प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण.
सोमवार, 8 जून 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
भिलगाव :- स्थानिक संघपुत्त बोधीविहार भीलगाव (नागपूर) येथे संघपुत्त बोधीविहार समिती भीलगावच्या वतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, विभागीय मंडळ नागपूर अंतर्गत घेतलेल्या मार्च २०२६ मधील दहावी व बारावीच्या परीक्षेत भिलगाव परिसरातील प्राविण्यप्राप्त सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक ७ जून २०२६ रोजी संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डाॅ . शंकर बागडे होते.मुख्य मार्गदर्शक म्हणून सेंट विन्सेंट पलौटी काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी नागपूर येथे कार्यरत असलेल्या प्रा. डाॅ . शुभांगी चवरे मॅडम उपस्थित होत्या. विशेष अतिथी म्हणून वंदनीय भन्ते पटीसन आणि मुख्य अतिथी म्हणून आयु. निर्मलाताई वाघधरे उपस्थित होत्या. याप्रसंगी प्रास्ताविक भाषण संघपुत्त बोधीविहार समितीचे कार्याध्यक्ष मा. सिद्धार्थ बागडे यांनी केले.
याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक प्रा. डॉ. शुभांगी चवरे मॅडम ह्यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले . पालकांनी विद्यार्थ्यांच्या इच्छेविरुद्ध कोणताही अभ्यासक्रम लादू नये यावर जोर देतांना इंजिनिअरिंग, मेडिकल याव्यतिरिक्त भरपूर ऑप्शन्स अव्हेलेबल आहेत , त्याकडेही विद्यार्थ्यांनी चाचपणी करावी असे त्यांनी मार्गदर्शन केले .
या समारंभाच्या मुख्य अतिथी म्हणून लाभलेल्या आयु. निर्मलाताई वाघधरे ह्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना घर सोडावं लागतं , गाव - शहर सोडावं लागतं , एवढंच काय तर राज्य - देशही सोडावा लागतो . पण अशाही स्थितीत तथागत बुद्धांच्या पंचशीलांचा तसूभरही विसर पडू न देता विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा अशाप्रकारचे अनमोल मार्गदर्शन केले .
अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषण करतांना प्रा. डाॅ शंकर बागडे ह्यांनी सांगितले की, समस्त विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून अधिकाधिक पदव्या संपादन कराव्या, अधिकाधिक तास अभ्यास करावा, अधिकाधिक ग्रंथाचे वाचन करावे, अधिकाधिक ग्रंथ विकत घ्यावे. विश्वविख्यात असलेल्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श समोर ठेवून आणि विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून आत्मविश्वासाने प्रयत्न करीत वाटचाल करावी असे मोलाचे मार्गदर्शन केले .
या समारंभात उच्च माध्यमिक(एच. एस. एस. सी.) परीक्षेतील प्राविण्यप्राप्त विद्यार्थी तनिष्क त्रिशूल गवळी, प्रग्या शैलेश बोरकर, आदित्य विरेंद्र सोनटक्के, ओजस कुशल नारनवरे, शार्दूल विलास मेश्राम तसेच माध्यमिक (एस. एस. सी.) परीक्षेतील प्राविण्यप्राप्त विद्यार्थी अक्षांश अनिल पांडे, सारा नरेंद्र कांबळे, सौम्या कमलकिशोर श्रीचंदानी, ईश्वरी जगदीश गायकवाड, संकल्प सिंग जयप्रकाश सिंग, मोनाली ईश्वर डोंगरे, विराज श्रीकांत राऊत, अर्णव मनीष दिवेकर,अनुराधाकुमारी आशुतोष, रोहन संजयकुमार रंगारी, मयूर भूषण कराडे,अथर्व शेषराज शेलारे,जान्हवी किशोर राऊत,तनुष्का विनोद सावळे,शाक्य सावंत साबळे,श्रेयशी सतीश कोटांगले,सृष्टी प्रमोदकुमार सिंग, अरीबा फातमा सलिम जावेद या सर्व विद्यार्थ्यांचा ट्राॅफी , प्रशस्तिपत्र व स्वीट सहीत पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
याव्यतिरिक्त विशेष गुणगौरवामध्ये आयु. साईल ईश्वर डोंगरे ह्या विद्यार्थ्यांने JEE(Advanced ) उत्तीर्ण होवून IIT मधील प्रवेश सुनिश्चित केला .तसेच आयु. अर्षिता अधीरकुमार गजभिये ह्यांनी M.Sc. नंतर Qualifying Entrance Exam उत्तीर्ण होऊन PhD करीता प्रवेश मिळविला . म्हणून या दोघांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. त्रिशूल गवळी यांनी केले तर आभार प्रदर्शन संघपुत्त बोधीविहार समितीचे सचिव आयु. सुनील चवरे यांनी केले. या समारंभात गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व शुभचिंतक, उपासक व उपासिका यांची बहुसंख्येनी उपस्थिती होती .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघपुत्त बोधीविहार समिती भीलगावच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. या समारंभाची सांगता अल्पोपहाराने करण्यात आली .
0 Response to "प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण."
एक टिप्पणी भेजें