-->
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे राधाकृष्णन यांचे शैक्षणिक विचार आणि प्रासंगिकता.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे राधाकृष्णन यांचे शैक्षणिक विचार आणि प्रासंगिकता.



लेखक :- दयानंद कानगुले ( ग्रंथपाल )
संकलन/संग्रहक :- हर्षवर्धन देशभ्रतार.

पृथ्वीवरील सजीव सृष्टीपैकी 'मनुष्य' हा एकमेव सजीव जिज्ञासा, ज्ञानपिपासु वृत्ती घेऊन जन्माला येतो. त्यामुळे इतर सजीवांपैकी फक्त मनुष्याची सातत्याने जीवन जगण्याची प्रवृत्ती बदलताना आपण पाहिली आहे.

 ही प्रवृत्ती विधायक मागनि जेव्हा क्रियाशील होते. तेव्हा इतर मनुष्य, मनुष्यांचा समूह अनुकरण करीत असतो. या अनुकरणीय प्रवृत्तीला उच्चतम दिशा प्राप्त करून देण्याचे काम कोणीतरी मार्गदर्शक करीत असतो. हा मार्गदर्शक म्हणजेच 'शिक्षक' असतो. ज्यात शिस्त, क्षमाशीलता आणि कर्तव्य ओतपोत भरलेले असते. आपल्याही देशात अनेक शिक्षकांनी आपल्या सदसद्विवेकबुद्धी साह्याने देशातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करून जगाच्या नकाशावर भारताचे नाव उंचावण्यासाठी अथक प्रयत्न केले. यामध्ये 'डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक होते. यांच्या काही मित्रांनी व विद्यार्थ्यांनी देशाचे राष्ट्रपती असताना त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी राष्ट्रपती भवनात 5 सप्टेंबर 1962 ला परवानगी मागितली. तेव्हा त्यांनी अत्यंत नम्रपणे सांगितले की, माझा एकट्याचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा देशातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या सर्वच गुरुजनांचा सन्मान केला तर अजून चांगले होईल.

डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात 'शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन लहानपणापासून जिज्ञासू वृत्तीचे असल्यामुळे अभ्यासात अत्यंत तल्लख होते. त्यामुळे शिक्षण घेताना कौटुंबिक परिस्थिती फारशी चांगली नसता नाही शिष्यवृत्तीच्या बळावर त्यांनी आपली ज्ञानसाधना सातत्याने तेवत ठेवली होती. त्यांना विज्ञान आणि गणित या विषयात प्रचंड आवड होती. परंतु नवीन पुस्तके घ्यायला पैसे नसल्यामुळे त्यांनी त्यांचा चुलत भाऊ 'तत्त्वज्ञान' विषय घेऊन पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची जुनी पुस्तके वापरून 'तत्वज्ञान' विषयात देशातच नव्हे तर जगात भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख जगाला करून दिली.

 एवढेच नव्हे तर पाश्चात्य तत्त्वचिंतकाचा पूर्वेकडील धर्माबद्दल चा असणारा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडले. त्यांच्या मते, "भारतीय तत्त्वज्ञान अंधश्रद्धा नसून मानव, नैतिकता आणि अस्तित्व यांचा सुरेख संगम आहे" पण आज त्यांच्या विचारापासून आजचा विद्यार्थी व पालक काहीशा प्रमाणात दूर जाताना दिसत आहेत. कारण आज इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके शासनाकडून मोफत दिली जात आहेत, तरी पण विद्यार्थी आणि त्यांचे पालक शिक्षणाच्या प्रवाहात ज्या पद्धतीने कृती प्रवण व्हावेत तेवढे होताना दिसत नाहीत. म्हणून तर आजही स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर हे शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठीचा

शासन आदेश काढावा लागतो. तसेच पालकांनी आपल्या दैनंदिन कामातून काही वेळ मुलांच्या अभ्यासाकडे देणे गरजेचे आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन महाविद्यालयात किंवा विद्यापीठात दिवसभर तत्त्वज्ञानाचे अध्यापन करीत पण रात्री आपल्या मुलांना अभ्यासाबरोबर भगवद गीतेतील कथा सोप्या भाषेत सांगत असतात. ही निश्चितच मूल आणि पालक यांचा संवाद वाढविण्यास महत्त्वाची भूमिका बजावू शकते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यात तथागत गौतम बुद्धाची करुणा, स्वामी विवेकानंदाचा आत्मविश्वास आणि महात्मा गांधीजींचे नैतिकता यांचा प्रभाव पडलेला दिसतो. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे खंड एक व खंड दोन अनुक्रमे 1923 1927 मध्ये प्रकाशित केले.

