शासकीय तंत्रनिकेतन, साकोलीच्या चार अभ्यासक्रमांना NBA पूर्नमानांकन.
बुधवार, 23 सितंबर 2026
Comment
• संस्थेतील सर्व पाच अभ्यासक्रम राष्ट्रीय मानांकनप्राप्त.
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- शासकीय तंत्रनिकेतन, साकोलीने गुणवत्ता शिक्षणाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले.
असून संस्थेच्या यंत्र अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक तंत्रज्ञान आणि विद्युत अभियांत्रिकी या चार अभ्यासक्रमांना राष्ट्रीय मानांकन मंडळ (NBA – National Board of Accreditation) यांचे पूर्नमानांकन प्राप्त झाले आहे.
संस्थेतील अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी अभ्यासक्रम सन-२०२५ ला NBA मानांकित झालेला आहे. NBA कडून प्राप्त अधिकृत पत्रानुसार, उर्वरित चारही अभ्यासक्रमांना १ जुलै २०२६ ते ३१ डिसेंबर २०२९ या कालावधीसाठी मानांकन प्रदान करण्यात आले आहे. या पुनर्मानांकनामुळे शासकीय तंत्रनिकेतन, साकोली येथील पाचही अभ्यासक्रम NBA मानांकित झाले आहेत.
या यशामुळे शासकीय तंत्रनिकेतन, साकोली ही सर्व अभ्यासक्रमांना १००% एनबीए मानांकन प्राप्त करून घेणारी संस्था ठरलेली आहे. या मानांकनामुळे संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन पद्धती, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम तसेच उद्योगाभिमुख प्रशिक्षणाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
हे उल्लेखनीय यश श्री. एस. पी. लांभाडे , प्रभारी प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, साकोली यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त झाले. या यशाबद्दल डॉ. प्रमोद नाईक , संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच डॉ. एम. बी. डायगव्हाणे , सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नागपूर यांनी संस्थेचे अभिनंदन करून गुणवत्तावृद्धीच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
या मानांकन प्रक्रियेसाठी डॉ. एस. एम. बांते , अधिव्याख्याता (यंत्र अभियांत्रिकी विभाग) यांनी संस्था स्तरावरील NBA समन्वयक, तर डॉ. के. एस. ठेकेदार, अधिव्याख्याता (यंत्र अभियांत्रिकी विभाग) यांनी NBA सहसमन्वयक म्हणून प्रभावीपणे जबाबदारी पार पाडली. यासोबतच यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्रभारी विभागप्रमुख श्री. ए. व्ही. अभ्यंकर , संगणक तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी विभागप्रमुख श्री. एम. ए. रहेमान , विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रभारी विभागप्रमुख डॉ. के. एस. पोटोडे तसेच स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रभारी विभागप्रमुख श्री. एल. पी. साखरवाडे यांनी विभागीय स्तरावर महत्त्वपूर्ण योगदान दिले.
तसेच विभागीय NBA समन्वयक डॉ. डी. जे. घोडे (यंत्र अभियांत्रिकी), डॉ. पी. बी. लाहोटी (संगणक तंत्रज्ञान), श्री. आर. एस. धाबर्डे (विद्युत अभियांत्रिकी) आणि श्रीमती एम. व्ही. बोबडे (स्थापत्य अभियांत्रिकी) यांनी मानांकन प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविला. संस्थेतील सर्व समित्यांचे प्रभारी, सर्व अधिकारी व कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे ही मानांकन प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. या यशामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण उपलब्ध होण्यास मदत होणार असून शासकीय तंत्रनिकेतन, साकोलीची शैक्षणिक प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे.
0 Response to "शासकीय तंत्रनिकेतन, साकोलीच्या चार अभ्यासक्रमांना NBA पूर्नमानांकन."
एक टिप्पणी भेजें