मराठवाड्यात यंदा भरपूर पाऊस पडावा यासाठी रत्नेश्वरी मातेला साकडे घालण्यासाठी २७ वी रत्नेश्वरी पाऊस दिंडी.
शनिवार, 27 जून 2026
Comment
• रविवारी दि, २८ जुन रोजी सकाळी ६ वाजता बालाजी मंदिर मोंढा येथून निघणार..
विजय चौडेकर
"साप्ताहिक जानता की आवाज"
नांदेड :- मराठवाड्यात यंदा भरपूर पाऊस पडावा, जलसाठे भरावेत, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे तसेच यंदाची अमरनाथ यात्रा निर्विघ्न व यशस्वी पार पडावी, यासाठी रत्नेश्वरी मातेला साकडे घालण्यासाठी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २७ वी रत्नेश्वरी पाऊस दिंडी रविवारी, दि. २८ जून रोजी सकाळी ६ वाजता बालाजी मंदिर, जी. जी. रोड, नांदेड येथून उत्साहात निघणार आहे.
अमरनाथ यात्री संघ, भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर आणि लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण ,खा.डॉ. अजित गोपछडे, भाजपा महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे व ॲड. चैतन्य देशमुख, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंह गाडीवाले, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे, जिल्हा सरचिटणीस विजय येवणकर, शीतल खांडील, विजय गंभीरे, सुषमा थोरात तसेच लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
ढोल ताश्यांच्या गजरात निघणाऱ्या या दिंडीचे विविध ठिकाणी सामाजिक संस्था, भाविक व नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. बालाजी मंदिर येथे कैलाश महाराज वैष्णव, लातूर फाटा येथे पवन गुरखुदे, असर्जन कमान येथे ईश्वर धाबा, विष्णुपुरी येथे डॉ. संतुकराव हंबर्डे आणि झरी येथे नितीन पाटील झरीकर यांच्या वतीने चहा, नाश्ता व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. रत्नेश्वरी येथे सौ. जयश्री जायस्वाल यांच्या सौजन्याने भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेकरूंसाठी पिण्याचे पाणी, उसाचा रस तसेच इतर आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
नांदेड ते रत्नेश्वरी गड या संपूर्ण मार्गावर सहभागी यात्रेकरू जांभूळ, सीताफळ, लिंबोळी, आंबा, करंज, बाभूळ आदी विविध वृक्षांच्या हजारो बिया पेरणार असून, विद्यार्थ्यांनी तयार केलेले शेकडो सीड बॉल जंगल परिसरात व डोंगरमाथ्यावर टाकण्यात येणार आहेत. दिनेश मोरताळे यांच्या सौजन्याने सीड बॉलचे वितरण करण्यात येणार आहे. गेल्या २६ वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे नांदेड-रत्नेश्वरी मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षसंवर्धन झाले असून अनेक झाडे आज हिरवाईची साक्ष देत आहेत.
रत्नेश्वरी गडावर पोहोचल्यानंतर सामूहिक आरती करून मराठवाड्यात भरपूर पाऊस, शेतकऱ्यांचे सुखसमृद्ध जीवन, पर्यावरण संरक्षण आणि २७ व्या आणि २८ व्या अमरनाथ यात्रेच्या यशासाठी रत्नेश्वरी मातेला साकडे घालण्यात येणार आहे.
धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी नांदेडकरांना मोठ्या संख्येने या पर्यावरणपूरक व धार्मिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सामाजिक कार्यकर्ता, विजय चौडेकर,
0 Response to "मराठवाड्यात यंदा भरपूर पाऊस पडावा यासाठी रत्नेश्वरी मातेला साकडे घालण्यासाठी २७ वी रत्नेश्वरी पाऊस दिंडी."
एक टिप्पणी भेजें