या ग्रंथाचे महत्त्व यासाठी आहे की, भारतीय विचार पाश्चात्य वाचकाला समजेल अशा भाषेत मांडला, पण त्यासाठी त्यांनी भारतीय परंपरेचा आत्मा कमी केला नाही. पौर्वात्य व पाश्चिमात्य तात्विक विचार धारेला एकमेकाचे प्रतिस्पर्धी न मानता पाश्चात्य तर्कबुद्धि व पौर्वा त्यांचा आध्यात्मिक अनुभव एकमेकाचे संवाद साधू शकतात. त्यांच्या मते, मानवाला केवळ बाह्य प्रगती पुरेशी नाही आणि केवळ अंतर्मुख अध्यात्म ही पुरेसे नाही तर बुद्धी आणि अंतःकरण यांचा समतोल आवश्यक आहे. ही त्यांची प्रगल्भता त्यांच्या शैक्षणिक विचारात दिसून येते.

 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या शैक्षणिक विचारात जटील प्रश्न विद्यार्थ्यांवर न लादता, एखादा गुंतागुंतीचा विचार रोजच्या आयुष्यातील उदाहरणाशी जोडून संकल्पना स्पष्ट करीत असत. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांला प्रश्न विचारायला प्रोत्साहन देत असत. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्याला उत्तर सांगण्यापेक्षा तो स्वतः उत्तरापर्यंत कशा पद्धतीने पोहोचेल यावर त्यांचा विशेष भर होता. डॉ. राधाकृष्णनचा हा विचार सध्याच्या भाषा विषयांच्या अभ्यासक्रमात निदर्शनात येतो. कारण भाषा विषयात स्वमत सारख्या कृतीतून विद्यार्थ्यांना विचार करण्याची संधी उपलब्ध होताना दिसते, असे मला वाटते. डॉ. राधाकृष्णन यांचा शैक्षणिक विचार देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष म्हणून जो मसुदा तयार केला. त्यात अधोरेखित झालेला दिसतो. त्यात त्यांनी

शिक्षणाचे विकेंद्रीकरण, अभ्यासक्रमात कला व विज्ञान यांच्यात समतोल एवढेच नव्हे तर विज्ञानाबरोबर तंत्रज्ञान व व्यावसायिक शिक्षणालाही महत्व दिले आहे. यांच्या शैक्षणिक विचाराचा प्रत्यय पुढे शिक्षण तज्ञ, शारवज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या आयआयटी मुंबईच्या एका भाषणात अधोरेखित होताना दिसतो. डॉ. कलाम म्हणाले होते की, अभियांत्रिकीचे ज्ञान आणि कविता जेव्हा एका विशिष्ट बिंदूवर क्रियाशील होतील. तेव्हाच सर्जनशील ज्ञान निर्मिती होते.

 पण आज शिक्षण घेऊन पदव्यांच्या भेंडोळ्या हातात घेऊन रोजगारासाठी भटकंती करणाऱ्या तरुण वर्गाला आपण या दोन शिक्षण तज्ञाच्या दृष्टीने आवश्यक असलेले शिक्षण देण्यास निश्चितच कमी पडलो आहे. ही बाब चिंताजनक आहे. कारण शैक्षणिक अभ्यासक्रम हा व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित असला पाहिजे. तरच राष्ट्र जगात महासत्ता बनू शकते. या संदर्भात प्रसिद्ध मृत्युंजयकार शिवाजी सावंत म्हणतात की "चिमणीचे पिल्लं 40 दिवसात आकाशात निर्भयपणे भरारी घेतात पण माणसाची मुलं 40 वर्षाचे झाले तरी उत्कर्ष करण्यास कमी पडताना दिसतात." म्हणून आजच्या तरुण पिढीला शिक्षणातून सर्जनशीलता, प्रयोगशीलता आणि कृतिशीलता यांचे धडे मिळणे अत्यावश्यक आहे, असे मला वाटते.

 आज आपण बौद्धिक प्रगल्भतेच्या बळावर भौतिक प्रगती बऱ्याच प्रमाणात साध्य करताना दिसतो. इंटरनेटच्या माध्यमातून गुगल एका सेकंदात हवी ती माहिती देतो. पण त्या माहितीचा वापर कोण्या ठिकाणी कसा करावा. याचे ज्ञान फक्त आणि फक्त शिक्षक किंत्रा मार्गदर्शक करू शकतो. कारण शिश्वक सतत विवेकाने कसा वापर करावा याचे मार्गदर्शन करतो. आपणाला कोविड-19 च्या काळात ऑनलाईन शिक्षणामुळे किशोरवयीन विद्यार्थ्यांनी मोबाईलचा कसा आणि किती प्रमाणात वापर केला याचा प्रश्न आजही सातत्याने भेडसावताना दिसतो. आपणच आपल्या निरीक्षणातून मनाला प्रश्न केला पाहिजे की मुलांनी व्यवस्थित वापर केला आहे का? असे मला वाटते. 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिप्रेत असणारा शिक्षण विचार आज काही प्रमाणात दिशाहीन झालेला दिसतो. त्यांच्या मते शिक्षणाचा खर्च केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी उचलला पाहिजे आणि त्यातून शिक्षकांचे पगार, इमारती, ग्रंथालये, प्रयोगशाळा, क्रीडांगणे, इत्यादी शैक्षणिक सुविधा उभारल्या पाहिजे पण आज घडीला असे होताना दिसत नाही. एवढेच नव्हे तर शिक्षणातून अनुदानित शाळा विनाअनुदानीत शाळा, महाविद्यालय बंद पाडण्याचा घाट रचला जात आहे.

