गुरुद्वारा भागातील एसआयआर अंतर्गत मतदार नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.
रविवार, 12 जुलाई 2026
Comment
विजय चौडेकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड :- ११ जुलै: भारत निवडणूक आयोगाने घोषित केल्याप्रमाणे मतदारयादीचे विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम राज्यभर सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत गणना प्रपत्रांचे (एनुमरेशन फॉर्म) वितरण व संकलन करण्याचा कालावधी दि. ३० जुन २०२६ ते २९ जुलै २०२६ पर्यंत आहे.
गुरुद्वारा परिसरातील मतदारांना आपली गणना प्रपत्रे अचूक भरणे व जमा करणे सुलभ व्हावे यासाठी गुरुद्वारा गेट नं 4 समोर शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.* या शिबिरामध्ये गुरुद्वारा परिसर,शहीदपुरा,बडपुरा,अबचलनगर, दशमेशनगर, चिखलवाडी या भागातील १२ बीएलओ सहभागी झाले होते.
या शिबिरास सकाळी ९:०० वाजल्यापासूनच चांगला प्रतिसाद मिळाल्याने मतदारांची गर्दी झाली होती.मतदारांना त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या मतदार ओळखपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असल्याने दिवसभरात मोठ्या प्रमाणावर गणना प्रपत्रांचे संकलन झाले. *या शिबिरास मतदार नोंदणी अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नितीन गाढवे यांनी भेट देऊन बीएलओना मार्गदर्शन व आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे जत्थेदार संत श्री. बाबा कुलवंत सिंघ जी हुजूर साहेब यांचा फॉर्म मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या हस्ते भरण्यात आला. बाबाजींनी एसआयआर कार्यक्रमाची सविस्तर माहिती घेतली व या राष्ट्रीय कार्यक्रमात सर्व मतदारांनी सहभागी होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. यावेळी हरजीत सिंघ कडेवाले, अमरजीत सिंघ कुंजीवाले, गुरमीत सिंघ नवाब,क्षेत्रिय अधिकारी गौतम कवडे, सतपाल सिंघ शिलेदार, मंजीत सिंघ संधू इ. उपस्थित होते. सदर शिबिरास मनपाचे विद्यमान व माजी सदस्यांचे सहकार्य लाभले. हे शिबीर उद्या रविवार दि. १२ जुलै रोजीही सुरू राहणार असून ८७- नांदेड दक्षिण मतदारसंघांतर्गत गुरुद्वारा परिसरातील यादी भाग क्र. 11,12,13,35,36,37,46,47,48,55,56,57,58,68,69,70,73,74 मध्ये समाविष्ट मतदारांनी शिबिरात सहभागी होऊन आपले फॉर्म भरू घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
0 Response to "गुरुद्वारा भागातील एसआयआर अंतर्गत मतदार नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद."
एक टिप्पणी भेजें