-->
करावे काय शिक्षण ते? कधी कामास येईना.

करावे काय शिक्षण ते? कधी कामास येईना.



भंडारा :- भारत हा प्रचंड लोकसंख्येचा देश, नैसर्गिक साधनसंपत्तीने परिपूर्ण देश. जगातील अनेक देशांत कुठे वर्षभर प्रचंड पाऊस, कुठे प्रचंड पाणी, तर कुठे प्रचंड दुष्काळ, वाळूचे वाळवंट, धुळीचे लोट. पेट्रोलियम तेलाच्या विहिरी आहेत, पण प्यायला पाणी नाही. काही भूप्रदेश समुद्राने वेढलेले, खाऱ्या पाण्याने जनजीवन त्रस्त. गोड्या पाण्यासाठी पावसाच्या थेंब अन् थेंब साठवण्याचा संघर्ष तेथील जनजीवनात सुरू असतो.

भारतात हे सर्वच ऋतू दिसतात. हिमालयाच्या रांगांमध्ये बर्फाचे सुंदर दर्शन होते. राजस्थानचे वाळवंट अनुभवता येते. लडाखच्या भूमीत खुरट्या वनस्पती अनुभवता येतात, तसेच बारीक वाळूचे पर्वतही अनुभवता येतात. गोड पाण्याने तुडुंब भरून वाहणाऱ्या नद्यांचा गोडवा जसा अनुभवता येतो, तसेच त्यांचे तांडव, रुद्ररूपातून प्रचंड मानवी जीवहानीही अनुभवता येते. प्रचंड पावसाच्या सरी चेरापुंजीत अनुभवता येतात.

नैसर्गिक जंगल हिरव्या शालीने पांघरलेले, अनेक औषधी वनस्पती जगवणारे, मानवाला जंगल सफारीचा आनंद देणारे — असा मोठा भूभाग भारतात आहे. अनेक खनिजे इथल्या मातीच्या गर्भात दडलेली आहेत.

एवढा श्रीमंत भारत आज खंगलेला, दुर्बळ का आहे? या प्रश्नावर येथील विद्वान नेहमी प्रचंड लोकसंख्या असल्याचे कारण सांगत भारत अविकसित आहे, अशा बोंबा ठोकतात.

आज येथील सुशिक्षित तरुण मोठ्या प्रमाणात आपल्या शिक्षणाचे ज्ञान विदेशी देशांना प्रगत करण्यासाठी खर्ची घालत आहे. भारत विदेशी तंत्रज्ञानाची भीक मागत, विविध क्षेत्रांत 'आम्ही प्रगत आहोत' याच्या बोंबा ठोकत असतो.

प्रचंड मनुष्यबळ, प्रचंड नैसर्गिक साधनसामग्री तरीही भारत ७५ वर्षांच्या स्वातंत्र्यात स्वबळावर प्रगत का होत नाही?

देशाच्या पाऊलवाटा प्रचंड सिमेंट रस्त्यांत बदलत आहेत. उड्डाणपुलांच्या विळख्याने शहरे फुलत आहेत. सिमेंट-काँक्रीटच्या गगनचुंबी इमारती आकाशाला भिडत आहेत. 'इंडिया'ची ही प्रगती शेजारच्या 'भारता'ला हिणवत आहे. प्रचंड झोपड्यांमध्ये विसावलेला भारत रेशनचे धान्य मिळावे म्हणून रांगेत उभा आहे. घरकुल मिळावे म्हणून रांगा संपण्यापेक्षा वाढत आहेत.

श्रमिकांचा तुटवडा का?.  

पण याच प्रचंड लोकसंख्येच्या भारतात शेतीकामासाठी मजूर, श्रमिकांचा तुटवडा आहे. शेतातला कापूस वेचायला मजूर नाही, ऊस तोडायला मजूर नाही, संत्रा बागायतीत मजूर नाही. औद्योगिक क्षेत्रात श्रमिकांच्या अभावामुळे उत्पादन ठप्प आहे. प्रचंड लोकसंख्येची गर्दी आहे कुठे? युवापिढी हातात डिग्री घेऊन कुठल्या श्रमाची अपेक्षा करते?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अल्पशिक्षित, मराठी चार वर्ग शिकलेले. पण ते ग्रामगीता ग्रंथात 'जीवन-शिक्षण' अध्यायात लिहितात —

नुसते नको उच्च शिक्षण। हे तो गेले मागील युगी लपोन।  
आता व्हावा कष्टीक, बलवान। सुपुत्र भारताचा॥९॥ ग्रा.अ.१९  

शिक्षणातचि जीवनाचे काम। दोन्हींची सांगड व्हावी उत्तम।  
चिंता नसावी भोजनासाठी दाम। मागण्याची भीक जैसी॥१०॥ ग्रा.अ.१९

आज भारतात शिक्षणाच्या सोयी प्रचंड महागड्या, शासकीय यंत्रणेत शिक्षणाची अनास्था. सारे विचारवंत बोलतात, पण त्यांची मुले विदेशात शिकतात.

धार्मिक स्थळांना प्रचंड गर्दी . 

