"प्रशासनाने समस्येची कबुली दिली; मग कारवाई कधी?".
बुधवार, 24 जून 2026
Comment
• समता चौक जलमय प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र म्हणजे अपयशाची कबुली – सिद्धार्थ बनसोड
अविनाश गोंडाणे
"साप्ताहिक जनता की आवाज"
बडनेरा :- समता चौक येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक परिसरात साचणारे पावसाचे पाणी, उखडलेला रस्ता आणि नागरिकांना होणारा प्रचंड त्रास याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर आपल्या आज दि.24 जून 2026 रोजीच्या पत्राद्वारे वस्तुस्थिती मान्य केली आहे. मात्र, ही कबुली जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे.
विभागाने स्वतः मान्य केले आहे की रस्ता खालच्या पातळीवर असल्याने पाणी साचते, निचऱ्याची व्यवस्था नाही, वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात पाणी शिरण्याचा धोका आहे. मग प्रश्न असा आहे की ही परिस्थिती माहिती असूनही आजपर्यंत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी झोपेत होते का?
"प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे", "निधीची प्रतीक्षा आहे" आणि "मान्यता मिळाल्यानंतर काम होईल" ही उत्तरे नागरिकांना आता मान्य नाहीत. प्रत्येक पावसाळ्यात जनतेला चिखल, खड्डे आणि साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागतो, तर प्रशासन फक्त कागदोपत्री हालचाली करत राहते.
विशेष म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या मागील परिसराची ही अवस्था असताना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. स्मारक परिसर जलमय होतो, नागरिक त्रस्त होतात, वाहतूक विस्कळीत होते; पण फोटोसेशन आणि उद्घाटनांमध्ये व्यस्त असलेल्या सत्ताधाऱ्यांना हे दिसत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
जर सार्वजनिक बांधकाम विभागाला समस्येची पूर्ण जाणीव आहे, तर तातडीची निचरा व्यवस्था आणि रस्त्याची दुरुस्ती आजपर्यंत का झाली नाही? एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार आहे का?
आम्ही प्रशासनाला स्पष्ट इशारा देत आहोत की, येत्या सात दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही तर समता चौक येथे साचलेल्या पाण्यात उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल. यासोबतच संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेविरोधात जनआंदोलन उभारले जाईल.
जनतेला आश्वासनांची नाही, तर कृतीची गरज आहे. प्रशासनाने आता पत्रव्यवहार थांबवून प्रत्यक्ष काम सुरू करावे, अन्यथा या प्रश्नावर जनक्षोभ उसळल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर राहील असा इशारा सिध्दार्थ बनसोड , सचिव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समिती यांनी दिला आहे.
0 Response to ""प्रशासनाने समस्येची कबुली दिली; मग कारवाई कधी?"."
एक टिप्पणी भेजें