-->
निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे - सरपंच अश्विनी लोणारे.

निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे - सरपंच अश्विनी लोणारे.



• खांबी येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत ५० ते ६० विविध प्रजातींच्या रोपांची लागवड.

         युगांतर बारसागडे 
साप्ताहिक "जनता की आवाज" 

अर्जुनी मोर :- पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे रक्षण,पर्यावरणाचा समतोल आणि शुद्ध हवा यासाठी वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. निरोगी व निरामय जीवनासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे. 'झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश अंगीकारून पर्यावरण संवर्धनात प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन खांबीच्या सरपंच अश्विनी घनश्याम लोणारे यांनी केले.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत 'सेवा संकल्प अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांसोबत पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यात येत आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून २१ सप्टेंबर २०२६ रोजी ग्रामपंचायत खांबीच्या वतीने स्थानिक तलावालगतच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सरपंच अश्विनी लोणारे यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात आंबा, गुलमोहर यासह सुमारे ५० ते ६० विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. पर्यावरणाचे संवर्धन,

जैवविविधतेचे संरक्षण तसेच भावी पिढ्यांसाठी हिरवेगार आणि निरोगी वातावरण निर्माण करणे हा वृक्षारोपणाचा प्रमुख उद्देश होता. केवळ रोपे लावणे पुरेसे नसून त्यांचे नियमित संगोपन व संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले' एक व्यक्ती-एक झाड' या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतल्यास पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक होऊ शकते. गाव परिसर हिरवागार करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सातत्याने असे

उपक्रम राबविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमाला सरपंच अश्विनी घनश्याम लोणारे, ग्रामसेवक रोहित मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शुभम बहेकार, रूतन लोणारे, रोजगार सेवक लीलाधर राऊत, राहुल ब्राम्हणकर, मनोज खोटेले, अविनाश उईके, प्रशांत खोटेले, तीर्थराज खोटेले, रजनीकांत खोटेले यांच्यासह ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षारोपण उपक्रमाला प्रतिसाद दिला.

0 Response to "निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे - सरपंच अश्विनी लोणारे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article