खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड महापालिकेत प्रलंबित विकासकामांची मॅरेथॉन आढावा बैठक.
रविवार, 12 जुलाई 2026
Comment
• बैठकीस नागरिक, नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती.
विजय चौडेकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड (प्रतिनिधी) दि.११ जुलै :- नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित विकासकामे जलदगतीने पूर्ण व्हावीत आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा तात्काळ निपटारा व्हावा, यासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण* यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि.११.०७.२०२६ रोजी सांयकाळी ५.०० वाजता महानगरपालिका कार्यालयात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आणि वाहतूक कोंडी यांसारख्या विविध ज्वलंत मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व अधिकाऱ्यांना कडक निर्देश देण्यात आले.
या बैठकीला महापौर सौ.कविता संतोष मुळे, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, आ.अमरनाथ राजुरकर स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, महिला बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, माजी सभापती किशोर स्वामी* यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, अभियंता, विविध प्रभागातील नगरसेवक, भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि शहरातील विविध भागांतून आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागरिकांनी थेट लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसमोर आपल्या भागातील समस्या मांडल्या.
या बैठकीत प्रामुख्याने बोरबन भागातील मोकळ्या जागेत उद्यान विकसित करणे, तारासिंग मार्केट मधील रस्ता, जंगमवाडी व वजिराबाद मधुन जाणारा डी.पी.रस्ता, आसरानगर नागरी वस्तीवरील आरक्षण रद्द करणे, आसरानगर पाण्याची पाईप लाईन, तरोडा (खु) भागातील प्रस्तावित गॅस स्टेशन, असदवण येथील मुख्य रस्ता, नदिम कॉलनी गाडेगाव रस्ता व इंदिरा नगर ते शोभा नगर येथील मनपाच्या जागेवरील अतिक्रमित जागा मोकळी करणे या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करुन सदरील कामे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश खा.चव्हाण यांनी दिले आहेत.
खा.अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन..
"नांदेडकरांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणे हे आमचे कर्तव्य आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचे जाळे, पाणी आणि मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी मिळून काम केले पाहिजे. कामात दिरंगाई करणाऱ्या किंवा निष्काळजीपणा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. सर्व प्रलंबित प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे."
नागरिक व नगरसेवकांचा थेट संवाद.
बैठकीदरम्यान विविध प्रभागांतील नगरसेवकांनी आपापल्या भागातील प्रलंबित विकासकामांची माहिती खा.चव्हाण यांच्याकडे सादर केली. नागरिकांनी देखील प्रभागातील प्रलंबित रस्ते, ड्रेनेज लाईन, पथदिवे आणि कचरा संकलनाबाबतच्या तक्रारी थेट मांडल्या. या सर्व समस्यांवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेवरच उत्तर देऊन निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
0 Response to "खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड महापालिकेत प्रलंबित विकासकामांची मॅरेथॉन आढावा बैठक."
एक टिप्पणी भेजें