दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड.
बुधवार, 15 जुलाई 2026
Comment
• ७ दुचाकींसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्तः एलसीबीची कारवाई !.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
गोंदिया :- गोंदिया जिल्हा आणि परिसरातून महागड्या दुचाकी चोरणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ बुलेट आणि ४ इतर दुचाकी असा एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, मध्यप्रदेशातील ३ आरोपींसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.
सविस्तर असे की, रावणवाडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या दासगाव येथील रहिवासी मनोज दामोदर कटकवर यांची काळ्या रंगाची बुलेट (ता. ९ जुलै) रोजी रात्रीच्या सुमारास घराच्या अंगणातून चोरीला गेली होती. तसेच, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील बरबसपुरा येथील जयेंद्र भोजराज नागपुरे यांचीही पिवळ्या-तपकिरी रंगाची बुलेट त्याच रात्री घराच्या पोर्चमधून चोरी झाली. या दोन्ही घटनांबाबत संबंधित पोलीस ठाण्यांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीच्या पथकाने शोधमोहीम तीव्र केली. पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहिती
आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना संशयितांची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून खैरलांजी (जि. बालाघाट, म.प्र.) येथील निखिल सुंदरलाल राहांगडाले (२०) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपले साथीदार रोहित माने, वरुण खुळसाम, नयन ठाकरे व एका विधीसंघर्षित बालकाच्या मदतीने दासगाव, बरबसपुरा, भोसा (आमगाव), बोरगाव (कवलेवाडा), एकोडी व इतर भागांतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेच्या पथकाने तत्परतेने शोध घेत रोहित नरेंद्र माने व एका विधीसंघर्षित बालकाला डोंगरमाली येथून ताब्यात घेतले. त्यानंतर मध्यप्रदेशातील बल्लारपूर (ता. लालबर्रा, जि. बालाघाट) येथे धाड टाकून चोरीच्या गाड्या खरेदी करणाऱ्या
नयन भानुप्रसाद ठाकरे (१९) याला जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून चोरीच्या सर्व ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे व एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. अभिषेक जंगमवार, स. पो. नि. अमरदीप खाडे, पोहवा संजय चौहान, दीक्षितकुमार दमाहे, सुबोधकुमार बिसेन, इंद्रजित बिसेन, सोमेंद्रसिंह तुरकर, रियाज शेख, भोजराज बहेकार, राजकुमार खोटेले, सुजित हलमारे, छगन विठ्ठले, राम खंदारे आणि विलेश ठाकरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. जप्त मुद्देमाल व आरोपींना पुढील कारवाईसाठी गोंदिया ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
0 Response to "दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड."
एक टिप्पणी भेजें