-->
आंबेडकरी विचारांचे कर्मयोगी स्मृतिशेष रा.सू.ऊर्फ दादासाहेब गवई यांच्या दि.२५ जुलै २०२६ रोजी असलेल्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

आंबेडकरी विचारांचे कर्मयोगी स्मृतिशेष रा.सू.ऊर्फ दादासाहेब गवई यांच्या दि.२५ जुलै २०२६ रोजी असलेल्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.


आंबेडकरी चळवळीचे दीपस्तंभ - संविधानप्रेमी लोकनेते मा.दादासाहेब गवई

      आंबेडकरी चळवळीचे महामेरू, दीक्षाभूमीचे शिल्पकार, संविधानप्रेमी लोकनेते, अजातशत्रू, आंबेडकरी चळवळीचे दीपस्तंभ,आंबेडकरी विचारांचे कर्मयोगी,समतेचे आग्रही शिलेदार,उपेक्षित- शोषित- वंचितांच्या समस्यांना वाचा फोडून ते निवारण करणारे समाजसेवक,महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित व्यक्तिमत्त्व स्मृतिशेष दादासाहेब गवई यांना त्यांच्या दि.२५ जुलै २०२६ रोजी असलेल्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥

        स्मृतिशेष रामकृष्ण सूर्यभान उपाख्य दादासाहेब गवई (रा. सु. गवई) हे भारतीय राजकारणातील आणि आंबेडकरी चळवळीतील एक अत्यंत आदरणीय आणि ज्येष्ठ नेते होते.त्यांचा जन्म दि.३० ऑक्टोबर १९२९ रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील दारापूर या ग्रामात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यभान गवई आणि आईचे नाव सरूबाई होते.दि.२९ नोव्हेंबर १९५९ रोजी त्यांचा विवाह कमलाताई गवई यांच्याशी झाला.त्यांना भूषण गवई (भारताचे ५२ वे सरन्यायाधीश) व डॉ.राजेंद्र गवई ही दोन सुपुत्र आणि कीर्तीताई एक सुकन्या आहे.

        दादासाहेब गवई यांनी त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अमरावतीमध्ये पूर्ण केले.सन - १९५४ मध्ये त्यांनी नागपूर विद्यापीठातून पदवी (B.A.) पूर्ण केली. ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेले कट्टर आंबेडकरवादी आणि बौद्ध धर्मीय होते. त्यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अत्यंत जवळून काम केले होते.ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे अध्यक्ष होते आणि नंतर त्यांनी 'रिपाइं (गवई गट)' ची स्थापना केली.ते महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर (MLC) सलग ३० वर्षे (१९६४ ते १९९४) सदस्य म्हणून कार्यरत होते.
या ३० वर्षांच्या काळात त्यांनी विधान परिषदेचे उपसभापती (१९६८-७८) आणि सभापती (१९७८-८४) पद भूषवले.याशिवाय त्यांनी विधान परिषदेत दोन वेळा विरोधी पक्षनेते म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली.
१९९८ मध्ये ते अमरावती मतदारसंघातून १२ व्या लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले.२००० ते २००६ या काळात त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही देशाच्या संसदेत प्रतिनिधित्व केले.

आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवानंतर त्यांनी देशातील तीन राज्यांचे राज्यपाल पद भूषविले.जून २००६ ते २००८ या काळात त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून उत्कृष्ट कार्य केले.जुलै २००६ ते ऑगस्ट २००६ दरम्यान त्यांच्याकडे सिक्कीमच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार होता.२००८ ते २०११ या काळात त्यांनी केरळचे राज्यपाल म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. 
    नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती'चे ते सलग ५ दशकांहून अधिक काळ अध्यक्ष होते.
अमरावतीच्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ'च्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य केले.बिहारचे राज्यपाल असताना त्यांनी तेथील विद्यापीठांमधील शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी कडक पावले उचलली होती.बिहारमधील बौद्ध आणि जैन धर्मीय तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी त्यांनी १३०० कोटी रुपयांची विशेष योजना तयार केली होती.