 एवढेच नव्हे तर स्वयं अर्थसहाय्य धोरणाचा उदो उदो करून कार्पोरेट शाळा, महाविद्यालयाचे पेव फुटताना दिसत आहेत. या संदर्भात महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ हेरब कुलकर्णी सर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी म्हणतात की, एनईपी 2020 कागदोपत्री चांगला आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी हे मोठे आव्हान आहे." कारण या धोरणाचा खरा परिणाम वर्गखोलीत दिसला पाहिजे, त्यासाठी प्रथम शिक्षक सक्षम झाले पाहिजेत आणि त्यानंतर शाळा आणि त्यातून विद्यार्थ्यांचा

विकास होतो. पण आज वास्तवात वेगळेच चित्र पहावयास मिळत आहे. हजारो शिक्षक अनुदानाच्या प्रतीक्षेत जीवनाचा एक एक दिवस पुढे ढकलत आहेत एवढेच नव्हे तर वारंवार उपोषण करण्याची वेळ आली आहे ही निश्वितच लाजिरवाणी व चिंताजनक बाब आहे. तर दुसरीकडे विद्याथों शालेय गणवेशाच्या बाबतीत एकीकडे जिल्हा परिषद, महानगरपालिका तर दुसरीकडे खाजगी अनुदानित, विनाअनुदानीत शाळा स्वयं अर्थसहाय्य शाळा यांना असमान धोरणाचा प्रत्यय येताना दिसतो. आपणाला भारतीय संविधानाने कलम 14 व 15 मध्ये कायद्यापुढे समानता आणि वर्ण धर्म जात लिंगभेद न करता सर्व आपण भारतीय आहोत ही शिकवण दिली आहे.

 पण प्रत्यक्षात सध्याच्या परिस्थितीत कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांना काहीशा प्रमाणात विसर झालेला दिसतो, असे मला वाटते. डॉ. राधाकृष्णनचा शैक्षणिक विचार आणि आजची वास्तव परिस्थिती हातात हात घालून भविष्यात शिक्षण क्षेत्रात व शिक्षण क्षेत्राशी संबंधित इतर विभागात कार्यान्वित झाली तर आपला देश जगातील सर्वोत्तमापैकी एक उपलब्ध मनुष्यबळाचा उपयुक्त मनुष्यबळात विवेकाने परिवर्तन करणारा ठरू शकतो. पण यासाठी फक्त आणि फक्त शिक्षक सक्षम कसा बनेल यासाठी तत्त्वचिंतक, विचारवंत आणि लेखक यांनी उत्तमोत्तम आराखडा तयार करून शासनाच्या प्रतिनिधीला अंमलबजावणीसाठी पाठवला पाहिजे, यासाठी जनसामान्यांच्या प्रबोधन करण्यासाठी विविध प्रसार माध्यमांचा वापर करून राष्ट्राच्या उन्नतीच्या कार्यात खारीचा वाटा उचलून लोक मोहीम तयार झाली पाहिजे, असे मला वाटते, ही विधायक चळवळ एकीकडे सुरू होताच प्रत्येक शिक्षकाने पण जास्तीत जास्त ज्ञानसाधना करून विषय ज्ञानावरून आपली ओळख समाजात तयार केली पाहिजे.

 कारण बदलत्या नव्या तंत्रज्ञानामुळे शिक्षक सातत्याने अपडेट होऊन समाजाच्या अपेक्षा, जबाबदारी पूर्ण करण्याच्या दिशेने मानसिक तयारी केली पाहिजे. आज पैसा आणि प्रसिद्धीच्या बळावर कोणीही हिरो बनू शकतो. पण सदसद्विवेक बुद्धीतून आचार, विचार आणि विचारातून चारित्र्यसंपन्न पिढी तयार करून शिक्षकच समाजाचा 'आयडॉल' बनू शकतो, असे मला वाटते. आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने शासनाकडून व समाजाकडून शिक्षकांच्या पाठीवर प्रेमाची थाप दिली पाहिजे. कारण पुरस्कार हे वारीच्या प्रसादासारखे असते. चालणे थांबत नाही पण पायात आत्मविश्वासाचे बळ येते.

पुनश्च एकदा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने सर्व देशातील शिक्षक बंधू-भगिनींना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!


           दयानंद ज्ञानोबा कानगुले
                     ग्रंथपाल
      कै. विठ्ठलराव कोल्हे उच्च माध्यमिक
          विद्यालय,जांब (बु),ता.मुखेड,
            जिल्हा-नांदेड- 43 17 16 
               मो.नं. 9420212465
Email ID kangule. dayanand@gmail.com

0 Response to "डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे राधाकृष्णन यांचे शैक्षणिक विचार आणि प्रासंगिकता."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article