-->
धोक्यात असणारा पत्रकारितेचा धर्म वाचवा - संदीप काळे.

धोक्यात असणारा पत्रकारितेचा धर्म वाचवा - संदीप काळे.

• भंडाऱ्यात विदर्भातील १ हजार पत्रकारांच्या उपस्थितीत ‘पत्रकार हक्क परिषद’.

• ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पुढाकारातून विदर्भात पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना.

              नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा, (प्रतिनिधी): “संपूर्ण जगाच्या लोकशाहीचा आणि समाजव्यवस्थेचा आधार पत्रकारितेवर आहे. समाजाला दिशा देणारी, सत्तेला जाब विचारणारी आणि जनतेचा आवाज बनणारी पत्रकारिता आज अनेक अडचणींच्या विळख्यात सापडली आहे. राजकीय दबाव, सामाजिक आव्हाने आणि बदलत्या परिस्थितीमुळे पत्रकारिता आपला मूळ धर्म गमावण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. त्यामुळे धोक्यात आलेला पत्रकारितेचा धर्म वाचविण्यासाठी सर्व पत्रकार, संपादक, माध्यम संस्थांचे प्रतिनिधी आणि पत्रकारितेशी संबंधित प्रत्येक घटकाने एकत्र येऊन संघर्ष उभारला पाहिजे. ही केवळ पत्रकारांची लढाई नसून लोकशाहीच्या अस्तित्वाची लढाई आहे,” असे भावनिक आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्हीओएम इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले.

भंडारा येथील पोलीस बहुउद्देशीय सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय ‘पत्रकार हक्क परिषद’ व कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या परिषदेला विदर्भातील एक हजारावून अधिक पत्रकार पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, माध्यमांसमोरील सध्याची आव्हाने, बदलत्या माध्यमविश्वातील जबाबदाऱ्या आणि संघटित पत्रकार शक्तीची आवश्यकता यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

“पत्रकारिता ही केवळ उपजीविकेचे साधन नाही, तर समाजाप्रती असलेली नैतिक जबाबदारी आहे. सत्याचा शोध घेण्यासाठी अनेक पत्रकार स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची आणि भविष्याची पर्वा न करता काम करतात. मात्र आज पत्रकारांवर हल्ले होतात, खोटे गुन्हे दाखल होतात, आर्थिक असुरक्षितता वाढत आहे आणि अनेकांना मूलभूत संरक्षणही मिळत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी संघटितपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे,” असेही काळे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आपण येथे केवळ समस्या मांडण्यासाठी जमलो नाही, तर त्यावर उपाय शोधण्यासाठी आलो आहोत. संघटित पत्रकार हीच सर्वात मोठी ताकद आहे. आपण एकजुटीने उभे राहिलो तर कोणतीही शक्ती पत्रकारितेचा आवाज दाबू शकणार नाही. व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्हीओएम इंटरनॅशनल फोरमने पत्रकारांचे घर, आरोग्य, शिक्षण, कौशल्यविकास आणि सामाजिक सुरक्षेसाठी सातत्याने काम केले आहे. मात्र हा प्रवास एका संस्थेचा नसून प्रत्येक पत्रकाराचा आहे.”

“आपण स्पर्धक नाही, तर सहकारी आहोत. विचारभिन्नता असू शकते, पण पत्रकारितेच्या हितासाठी आपण एकदिलाने उभे राहिले पाहिजे. पत्रकारिता वाचली तरच लोकशाही मजबूत राहील आणि लोकशाही मजबूत राहिली तरच सामान्य नागरिकाचा आवाज जिवंत राहील,” असे आवाहन करत त्यांनी उपस्थित पत्रकारांना पत्रकारितेच्या सन्मान, सुरक्षितता आणि स्वातंत्र्यासाठी एकत्रितपणे लढण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष नरेंद्र देशमुख, विदर्भ विभागाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार, भंडारा जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर, जिल्हा अध्यक्ष नागपूर दिलीप घोरमारे, गडचिरोली जिल्हा प्रवक्ते नसिर हाशमी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पुढाकारातून विदर्भात पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना हाती घेण्यात आल्या ज्यातून विमा, मुलांचे शिक्षण यांची सुरुवात करण्यात आली. 
विशेष अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, उद्योजक जयंत गज्जर, जॅकी रावलानी, डिम्पल मल्होत्रा, रूपेश टांगले तसेच जिल्हाधिकारी सावन कुमार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी उपस्थिती लावली. सायंकाळी पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार डॉ. परिणय फुके, नरेंद्र भोंडेकर, नाना पटोले, राजू कारेमोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके, माजी खासदार सुनील मेंढे, माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी बॉलिवूड गायिका राधा खुळे आणि प्रणय सतलज यांच्या “पाटलांचा बैलगाडा” या संगीतमय कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भंडारा जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पुढाकारातून विदर्भात पत्रकारांसाठी कल्याणकारी योजनाची सुरुवात आणि पत्रकार हक्क परिषदचे उद्घाटन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘व्हीओएम इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले,राज्य कार्याध्यक्ष नरेंद्र देशमुख, विदर्भ विभागाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

0 Response to "धोक्यात असणारा पत्रकारितेचा धर्म वाचवा - संदीप काळे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article