           स्मृतिशेष दादासाहेब गवई हे आंबेडकरी चळवळीतील एक अत्यंत ज्येष्ठ नेते आणि कुशल राजकारणी होते. त्यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक आणि राजकीय कारकीर्दीत शोषित, वंचित आणि दलित समाजाच्या उद्धारासाठी अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक कार्ये केली. त्यांनी नवबौद्धांच्या हक्कांसाठी दिल्लीत १४ दिवसांचे ऐतिहासिक उपोषण केले .इ.स. १९७८ मध्ये तत्कालीन सरकारने अनुसूचित जाती आणि जमातींना मिळणाऱ्या सवलती बौद्ध धर्म स्वीकारलेल्या नवबौद्धांना (नवदीक्षित बौद्ध) नाकारल्या होत्या. 

या अन्यायाविरोधात दादासाहेब गवई यांनी दिल्लीतील बोट क्लबवर १४ दिवसांचे आमरण उपोषण केले. त्यांच्या या प्रखर आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतः उपोषणस्थळी त्यांची भेट घेतली, ज्यामुळे पुढे चालून बौद्ध बांधवांना त्यांचे घटनात्मक हक्क व सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. ऐतिहासिक 'दीक्षाभूमी'चा विकास आणि स्तूप निर्मिती दादासाहेबांनी केली.नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमी जेथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती अशा या पवित्र स्थळाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती'चे ते दीर्घकाळ अध्यक्ष होते. दीक्षाभूमीवर आज डौलाने उभा असलेला भव्य आणि आशियातील सर्वात मोठा 'धम्मचक्र स्तूप' साकारण्यात आणि या परिसराचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास करण्यात दादासाहेबांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. 

     रोजगार हमी योजनेची (रोहयो) पायाभरणी दादासाहेबांनी केली.महाराष्ट्रात दुष्काळग्रस्तांना आणि ग्रामीण भागातील मजुरांना हक्काचे काम मिळवून देणाऱ्या 'रोजगार हमी योजना' (Employment Guarantee Scheme) सुरू करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि वि.स.पागे यांच्या सहकार्याने त्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पायाभूत कायदेशीर व सामाजिक काम केले. पुढे याच योजनेच्या धर्तीवर देशात 'मनरेगा' (MGNREGA) कायदा लागू करण्यात आला.
 
        दलित,बहुजन आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी अमरावती येथे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ' स्थापन केले आणि त्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे सुरू करून शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवली. 
 त्यांनी आयुष्यभर आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व करताना केवळ स्वतःच्या समाजापुरते मर्यादित न राहता सर्व धर्मीय व जातींच्या गरिबांना सोबत घेतले.सामाजिक कार्यात योगदान देत असताना त्यांनी कुष्ठरोग निर्मूलन आणि अस्पृश्यता निवारणासाठी काम करणाऱ्या तपोवन सारख्या संस्थांना मोठे सहकार्य केले, ज्यासाठी त्यांना 'कुष्ठमित्र पुरस्कार' (Kusta Mitra Award) व राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. दादासाहेब गवई यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती व उपसभापती, खासदार आणि पुढे बिहार, केरळ व सिक्कीमचे राज्यपाल म्हणून काम करताना नेहमीच आपल्या अधिकारांचा वापर सामाजिक न्यायासाठी आणि गरिबांच्या कल्याणासाठी केला. 

   वयाच्या ८६ व्या वर्षी दि. २५ जुलै २०१५ रोजी नागपूर येथील रुग्णालयात दीर्घ आजाराने ते अनंतात विलीन झाले.त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांचा 'अजातशत्रू' नेता म्हणून गौरव केला.असे महान नेते स्मृतिशेष दादासाहेब गवई यांना त्यांच्या दि.२५ जुलै २०२६ रोजी असलेल्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥..

       राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजसेवा गौरव पुरस्कार प्राप्त.
 
              साहित्यिक
 अमरावती.८०८७७४८६०९.

0 Response to "आंबेडकरी विचारांचे कर्मयोगी स्मृतिशेष रा.सू.ऊर्फ दादासाहेब गवई यांच्या दि.२५ जुलै २०२६ रोजी असलेल्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article