घरकुल योजनेतील वगळलेली पात्र नावे पुन्हा समाविष्ट करा.
बुधवार, 2 सितंबर 2026
Comment
• अनुदान किमान ३ लाख रुपये व रमाई आवास योजनेचे उद्दिष्ट वाढविण्याचीही मागणी.
अमरावती विभाग विशेष पत्रकार
सदानंद मोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
अकोला/तेल्हारा :- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सर्वेक्षण होऊनही ऑनलाइन यादीतून वगळण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांची नावे पुन्हा यादीमध्ये समाविष्ट करावीत, तसेच विविध कारणांमुळे ऑनलाइन अर्ज करू न शकलेल्या पात्र नागरिकांना विशेष संधी देऊन त्यांची नावे यादीत समाविष्ट करावीत, अशी मागणी ग्राम संवाद सरपंच संघटनेच्या तेल्हारा तालुका अध्यक्ष सौ. मीराताई आनंद बोदडे यांनी प्रधानमंत्री महोदयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गावातील काही पात्र लाभार्थ्यांचे शासनाच्या नियमानुसार सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑनलाइन यादीची पाहणी केली असता काही पात्र लाभार्थ्यांची नावे यादीमध्ये समाविष्ट झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. ऑनलाइन माहिती भरताना किंवा पुढील प्रक्रिया करताना प्रशासकीय अथवा तांत्रिक त्रुटी झाली आहे का, याची सखोल चौकशी करून संबंधित पात्र लाभार्थ्यांची पुनर्तपासणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच, काही पात्र नागरिकांना विविध कारणांमुळे विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करता आलेले नाहीत. केवळ ऑनलाइन अर्ज केला नसल्यामुळे कोणताही पात्र व गरजू नागरिक घरकुलाच्या लाभापासून वंचित राहू नये. अशा नागरिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण व पडताळणी करून त्यांची नावे योजनेच्या यादीत समाविष्ट करण्याची विशेष संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
घरकुल अनुदान किमान तीन लाख रुपये करा
बांधकाम साहित्याच्या किमती आणि मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने सध्याच्या अनुदानात घराचे बांधकाम पूर्ण करणे गरीब व गरजू लाभार्थ्यांना कठीण होत आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलाचे अनुदान वाढवून किमान तीन लाख रुपये करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यापूर्वी शासनाने जाहीर केलेली वाढीव घरकुल अनुदानाची रक्कम ज्या पात्र लाभार्थ्यांना अद्याप मिळालेली नाही, ती तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा करावी. तसेच प्रलंबित व थकीत घरकुलाचे हप्तेही विलंब न करता अदा करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
रमाई आवास योजनेचे उद्दिष्ट वाढवा..
रमाई आवास योजनेअंतर्गत पात्र व गरजू लाभार्थ्यांची संख्या मोठी असून उपलब्ध घरकुलाचे उद्दिष्ट अपुरे असल्याने अनेक पात्र नागरिक लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे तेल्हारा तालुक्यासह ग्रामीण भागासाठी रमाई आवास योजनेचे घरकुलाचे उद्दिष्ट वाढवून द्यावे, तसेच पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण व पडताळणी करून त्यांची नावे यादीत समाविष्ट करावीत, अशी मागणी सौ. मीराताई आनंद बोदडे यांनी केली आहे.
या मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती प्रधानमंत्री महोदयांकडे करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला, जिल्हा प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अकोला आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा यांना देण्यात आल्या आहेत.
0 Response to "घरकुल योजनेतील वगळलेली पात्र नावे पुन्हा समाविष्ट करा."
एक टिप्पणी भेजें