-->
सर्वज्ञांची 'सर्वज्ञता.........!' ( धर्म बोध )

सर्वज्ञांची 'सर्वज्ञता.........!' ( धर्म बोध )


   संकलन/संग्रहक :- हर्षवर्धन देशभ्रतार.
                              तुमसर जि.भंडारा 
 
अनेक प्रश्नांचे मनोरे मनात रचित डोमेग्राम येथे श्रीचक्रधरस्वार्मीच्या दर्शनार्थ निघालेल्या षट्‌शास्त्रसंपन्न पंडित म्हाइंभट्टांना सर्वज्ञांचे दर्शन होताच रचलेले मनोरे क्षणार्धात ढासळून पडले अन् निस्तब्ध होऊन ते स्वामींच्या पुढ्यात बसले ! तेव्हाच उभय गंगातटावरची विद्वत्तेची ही पेटती मशाल आपोआप विझली! आणि इथेच सर्वज्ञांची सर्वज्ञता अनुभवायला मिळाली! म्हणून तर म्हाइंभट्टांनी लीळाचरित्रात श्रीचक्रधरस्वामींचा उल्लेख 'सर्वज्ञ' असा केला. सर्वज्ञांची सर्वज्ञता जाणून घ्यायला यापेक्षा आणखी काय हवं ?..

महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतारदिन आज (ता १२ ) देशभर साजरा होत आहे त्यानिमित्त..

महंत राजहंस शेवलीकर महानुभाव उपाख्य महंत धाराशिवकर महानुभाव, बदनापूर

लौकिक, अलौकिक पातळीवरील सर्वज्ञतेचे अनेक घटना प्रसंग लीळाचरित्राच्या पानापानात दडलेले आहेत, त्याचे विलोभनीय दर्शन सर्वज्ञतेची व्यापकता आणि अमर्याददछता प्रत्ययास आणून देते. यातील काही घटना प्रसंगांचा ओझरता उल्लेख करणे विषय अभिव्यक्तीच्यादृष्टिने संदर्भशील ठरेल.

श्रीचक्रधरस्वामींनी वेरुळ लेणीच्या निर्मितीमागचं केलेलं रहस्योद्घाटन ! बाईः हा आवघा डोंगरु दीढा गाउवाचेनी मानेः अव्हा चौरसु पोकळू केला असे एथिचा रीगावा नीगावा कव्हणीची नेणेः जेणे केले तो जाणे : का एथौनि जाणिजे किंवा 'छायापुरुषा'च्या लेणी संदर्भातलं कथन हे ऐकून श्रीस्वामी इतिहासाचे सत्यान्वेषी विश्लेषक आहेत हे लक्षात येतं. सिन्नरच्या 'गोंदेश्वर पद्येश्वर मंदिराची स्थापना किंवा फुलंब्री मठाच्या निर्मितीचा अज्ञात इतिहास सांगणारे श्रीस्वामी हिवरळी येथे बाबा ए तीनी लिंगे काईसी? या बाईसाच्या जिज्ञासेवरही तितक्याच सहजतेने खुलासा करतात तेव्हा सर्वज्ञतेची अनुभूती येते.

केवळ पूर्वेतिहासाचं निवेदन करण्याइतपतच हे सर्वज्ञत्व सिमीत नाही तर ते
वर्तमान आणि भविष्याचा वेध घेणारे अमर्याद अवकाश आहे, हे भूमिगत द्रव्याचं निदान सांगणारे आणि प्रवृत्ती झालीच तर सोनेयाची रहाटी बनविणारे श्वर्यसंपन्न ईश्वरत्व बघून मनाला पटायला लागतं ! तीनशे वर्षापूर्वीच्या देऊळ उद्यापन प्रसंगात पातळी घालून आरोगणा करणारे स्वामी पाहून साधीभोळी आऊसाही विस्मित होते.

आंब्याला स्पर्श न करता काहीशा अंतरावरुनच रसग्रहण करणारे स्वामी बघून बाईसा अचंबित नजरेनं स्वामींच्या या सर्वज्ञतेला जवळून न्याहाळतात ! रुध्दिपूरात नांदणारे श्रीगोविंदप्रभू एळापूरात पाहून स्वामींच्या ईश्वरत्वापुढे आपोआप नतमस्तक होणारे सारंगपंडित, बाजारातून स्वतः निवडून आणलेल्या पोफळावरची किमया पाहून स्वामींच्या अलौकिक साक्षात्कारापुढे निःशब्द होतात ! सर्वज्ञतेच्या अष्टपैलूत्वाचे अनेकविध कंगोरे चौफेर विस्तारलेले दिसतात. अश्व जातीचे निरोपण करताना जातीसुध घोडे ते काइ ऐसे? ते ऐसे की... म्हणून जे निरोपण केलं ते ऐकून प्रभावित झालेल्या हेडाउंच्या तोंडून निघालेले उद्वार किती बोलके आहेत! जीजीः आम्ही हे परिसोची नेणोः मा बोलीनी काइ जी ? अश्वहृदय ते गोसावीच जाणतीः. चुना कसा तो योग्यप्रकारे तयार झाला का? याची ओळख कशी करावी! हे मर्म लीलया सांगणारे स्वामी नृत्यकलेतली उणीव लक्षात आणून देतात तेव्हा नृत्यांगणालाही कलेचे माहेर भेटल्याचा आनंद तर होतोच पण गोसावी सकळ विद्येचे माहेर! असा अभिप्राय व्यक्त करुन ती स्वामींच्या सर्वज्ञतेला निः संदेह प्रणाम करते ! साळतीर्थ, शुक्रतारा यासंदर्भातलं विवेचन सर्वज्ञांच्या चतुरस्त्र ज्ञान परीघाची विशाल व्याप्ती अधोरेखीत करतं.

