-->
" बाबुराव बागुल आधुनिक मराठी साहित्यातील विद्रोही आंबेडकरवादी प्रवाहाचे प्रमुख उद्गाते आणि प्रवर्तक "

" बाबुराव बागुल आधुनिक मराठी साहित्यातील विद्रोही आंबेडकरवादी प्रवाहाचे प्रमुख उद्गाते आणि प्रवर्तक "


                   आधुनिक मराठी साहित्यातील विद्रोही आंबेडकरवादी प्रवाहाचे प्रमुख उद्गाते आणि प्रवर्तक,
दलित साहित्यातील एक युगप्रवर्तक साहित्यकार, क्रांतिकारी आणि विद्रोही कथाकार,लेखक व कवी, आपल्या लेखनातून दलित, शोषित आणि उपेक्षित समाजाच्या वेदनांना वाचा फोडून मराठी साहित्याला एक नवी दिशा देणारे बाबुराव रामजी बागूल यांच्या दि.१७ जुलै २०२६ रोजी असलेल्या ९६ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥

      पुरोगामी साहित्यिक बाबुराव बागुल यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील विहितगाव येथील एका अत्यंत गरीब कुटुंबात १९३० सालातील जुलै मासाच्या १७ तारखेला झाला.गरिबी आणि सामाजिक विषमतेचे चटके त्यांनी बालपणापासूनच अत्यंत जवळून अनुभवले होते.त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नाशिक आणि मुंबई येथे झाले. उदरनिर्वाहासाठी त्यांनी कोहिनूर मिलमध्ये कामगार आणि माटुंगा रेल्वे यंत्रशाळेत १२ वर्षे नोकरी केली.पुढे सन - १९६८ मध्ये केवळ साहित्याला पूर्ण वेळ देण्यासाठी त्यांनी रेल्वेच्या सुरक्षित नोकरीचा राजीनामा दिला होता. बाबुराव बागुलांच्या विचारांवर आणि साहित्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,कार्ल मार्क्स तसेच मॅक्झिम गॉर्की आणि श्रेष्ठ रशियन कथाकार व नाटककार आंतोन चेखव यांच्या क्रांतिकारी विचारांचा मोठा प्रभाव होता.

      सन -१९६३ मध्ये त्यांचा 'जेव्हा मी जात चोरली होती' हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्याने संपूर्ण मराठी साहित्यात खळबळ उडवून दिली.या कथासंग्रहाने प्रस्थापित मराठी साहित्यातील पांढरपेशा संस्कृतीला तडा देऊन झोपडपट्ट्या आणि फूटपाथवरील भणंग जगण्याचे वास्तव मांडले. 'मरण स्वस्त होत आहे' (१९६९). 'सूड' (१९७०) आणि 'अघोरी' या कादंबऱ्या, 'साहित्य आजचे क्रांतिविज्ञान' (१९८१) आणि 'आंबेडकर भारत'हे वैचारिक ग्रंथ लिहून वैचारिक क्रांती केली. 

प्रखर वास्तववाद,जिवंत व विद्रोही भाषाशैली आणि समाजातील क्रूरतेचे भेदक चित्रण ही त्यांच्या लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये होती.त्यांच्या साहित्यात 'स्त्रीप्रधान कथालेखन' महत्त्वाचे मानले जाते. 'सूड' सारख्या कथांमधून त्यांनी दलित व शोषित स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि त्यांची विदारक स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने मांडली.
         पुरोगामी साहित्यिक बाबुराव बागुल यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांच्या 'मरण स्वस्त होत आहे' या कथासंग्रहासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा १९७० ला प्रतिष्ठित 'हरिनारायण आपटे पुरस्कार' मिळाला.२००५ मध्ये त्यांना 'महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कारा'ने देखील सन्मानित करण्यात आले.