कुठल्याही धर्माची धार्मिक स्थळे — तेथे येणारी प्रचंड गर्दी, मानवी चेंगराचेंगरीच्या वाढत्या घटना चिंतेचा विषय आहे. हीच गर्दी श्रमामध्ये देवाचे दर्शन घेऊ शकत नाही का? भारतातील संत-महापुरुषांनी श्रमप्रतिष्ठा वाढावी म्हणून लोकजागरण केले. भक्त कबीराने शेला विणत देवभक्तीचा नवा आदर्श लोकांसमोर ठेवला. संत सावता महाराजांनी "कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी" हा मंत्र देत शेतात राबताना मला विठ्ठलाचे दर्शन घडते, ही श्रमप्रतिष्ठा शिकवली. 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विनम्रतेने संत सावता महाराजांविषयी ग्रामगीता ग्रंथात लिहितात —

पंढरीपासून सहा कोसावरि। सावता राहिला जन्मभरि।  
देव मिळविला न करिता वारी। गावीच त्याने॥५५॥ 
ग्रा.अ.२४  
जनता-जनार्दनाच्या सेवेचे। काम करिता इमाने साचे।  
गावीच पुण्य पंढरीचे। धाव घेई आपैसे॥५६॥ 
ग्रा.अ.२४

शेतीची कामे टाकून आपण यात्रा-मेळ्यात या, असे कुठल्याच संतांनी सांगितले नाही. पण आम्ही भक्तीचे प्रदर्शन करतो की भक्तीला आपल्या जीवन जगण्याचा मार्ग बनवतो?

जेथे प्रेम आणि पावित्र्य। त्यासीच नाम तीर्थक्षेत्र।  
कासया जावे गोंधळ विचित्र। बघाया तीर्थी॥५८॥ ग्रा.अ.२४  
तीर्थी कोणी खर्च न करावा। आधी गावमार्ग सुधारावा।  
तरीच तीर्थाचा पुण्य ठेवा। गावी मिळेल सेवेने॥६०॥
 ग्रा.अ.२४

मित्रांनो, भारतीय जनजीवनात सर्वच धर्मांच्या यात्रा-मेळाव्यांची गर्दी वाढत आहे. ती मानवी गर्दी राष्ट्रप्रगतीसाठी उपयोगी यावी, ही संत-महापुरुषांची अपेक्षा होती.

श्रमप्रतिष्ठेचे शिक्षण कुठे?.
  
डिग्र्यांचे शिक्षण वाढले. चार भिंतींच्या चौकटीत डॉक्टर, इंजिनिअर, कृषितज्ज्ञ बनत आहेत. अंतराळाचे शिक्षण मिळत आहे. या पुस्तकी ज्ञानाला जोपर्यंत आचरणाची जोड मिळणार नाही, तोपर्यंत ते कुचकामी ठरेल. शिक्षण खऱ्या अर्थाने प्रयोगात्मक असावे. डॉक्टर रुग्णसेवेतून घडावा, इंजिनिअर प्रत्यक्ष आचरणातून घडावा, कृषितज्ज्ञ प्रथम शेतात राबावा, तर भारतात प्रगतीच्या वाटा सर्वदूर पोहोचतील. 'डिग्री म्हणजे रोजगार' या संकल्पनेनेच या देशातील तरुणाईचा घात केला. याचे वाईट फळ आज देश भोगत आहे.

एकीकडे कामाचा डोंगर उभा आहे. श्रमिकांचे श्रम देश प्रगत करण्यासाठी हवे आहेत. मात्र भारतीय तरुण नैराश्यावस्थेत पछाडला आहे का? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात — 'जीवन शिक्षण' कुठे आहे?

दिखाऊ कपडे, कोरडी ऐट। नोकरपेशी थाटमाट।  
हे शिक्षणाचे नव्हे उद्दिष्ट। ध्यानी घ्यावे नीट हे आधी॥५॥
  ग्रा.अ.१९
  
अजब ऐसी शिक्षणाची प्रथा। जेथे कामी न ये बापाची संथा।  
बाप करी शेतीची व्यवस्था। मुलगा मागे नोकरी॥६॥ ग्रा.अ.१९

भारतात स्पर्धा परीक्षेचे पेपर फुटले - सर्वत्र हाहाकार माजला. 

पण शेती उत्पादनाला भाव नाही? ज्या अन्नाने आम्ही जगतो, त्या शेतकऱ्याला श्रमप्रतिष्ठा मिळावी, त्याच्यासाठी या देशात हाहाकार का माजत नाही?

खाद्य तेल आमच्यासारख्या कृषिप्रधान देशाला विदेशातून का मागवावे लागते? हा प्रश्न या देशातील सुशिक्षितांना पडत नसेल का? ७५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर भारत स्वयंपूर्ण कशात? उठा, जागे व्हा तरुण मित्रांनो. कागदी डिगऱ्या मिळवणे म्हणजे शिक्षण नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका भजनातून संदेश देतात —

करावे काय शिक्षण ते? कधी कामासि येईना।  
पुस्तके पाठ करुनीही, लाभ अंती नसे कोणा॥  
वैद्यकी पास जरि केली, न कळती लक्षणे काही।  
लाभ तरी का कुणा सांगा? असा हा रोज धिंगाना॥  
शेतकी शिकुनिया आले, नोकरी नाहि - घरी बसले।  
लाज वाटे स्वतः करण्या, बघा हा शेतकी-बाणा॥  
कसे जगतील जन सांगा? तया ना कर्म, ना नेकी।  
म्हणे तुकड्या हवे पैसे, कष्ट सहवे न इतरांना॥

शिक्षित तरुणांनो, हतबल होऊ नका. श्रमाची लाज सोडून श्रमप्रतिष्ठा निर्माण करा. भारताचे भवितव्य तुमच्या मनगटात आहे.

.         ‌‌‌‌            ‌  ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक  
          अभ्यासक, राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा  
                             9823966282

---

0 Response to "करावे काय शिक्षण ते? कधी कामास येईना."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article