जिद्दीच्या आणि त्यागाच्या बळावर चहाच्या टपरीपासून जिल्हा परिषद शिक्षक पदापर्यंत पोहचलेला दिनेश पेरे यांचा दैदिप्यमान प्रवास.
बुधवार, 23 सितंबर 2026
Comment
दिगंबर देशभ्रतार
साप्ताहिक"जनता की आवाज"
तुमसर/हरदोली (सि.) :- परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणसाची जिद्द आणि अहोरात्र मेहनत पुढे ती नक्कीच हार मानते,' याचा वस्तूपाठ तुमसर तालुक्यातील सिलेगाव येथील दिनेश अशोक पेरे यांनी घालून दिला आहे.
अत्यंत बिकट आणि आर्थिक हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत, वडिलांच्या चहाच्या टपरीवर हातभार लावत आणि आईच्या कष्टाची सावली उराशी बाळगत दिनेश यांनी भंडारा जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून मिळवलेले यश हे केवळ एका नोकरीची निवड नसून, एका संघर्षाचा दणदणीत विजय आहे.
चहाच्या टपरीपासून शिक्षकाच्या वर्गापर्यंतचा लढा. दिनेश पेरे यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांचे वडील अशोक पेरे यांनी गावात एक छोटीशी चहाची टपरी सुरू केली. शालेय शिक्षण घेताना दिनेश यांनी केवळ अभ्यासच केला नाही, तर वडिलांच्या खांद्याला खांदा लावून चहाच्या टपरीवर चहा विकत कुटुंबाला प्रत्यक्ष मदत केली. पोटाची खळगी भरताना शिक्षणाची ज्योत त्यांनी कधीही विझू दिली नाही. आईच्या त्यागाचा आणि कष्टाचा विजयदुसऱ्या बाजूला त्यांच्या आईने कधी शाळेचे दार पाहिले नसले तरी
आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे यासाठी स्वतःच्या कष्टांची कधीच तमा बाळगली नाही. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर खिचडी बनवण्याचे काम करत त्यांनी कुटुंबाच्या अर्थार्जन आणि मुलांच्या शिक्षणाला भक्कम आधार दिला. एका बाजूला वडिलांची चहाची टपरी आणि दुसऱ्या बाजूला आईच्या हाताने बनणारी खिचडीः या संघर्षाच्या वातावरणात शिक्षण घेत दिनेश यांनी यशाचे शिखर गाठले आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पाडण्याचा मानस ज्या हातांनी चहाचे कप दिले आणि ज्या हातांनी
विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिजवली, त्या आई-वडिलांच्या आयुष्यभराच्या त्यागाला आज दिनेश यांच्या निवडीमुळे खरी पावती मिळाली आहे. ही यशोगाथा आजच्या अनेक संघर्षशील आणि होतकरू तरुणांसाठी दीपस्तंभ ठरत आहे. 'ज्या बिकट परिस्थितीतून मी आलो, तशाच परिस्थितीतून येणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पाडणे आणि त्यांना योग्य दिशा देणे हेच माझे मुख्य ध्येय असेल,' असा निर्धार नवनियुक्त शिक्षक दिनेश पेरे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सिलेगाव परिसर व नातेवाईकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 Response to "जिद्दीच्या आणि त्यागाच्या बळावर चहाच्या टपरीपासून जिल्हा परिषद शिक्षक पदापर्यंत पोहचलेला दिनेश पेरे यांचा दैदिप्यमान प्रवास."
एक टिप्पणी भेजें