         सन -१९८१ ला प्रकाशित झालेल्या आंबेडकर भारत' या ग्रंथात त्यांनी भारतीय समाजव्यवस्था, संस्कृती आणि डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची प्रस्तुतता यावर मूलभूत चिंतन मांडले आहे.त्यांच्या मते देव,देश आणि धर्मापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे,कारण या सर्व गोष्टी माणसानेच स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केल्या आहेत.त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृतीमधील अंतर्विरोध उघड करून जातिव्यवस्थेवर आणि विषमतेवर कडाडून हल्ला चढवला.त्यांनी साहित्याला केवळ मनोरंजनाचे साधन न मानता शोषणाविरुद्ध लढण्याचे एक हत्यार (क्रांतिविज्ञान) मानले.

बाबुराव बागुल यांच्या वैचारिक साहित्याने केवळ मराठी साहित्याची क्षितिजेच विस्तारली नाहीत, तर माणसाला त्याच्या मानवी हक्कांची आणि स्वाभिमानाची जाणीव करून दिली.
      दि.२७ ऑक्टोबर २००२ रोजी रविवारला वरूड जिल्हा अमरावती येथे संपन्न झालेल्या " बहुजन फुले - आंबेडकरी साहित्य संमेलनाचे " आंबेडकरी साहित्यातील एक तेजस्वी रत्न आणि आंबेडकरी साहित्य चळवळीतील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व बाबुराव बागुल या संमेलनाचे अध्यक्ष होते.त्यांच्या हस्ते माझ्या " भद्याचं लगीन " या हुंडाविरोधी एकपात्री नाटयाचे प्रकाशन करण्यात आले होते.या साहित्य संमेलनाच्या मी संपादक असलेल्या
 "अक्षर ज्वाला" या स्मरणिकेचे प्रकाशनही बाबुराव बागुल यांच्या हस्ते झाले होते.

       महाड येथे १९७२ मध्ये झालेल्या पहिल्या अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद थोर विचारवंत आणि बंडखोर लेखक दालित साहित्यिक बाबुराव बागुल यांनी भूषविले होते.या ऐतिहासिक संमेलनातील त्यांच्या अध्यक्षीय भाषणाने मराठी साहित्याला आणि पर्यायाने संपूर्ण समाजव्यवस्थेला एक नवी दिशा दिली.ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले होते की ," दलित साहित्य हे केवळ एका विशिष्ट जातीचे नसून,ते संपूर्ण मानवी मुक्तीचा आणि वैश्विक संघर्षाचा जाहिरनामा आहे.प्रस्थापित साहित्य आणि संस्कृतीने दलितांना नेहमीच उपेक्षित आणि मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले आहे. दलित साहित्य हे केवळ करमणुकीचे साधन नसून,ते प्रस्थापित विषमतेविरुद्ध पुकारलेला एक वैचारिक विद्रोह आहे.दलित चळवळ आणि साहित्याची प्रेरणा ही प्रामुख्याने महात्मा जोतीराव फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांवर आधारलेली आहे. समाजात शतकानुशतके चालत आलेल्या अमानुष जातीव्यवस्थेने बहुजनांना आणि शोषितांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले." असे सांगून जुन्या,पारंपारिक आणि पांढरपेशा सौंदर्यशास्त्राला नाकारून, श्रमिकांच्या घामाचे आणि संघर्षाचे नवे सौंदर्यशास्त्र बाबूराव बागुल यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले. ते अध्यक्षीय भाषणात पुढे ते म्हणाले की," दलित साहित्याने माणसाला त्याची गुलामगिरी नाकारून स्वतःच्या अस्मितेची आणि स्वाभिमानाची जाणीव करून दिली पाहिजे.

देशातील आर्थिक शोषण आणि सामाजिक शोषण या दोन्ही प्रवृत्तींचा त्यांनी आपल्या भाषणात कडाडून विरोध केला. साहित्याचा अंतिम उद्देश हा केवळ दुःख मांडणे नसून,स्वातंत्र्य,समता आणि बंधुतेवर आधारित एका नव्या,शोषणमुक्त समाजाची निर्मिती करणे हा आहे.परिवर्तनवादी लेखकांनी केवळ शब्दांचे खेळ न करता, समाजात वैचारिक आणि सांस्कृतिक क्रांती घडवून आणण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे."बाबुराव बागुल यांच्या या अध्यक्षीय भाषणातील विचारांनी दलितांच्या आक्रोशाला आणि वेदनेला साहित्यातून एक आक्रमक,विद्रोही आणि क्रांतिकारी ओळख मिळवून दिली. त्यांच्या साहित्याने दलित साहित्याला केवळ एक चळवळ न ठेवता त्याला वैश्विक स्तरावर वैचारिक अधिष्ठान मिळवून दिले.

