-->
मसोड–जटाळवाडी–खरवड–मोरवड रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा..

मसोड–जटाळवाडी–खरवड–मोरवड रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा..



• ७ दिवसांत कार्यवाही न झाल्यास ८ ऑक्टोबरला रस्ता रोको आंदोलन.

• वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रधानमंत्री ग्राम सडक विभागाला निवेदन..
साप्ताहिक "जनता की आवाज" 
वृत्तपत्र प्रतिनिधी 

कळमनुरी तालुका :- राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ते मसोड–जटाळवाडी–खरवड–मोरवड या महत्त्वाच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर अपघातांच्या घटना घडत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने प्रधानमंत्री ग्राम सडक कार्यालयाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.सदर रस्त्याची निर्धारित कालमर्यादा २०२८ पर्यंत असल्याचे नमूद असूनही रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने कामाची गुणवत्ता, देखभाल-दुरुस्ती आणि निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

सन २०१८ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रु. ४४०.२५ लाख निधीची, तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत RIDF प्रकल्प म्हणून मंजूर झालेल्या रु. ५४०.५३ लाख निधीची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, प्रत्यक्ष खर्च, मोजमाप पुस्तिका, देयके, कामाची गुणवत्ता व निधीच्या वापराची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच सन २०१८ ते २०२४ या कालावधीत रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीवर किती निधी खर्च करण्यात आला, कोणत्या यंत्रणा अथवा कंत्राटदारामार्फत काम करण्यात आले, कामाची गुणवत्ता तपासण्यात आली का, याची वर्षनिहाय माहिती तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.

एकाच रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या दोन्ही योजनांतर्गत निधी मंजूर अथवा खर्च झाला असल्यास, कामाची पुनरावृत्ती झाली आहे का, याचीही स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
रस्त्याची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून स्वतंत्र तांत्रिक पथकामार्फत गुणवत्ता तपासणी व पंचनामा करण्यात यावा. चौकशीत निधीचा गैरवापर, अनियमितता, निकृष्ट काम किंवा शासन नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार अथवा जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करून शासन निधीची वसुली करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

07 दिवसांची मुदत; अन्यथा ८ ऑक्टोबरला रस्ता रोको
रस्ता तात्काळ दुरुस्त करून नागरिकांना सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. निवेदनातील मागण्यांवर पुढील ७ दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी नियमानुसार “रस्ता रोको आंदोलन” करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू कांबळे,युवा तालुका अध्यक्ष मोहम्मद असलम, जि.उपाध्यक्ष सम्यक वि.आ.लंकेश आवटे यांनी दिले आहे.

वंचित बहुजन युवा आघाडी ता.कळमनुरी, जि. हिंगोली

0 Response to "मसोड–जटाळवाडी–खरवड–मोरवड रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article