पत्नीच्या पुढाकाराने मुलाने वडिलांच्या स्मृतिदिनी केले दानकार्य.
शुक्रवार, 18 सितंबर 2026
Comment
• रामटेके परिवाराचा सामाजिक बांधिलकीचा अनोखा उपक्रम; धान्य, कडधान्य, फळांचे वाटप.
युगांतर बारसागडे
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- तालुक्यातील गोंडसावरी येथील रामटेके परिवाराने स्मृतीशेष सुदामजी रामटेके यांच्या स्मृतिस्मरण दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत अनोखा उपक्रम राबविला. मुलगा विनोद सुदामजी रामटेके, सून प्रतिमा विनोद रामटेके तसेच नातवंड अथर्व व छविल यांच्या सहभागातून हा उपक्रम पार पडला.
प्रतिमा रामटेके यांनी विवाहापूर्वीपासूनच परिवाराची जपणूक, मान-सन्मान आणि स्वाभिमान यांना महत्त्व देत संसारात पतीच्या खांद्याला खांदा लावून परिवाराची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. वनविभागाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सुदामजी रामटेके यांच्या वृद्धापकाळात त्यांची सेवा करण्याची संधीही प्रतिमा यांनी मनापासून स्वीकारली. समाजसेवेची तळमळ मनात असलेल्या प्रतिमा यांच्या पुढाकारातून यंदाचा स्मृतिदिन केवळ औपचारिक न ठेवता समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानुसार भंडारा जिल्ह्यातील बाल उदय केंद्रात गरजूंसाठी धान्य, कडधान्य तसेच विविध प्रकारची फळे देण्यात आली. तसेच भारतीय बौद्ध परिषद, सर्कल कनेरी/द (६० गावे) यांच्या गेटच्या बांधकामासाठी आवश्यक तेवढ्या सिमेंटच्या बॅग देण्याचे आश्वासन रामटेके परिवाराने दिले.
स्मृतिदिनानिमित्त केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत करून रामटेके परिवाराला मंगलकामना दिल्या. भारतीय बौद्ध परिषदेचे सर्कल अध्यक्ष जयेंद्र देशपांडे, सचिव तेजराम नंदागवळी आदी मान्यवरांनी परिवाराचे अभिनंदन केले.
स्मृती जपण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे केवळ आठवणींना उजाळा देणे नव्हे, तर त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ समाजाच्या उपयोगी पडणारे कार्य करणे होय, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. अशाच प्रकारे समाजातील इतरांनीही स्मृतिदिन, जयंती अथवा कौटुंबिक प्रसंग सामाजिक उपक्रमांशी जोडून गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
0 Response to "पत्नीच्या पुढाकाराने मुलाने वडिलांच्या स्मृतिदिनी केले दानकार्य."
एक टिप्पणी भेजें