त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी मराठी साहित्यात आणि आंबेडकरी चळवळीत अत्यंत मोलाचे वैचारिक योगदान दिले आहे. त्यांनी दलित साहित्याला 'क्रांतिविज्ञान' मानले.'दलित साहित्य आजचे क्रांतिविज्ञान' या आपल्या वैचारिक ग्रंथातून त्यांनी दलित साहित्याची आंबेडकरी मीमांसा मांडली. साहित्याचा उद्देश केवळ रंजन नसून ती समाज परिवर्तनाची आणि क्रांतीची मशाल आहे, हा विचार त्यांनी रुजविला. 'दलितांचे मानवीकरण करून त्यांचा आत्मसन्मान जागविला.बाबासाहेबांच्या 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या संदेशाला त्यांनी आपल्या साहित्यातून जिवंत केले आणि स्वतःच्या कथा-कादंबऱ्यांमधून दलितांना केवळ लाचार किंवा पीडित न दाखविता, अन्यायाविरुद्ध बंड करून उठणारा आणि स्वतःच्या मानवी हक्कांसाठी लढणारा 'विद्रोही माणूस' उभा केला.दलित पॅंथर्सचे वैचारिक नेतृत्व त्यांनी केले.

 सन-१९७२ मध्ये जेव्हा महाराष्ट्रात 'दलित पॅंथर' या आक्रमक तरुण आंबेडकरी चळवळीचा उदय झाला, तेव्हा बागुलांनी तिच्या वैचारिक बांधणीत मोठी भूमिका बजावली होती. त्यांनी दलित पॅंथरच्या जाहिरनाम्याचा (Manifesto) मसुदा तयार करण्यात आणि चळवळीला दिशा देण्यात महत्त्वाचे वैचारिक योगदान दिले आहे. सरंजामी मानसिकतेवर त्यांनी प्रहार केले.बाबुराव बागुलांनी आपल्या "जेव्हा मी जात चोरली होती", "मरण स्वस्त होत आहे" आणि "वेदाआधी तू होतास" यांसारख्या साहित्यातून जातीव्यवस्थेचे क्रूर वास्तव मांडले. हिंदू धर्मशास्त्रांनी लादलेली विषमतेची उतरंड मोडून काढण्यासाठी आंबेडकरी विचारच कसा एकमेव पर्याय आहे, हे त्यांनी ठासून सांगितले.वर्ग आणि जातीच्या संघर्षाची सांगड त्यानी घातली. मार्क्सवादी विचार आणि आंबेडकरवादी विचार यांचा समन्वय साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. केवळ आर्थिक भांडवलशाहीच नव्हे, तर सामाजिक विषमतेची भांडवलशाही संपवल्याशिवाय खरा आंबेडकरवाद पूर्ण होऊ शकत नाही,हा वैचारिक दृष्टिकोन त्यांनी आंबेडकरी चळवळीला दिला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला वैचारिक लढा बाबुराव बागुलांनी साहित्याच्या आणि सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून जनमानसात पोहोचविला आणि आंबेडकरी चळवळीला एक नवी बौद्धिक आणि विद्रोही धार दिली.अशा या महान क्रांतिकारी आणि विद्रोही आंबेडकरवादी लेखक- कवी- कथाकार बाबुराव बागुल दि.२६ मार्च २००८ रोजी अनंतात विलिन झाले.दि.१७ जुलै २०२६ रोजी असलेल्या ९६ व्या जयंती निमित्त बाबुराव बागुल यांना विनम्र अभिवादन ॥

       लोकशाहीर - साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार प्राप्त.

.                           साहित्यिक
                अमरावती.८०८७७४८६०९

0 Response to "" बाबुराव बागुल आधुनिक मराठी साहित्यातील विद्रोही आंबेडकरवादी प्रवाहाचे प्रमुख उद्गाते आणि प्रवर्तक ""

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article