कर्जाच्या ओझ्याखाली अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या!..
बुधवार, 16 सितंबर 2026
Comment
"साप्ताहिक"जनता की आवाज"
न्युज नेटवर्क
पालांद :- बचतगटासह खासगी कर्जाचा वाढता बोजा आणि त्यातून निर्माण झालेला मानसिक ताण असह्य झाल्याने अल्पभूधारक शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविले. तान्हा पोळ्याच्या दिवशी, शुक्रवार (११ सप्टेंबर) मांगली-बांध (ता. लाखनी) येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राजकुमार मारोती बारसागडे (५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते सकाळी शेतावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांचा मुलगा अनमोल बारसागडे शेतावर गेला असता वडील झोपलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी उलटी केल्याचेही निदर्शनास आले. विचारणा केली असता त्यांनी कीटकनाशक प्राशन केल्याचे मुलाला सांगितले.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, पालांदूर येथे दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय, भंडारा येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच सायंकाळी ६.४५ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
बारसागडे यांच्या नावावर केवळ अर्धा एकर शेती असून पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. मागील सुमारे १५ दिवसांपासून ते मानसिक तणावात असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. बचतगट तसेच खासगी कर्जाचा बोजा असल्याचे सांगण्यात आले; मात्र कर्जाची नेमकी रक्कम स्पष्ट होऊ शकली नाही.
शवविच्छेदनानंतर पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. तान्हा पोळ्याच्या आनंदाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने बारसागडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
फोटो:
0 Response to "कर्जाच्या ओझ्याखाली अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या!.."
एक टिप्पणी भेजें