कुत्र्याला दगड मारल्यामुळे व्यथीत होणारे स्वामी आउसाच्या प्रश्नावर सर्वात्मकतेने आपले सर्वव्यापकत्व प्रतिपादन करुन अहिंसेचे समर्थन करतात तेव्हा या सर्वज्ञतेत करुणेचा स्पर्श जाणवतो. अखिल विश्वातील प्राणीमात्राबरोबरच देवताशक्तींनाही या सर्वज्ञतेनं सोडलेलं नाही हे देवद्रोणीच्या जलदेवतांकडे पाहून लक्षात येतं. दर्शनासाठी आसुसलेल्या या देवता जेव्हा 'हाती कनकाचे परिएळ अन् रत्नजडीत दीप घेउन' ओवाळण्यासाठी येतात तेव्हा 'देवा अप्यस्य रुपस्य नित्यं दर्शनकांक्षिणः ।' या श्रीकृष्णोक्तीचे स्मरण झाल्याशिवाय राहात नाही. इतकेच काय स्वामींच्या सान्निध्यात गोंविदस्वामीत झालेला बदल नृसींह

देवतेलाही गोविंदापुढे साष्टांग नमस्कार घालायला भाग पाडतो तेव्हा सर्वज्ञांचे परमऐश्वर्यविभूषित सर्वज्ञत्व अत्रतत्र सर्वत्र विद्यमान असल्याचे सिध्द होते !

सैध्दांतिक मूल्यांवर जिज्ञासा करणारे जिज्ञासक सर्वज्ञांपुढे गर्भगळीत होताना दिसून येतात. जीवनमुक्तीचा संदेह शोधणाऱ्या निळभट्ट भांडारेकारांना भट्टो ! मागील फांकी पाहा! तुम्ही जे शोधित आहात ते मागच्याच पानावर आहे. असं सांगणाऱ्या अंतर्यामीत्वामध्येच ज्ञात, आप्त व सुहृदत्वचा अनुभव घेऊन ते या सर्वज्ञतेपुढे सर्वस्व अर्पण करतात! तर कास्त हरीदेव पंडित गोपाळमंत्राचे भेद ऐकून जीः हे गोसावीची जाणावे आणि गोसावीची निरुपावे :

आम्ही परिसो नेणोः मा निरुपूनि ते काईः अशी स्पष्ट कबुली देउन आपली अनभिज्ञता निमूटपणे मान्य करतात. पैठणचा ब्राम्हण स्वामींच्या अगाधत्वाला जाणून घेण्यासाठी हे काई जाणत असती? असा प्रश्न करुन आपली जिज्ञासा व्यक्त करतो तेव्हा श्रीस्वामींनी निर्धारपूर्वक दिलेले उत्तर हे सकळ शास्त्राचा मतीतार्थ जाणे...! हे जीव अविद्या विभाग करु जाणे..! यातच सर्वज्ञांची सर्वज्ञता सर्वार्थाने ध्वनीत होते. असं असलं तरी एरव्ही येथोनी नेणीजे ऐसे काई असे? परी हे सकळही जाणौनिच नेणीजे की! एवढ्या विनयशीलतेनं जेव्हा प्रकट होतं तेव्हा हे 'सर्वज्ञत्व' अंतरात सबीजतेने उमटतं. सामर्थ्य, ऐश्वर्य, सौंदर्य, लावण्य, औदार्य, सौभाग्य अशा अनंत सदुणांनी विभूषित असणारे सर्वज्ञत्व जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर या चारही पदार्थाचा नीत्यानित्यवस्तूविवेक विशद करताना अनंत ब्रम्हांडाला व्यापून उरले आहे ही आत्मानुभूति येते! म्हणून तर श्रीस्वामींचे हे अगाधत्व लक्षात घेऊन पं. श्रीविश्वनाथबास म्हणतात..

'जो वाचात्रया अतीतु । षडुप्रमाणा अव्यक्तु ।।...

0 Response to "सर्वज्ञांची 'सर्वज्ञता.........!' ( धर्म बोध )"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article