आत्महत्या नको करू
शनिवार, 11 जुलाई 2026
Comment
अरे शेतकरी दादा
असा कमजोर कसा
आत्महत्याची मनात
कशी येते अवदसा !!
जरा आठव आठव
तू तुह्येच बाप दादा
किती दुष्काळ आपत्ती
आल्या त्यांच्यावर गदा !!
लाल मिलो, मका मुंग
खाल्ली जवं चुरी भुशी
दुःखा पेक्षा होती त्याले
लई जगण्यात खुशी !!
झाडपाल्याण जगोलं
फांजी अंबाडी तरोटा
नाही सोडलं अवसान
बाप सांभाळे घरोटा !!
जातिवंत शेतकरी
रोज झुंजतो मृत्यूशी
जलदैत्य अलनिनो
लढू आम्ही दुष्काळाशी !!
अरे उधान वाऱ्यात
खोपा उडाला उडाला
कावळ्यान चिमणीन
सांग कधी जीव देला !!
आला पूर महापूर
पाणी घुसलं बिळात
दिसलेका किडे मुंग्या
सरकारी दरबारात !!
होईल ते होऊ दे
अवसान नको हारू
भावा, सवंगड्या फक्त
आत्महत्या नको करू !!
✍️✍️वासुदेव महादेवराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक(सेनि)
अकोला 9923488556.
0 Response to "आत्महत्या नको करू "
एक टिप्पणी भेजें