बौध्दांची प्रगती केवळ बौध्द धम्मामुळेच.
बुधवार, 20 मई 2026
Comment
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मी माझे शेवटचे दिवस बौध्द धम्माच्या प्रचारात घालवणार आहे, असे उद्वार धर्मांतरापूर्वी म्हणजे १३ मे १९५३
रोजी बुध्द जयंतीनिमित्त नरेपार्क मुंबई येथे आयोजित केलेल्या जाहीर व्याख्यानात काढले होते. यावेळी उपस्थित महार समुदायाला धर्मांतराचे महत्व पटवून सांगताना ते म्हणाले, जातीभेदाचे मूळ कायमचे उपटून टाकण्यासाठी आपण हिंदू धर्माचा त्याग करणे आवश्यक आहे. चैनीत असलेल्यांना पायाखाली काय कुजत आहे, याची जाणीव येणार नाही. ही जातीभेदाची समाजरचनाच जर उलथून पाडावयाची असेल तर आपणास बौध्द धर्माचीच शिकवण अंमलात आणली पाहिजे. पुढे गंभीर व भावूक होत ते म्हणाले, ही गोष्ट मी निव्वळ गळ्यापासून बोलत नसून बेंबीच्या देठापासून बोलत आहे. याच व्याख्यानात त्यांनी आपली मी माझा प्रचार तुमच्यापुरताच मर्यादित न ठेवता साऱ्या हिंदू धर्माला या नव्या क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करीन, अशी दृढ इच्छाशक्ती प्रकट केली. यावरून बाबासाहेबांनी भारतात धम्मराज्य स्थापित करण्याच्या उद्देशानेच मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन, असा संकल्प जाहीर केल्याचे त्यांच्या त्यावेळच्या वाटचालीवरून दिसून येते. या पार्श्वभूमीवर सद्य स्थितीत स्वतःला समाजाचे तारणहार समजणारे काही सेवानिवृत्त अधिकारी जनगणना २०२६-०२७ मध्ये धर्म बौद्ध व जात महार अशी नोंद करण्याचे आवाहन करून समाजाला बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गाने नेण्याऐवजी त्यांना अगदी उलट दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार जनगणना २०२६-२७ मध्ये जातीची नोंद न केल्यास अनुसूचित जातींची संख्या कमी होऊन आम्ही अल्पसंख्याक होऊ. त्यामुळे आम्हाला अनुसूचित जातीच्या नावावर मिळणारे निवडणुकीतील राखीव जागा व शैक्षणिक तसेच नोकरी विषयक आरक्षण व इतर लाभ बंद होतील. समाजाचे यात मोठे नुकसान होईल. या चिंताग्रस्त लोकांना असलेल्या समाजाच्या काळजीपोटी एक साधा प्रश्न विचारला गेला पाहिजे. बौध्द धम्म स्वीकारल्यानंतर मिळकतीचे कोणतेही साधन नसलेल्या बहुसंख्य धर्मांतरीत बौध्दांसमोर उपजिविका कशी चालवायची हाच मोठा जटील प्रश्न होता. परंतु बाबासाहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून त्यांनी भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व दिले. महारांच्या उपजिविकेचा असाच एक प्रश्न
केसरीच्या एका बातमीदाराने बाबासाहेबांना विचारला होता. त्याचे मोठे खोचक उत्तर त्यांनी त्या बातमीदाराला दिले होते. आमच्या लोकांच्या बदल्यात मेलेली ढोरे ओढण्याचे काम तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी करून,
जोगेंद्र सरदारे भिवापूर,
जि. नागपूर
९४२२१३८३१२२
आमच्या लोकांना मिळणारे ५०० रूपयांचे उत्पन घ्यावे. हा फायदा तुम्ही अवश्य घ्यावा. शिवाय दरवर्षी मी स्वतः तुम्हाला ५०० रूपये वर देण्याची व्यवस्था करतो. माझ्या लोकांचे काय होईल, त्यांना
अन्न, वस्त्र मिळेल की नाही ते माझे मी पाहीन. मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही का सोडून देता? तुम्ही का हे करीत नाही? आम्ही हे काम केले म्हणजे फायदा होतो आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही. ओढा ना तुम्ही मेलेली ढोरे, असे ते उत्तर होते. या पार्श्वभूमीवर आजच्या पिढीला जनगणनेत महार जातीची नोंद करण्याचे सुचवून त्यांच्या फायद्या तोट्याचे गणित समजावून सांगणाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतर आपल्या पूर्वजांचा धंदा नव्याने सुरू केल्यास आजच्या गणीतानुसार फडणवीस-शिंदे सरकार थोडी थोडकी नव्हे तब्बल १५ कोटी रूपयांची बक्षिसी देईल. केसरीच्या बातमीदाराला बाबासाहेबांनी दिलेला सल्ला आजच्या सल्लागारांनी स्वतः उपयोगात आणून महारकीच्या कामाचा मोबदला म्हणून मिळणाऱ्या कोट्यनुकोटी रूपयांचा घसघशीत फायदा खरंच सोडू नये. आरक्षणामुळे झालेल्या भौतिक प्रगतीपेक्षा बौध्द धम्मामुळे बौध्दांची जास्त मानसिक व वैचारिक प्रगती झाली आहे. बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे बौध्द धम्म जातविरहित एकजिनसी समाजरचनेचा पुरस्कार करतो. अशा या धम्मात जनगणना २०२६-०२७च्या माध्यमातून धर्म बौध्द व जात महार नोंदविली गेल्यास बौद्ध धम्मात जाती निर्माण करण्याला बौध्दच कारणीभूत ठरतील. हा दोष चिकटवून घेण्याचे पातक आरक्षणाच्या चिंतेने ग्रासलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून बौद्धांनी करू नये. २०२६-०२७ च्या जनगणनेमध्ये धर्म बौध्द व जात निरंक अशी नोंद करून धम्म स्वीकारण्याची इच्छा असणाऱ्या इतर जातींच्या लोकांसमोर आदर्श निर्माण करावा.
0 Response to "बौध्दांची प्रगती केवळ बौध्द धम्मामुळेच."
एक टिप्पणी भेजें