्म बौद्ध अशी नोंद करून जातींच्या रकान्यात निरंक अशी नोंद करावी. 

0 Response to "जातीच्या संसर्गापासून मुक्त बौध्द धम्मात जाती निर्माण करू नका !.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article