जन्म आणि मृत्यू ऊन - सावलीचा खेळ.
बुधवार, 27 मई 2026
Comment
जन्म आणि मृत्यू हा एकच नाण्याचा दोन बाजू असून मृत्यू हे अंतिम सत्य आहे. जन्माला आल्यानंतर मृत्यू हा ठरलेला आहे तर मृत्यूनंतर जन्म हा पुन्हा ठरलेला आहे.हे सर्व ज्ञात असतानाही मनुष्य आपण गेल्यानंतर कुटुंबाचे परिवाराचं काय होईल याचाच विचार करत असतो. आपल्या मृत्यूनंतर आपल्याबरोबर काही येणार नाही ही माहीत असतानाही जीवन जगत असताना भौतिक सुखासाठी रात्रंदिवस पळतच असतो. त्याचबरोबर धनसंचय, सुख चैनीच्या व मौज मजेच्या गोष्टी खरेदी करण्यात आपला बहुतांश पैसा वाया घालवत असतो. परमेश्वराने दिलेल्या सुंदर या जन्मामध्ये जीव उगाच भ्रामक कल्पना करून आयुष्य वाया घालवतो. हा जन्म फुकट गेल्यानंतर पुढचा जन्म माणसाचाचं येईल याची खात्री नसते तरीही पुढे चांगला जन्म मिळावा याची आज धरून तो नको त्या गोष्टी करतच असतो.
पुढचा जन्म चांगला मिळावा म्हणून तो दान करतो. दान केल्यास आपला संसार सुखाचा होईल. गेल्या जन्मी काही
दान न केल्याने मी गरीबच राहिलो त्यामुळे या जन्मात तरी आपण दान करावे असं अज्ञानी माणसाला वाटते. दान करायचे म्हणून जे आपल्या उपयोगात नाही अशी जुनी वस्त्र, जुनी भांडी, जुन्या वस्तू, सद्यस्थितीत जो पैसा चलनात चालत नाही तो दान करण्याचा प्रयत्न करत असतो. दान करत असतानाही मनामध्ये काहीतरी हेतू ठेवूनच सुदान करत असल्याने त्याच्या सर्व इच्छा त्यात अडकलेले असतात.
तो विचार करतो की मी एवढं दान केलं आहे आता मला पुढच्या जन्माच्या वेळी मला एकदा श्रीमंताच्या घरी जन्म मिळेल तसेच कोटीच्या कोटी पुण्य मिळेल. तो तिर्थक्षेत्रांचा महिमा जाणतो तिथेही भरपूर प्रमाणात पुण्य मिळेल. या आशेवर राहून उरलेसुरले शिळे अन्न भिकाऱ्याला दान करतो. आपल्या घरी कोणी पाहुणा आला असता घासभर अन्न देतो, पैसा अडका देतो, आणि आशा करतो की पुढच्या जन्मात कोटीच्या कोटी रूपयांच्या राशी पायाशी लोळण घेतील. तेव्हा आपण ऐष आरामात जीवन जगू असा तो मनात विचार करत असतो. आजचा दिवस माझा नाही ना तरीही उद्याच्या दिवशी मी खुप श्रीमंत असेल अशी विनाकारण भ्रामक कल्पना तो मनात करतो. जन्म कर्माच्या फे-यात तो अडकून बसतो. कर्मामध्ये माणसाची वासना गुंतून रहाते, या जन्मी जे दान देतो ते पुढच्या जन्मी अनेक पटीने मिळेल अशी जो कल्पना करतो तो अज्ञानी असतो.
म्हणून मनुष्याने समाज जीवन जगत असताना परमेश्वराने दिलेल्या सुंदर नरदेहाचा इतरांच्या सत्कार्यासाठी व नामस्मरणासाठी वेळ दिला तर निश्चितच भावी काळासाठी उपयोगी पडेल याचाच खऱ्या अर्थाने सद्यस्थितीत विचार करणे गरजेचे आहे.
उरळीकांचन पुणे.
0 Response to "जन्म आणि मृत्यू ऊन - सावलीचा खेळ."
एक टिप्पणी भेजें