लाखनी नगरपंचायतीचा भोंगळ कारभार उघड; घाणीच्या विळख्यात प्रभाग क्र. ६, नागरिक संतप्त..
मंगलवार, 9 जून 2026
Comment
• लकचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या नाल्या आणि दुर्गंधीने नागरिक हैराण; स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह?..
रोशन खोब्रागडे
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- लाखनी नगरपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या प्रभाग क्र. ६ मध्ये पाहायला मिळत आहे. नियमित साफसफाईचा अभाव, जागोजागी साचलेला कचरा, तुंबलेल्या नाल्या आणि परिसरात पसरलेली दुर्गंधी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नगरपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रभागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप करीत आहेत. रस्त्यांची दुरवस्था, अनियमित पाणीपुरवठा, साचलेले सांडपाणी आणि कचऱ्याचे वाढते साम्राज्य यामुळे परिसरातील जीवनमान खालावले आहे. विकासकामांच्या मोठमोठ्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पावसाळ्यापूर्वीच आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
पावसाळा तोंडावर असताना नाल्यांची योग्य साफसफाई न झाल्याने सांडपाणी जागोजागी साचले आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तक्रारींचा पाऊस, प्रशासनाचे मौन
स्थानिक नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयात अनेकदा तोंडी तसेच लेखी तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासनांची खैरात केली जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नियंत्रण नसल्याने परिस्थिती आणखी बिघडत चालल्याचेही सांगण्यात आले.
"कर भरतो, पण सुविधा कुठे?"
"आम्ही नियमित घरपट्टी, पाणीकर आणि स्वच्छता कर भरतो. मग आम्हालाच घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छतेत का राहावे लागते? अधिकारी एसी कार्यालयातून बाहेर पडून शहराची वास्तविकता कधी पाहणार?" असा संतप्त सवाल प्रभागातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून कचरा हटवावा, नाल्यांची सफाई करावी आणि आरोग्यविषयक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा नगरपंचायत कार्यालयावर 'कचरा फेको' आंदोलन, धरणे आंदोलन किंवा तीव्र निदर्शने छेडण्यात येतील, असा इशारा स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
"नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवा, अन्यथा जनआक्रोशाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा," असा स्पष्ट संदेश नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाला दिला आहे.
0 Response to "लाखनी नगरपंचायतीचा भोंगळ कारभार उघड; घाणीच्या विळख्यात प्रभाग क्र. ६, नागरिक संतप्त.."
एक टिप्पणी भेजें