अशोकनगर (फुलमोगरा) येथे महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांवरील कथित पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा मोर्चा.
गुरुवार, 23 जुलाई 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा :- दि. 23 जुलै 2026 : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील अशोकनगर (फुलमोगरा) येथील ग्रामस्थांनी गुरुवारी (23 जुलै) शांततापूर्ण मोर्चा काढत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांवर दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात झालेल्या कथित पोलिसी कारवाईचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच NEET परीक्षा गैरव्यवहार आणि पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी एकत्र येत आंदोलन केले.
मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी "विद्यार्थ्यांचे शिक्षण हा हक्क आहे, व्यापार नाही", "पेपरफुटी थांबवा", "विद्यार्थ्यांना न्याय द्या" अशा घोषणा देत सरकारकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली. आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध व्यक्त केला. तसेच आंदोलकांनी विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन झाल्याच्या आरोपांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
मोर्चात सहभागी नागरिकांनी सांगितले की, शिक्षण व्यवस्था पारदर्शक आणि विश्वासार्ह राहण्यासाठी पेपरफुटी व परीक्षा गैरव्यवहाराच्या घटनांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. लोकशाही व्यवस्थेत विद्यार्थ्यांना शांततापूर्ण पद्धतीने आपली भूमिका मांडण्याचा अधिकार असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनात सनम गेडाम, राजेश रोडगे, निशांत रामटेके, तनोज बडगे, डॉ. देवानंद नंदागवळी, अतुल गेडाम, राजेश सूर्यवंशी, संदेश वासनिक, रवी बडगे, झिबल सरादे, प्रतिमा सरादे, भावना घरडे, सुशीला रामटेके, प्रियंका बागडे, प्रियंका गेडाम, कुमुद बडगे, सुनीता घरडे, मुकेश बागडे, दिनेश बागडे, सचिन कांबळे, मनोहर बागडे, विकास सुखदेवे, रेखा मेश्राम, माधुरी गजभिये, शालू घरडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले.
0 Response to "अशोकनगर (फुलमोगरा) येथे महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांवरील कथित पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा मोर्चा."
एक टिप्पणी भेजें