सावित्रीबाई फुले विद्यालयात विदर्भस्तरीय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
रविवार, 23 अगस्त 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- ओबीएन ऑलिम्पियाडच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय चित्रकला स्पर्धा रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सावित्रीबाई फुले विद्यालय, पवनी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी आणि चित्रकलेच्या माध्यमातून सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ९ ते ११ या वेळेत झालेल्या या स्पर्धेत एकूण ७८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. इयत्तानिहाय विविध विषय देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा व कलाकौशल्याचा सुंदर आविष्कार चित्रांमधून साकारला.
या स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यालय, वैनगंगा पब्लिक स्कूल, रेनबो पब्लिक स्कूल,माॅडर्न इंग्लिश स्कूल,वैनगंगा विद्यालय, डॉ.आंबेडकर विद्यालय, न.पा. विद्यालय, विकास विद्यालय,आनंददम विद्यालय, मनोसुमन पब्लिक स्कूल ,मदर तेरेसा स्कूल कोंढा, यांसह विविध विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
स्पर्धेचे तालुका समन्वयक तथा राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांनी सावित्रीबाई फुले विद्यालयात परीक्षा केंद्राचे नियोजन करून विद्यार्थ्यांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यातील सर्जनशीलता व कल्पनाशक्तीला चालना मिळाली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गुरुकुल कोचिंग क्लासेसचे संचालक रवी भिसेकर,डॉ. आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक विवेक गायधने, तुषार भोगे, शिवाजी बिलवणे, विनोद भुरे तसेच पालकवर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.
सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांनी स्पर्धेसाठी विद्यालयाची इमारत उपलब्ध करून दिल्याबद्दल ओबीएन ऑलिम्पियाडचे परीक्षा संचालक अजय निनावे यांनी त्यांचे विशेष आभार मानले. विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांच्या विकासासाठी अशा स्पर्धा सातत्याने उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
0 Response to "सावित्रीबाई फुले विद्यालयात विदर्भस्तरीय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद."
एक टिप्पणी भेजें