पावसाचा फायदा घेत रात्री हवेत रासायनिक वायू? MPCB कडे तक्रार; चौकशीची मागणी..
शुक्रवार, 18 सितंबर 2026
Comment
• उग्र वासाने नागरिक हैराण, रासायनिक धुक्याने परिसरात भीतीचे वातावरण.
सौनु संजीव क्षेत्रे
साप्ताहिक"जनता की आवाज"
उल्हासनगर :- उल्हासनगर पूर्वेकडील पॅनल क्रमांक १८ मधील भारत नगर, सुभाष टेकडी आणि दहा चाळ परिसरातील नागरिकांना मध्यरात्रीच्या सुमारास हवेत पसरलेल्या उग्र रासायनिक वासाचा त्रास सहन करावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंबरनाथ पश्चिमेकडील MP गेटजवळील Additional MIDC परिसरातील काही रासायनिक कंपन्यांमधून पाऊस पडल्यानंतर रात्रीच्या सुमारास हवेत रासायनिक वायू सोडला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास परिसरात अचानक धुक्यासारखे वातावरण निर्माण झाले आणि हवेत उग्र वास जाणवू लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी नेमके कोणत्या प्रकारचे उत्सर्जन हवेत सोडले जाते, असा सवाल उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे पावसामुळे वातावरणात धुके निर्माण झाल्यानंतर त्याचा फायदा घेत रात्रीच्या वेळी रासायनिक वायू सोडला जातो का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर आरोपांची अधिकृत तपासणी होणे आवश्यक असून, संबंधित कंपन्यांकडून कोणत्या प्रकारचे उत्सर्जन होते याची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), कल्याण तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ई-मेलद्वारे तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीसोबत घटनेचे फोटो आणि व्हिडिओही जोडण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने तक्रारीची दखल घेत ती पुढील कार्यवाहीसाठी कल्याण MPCB कडे पाठवली असल्याचे तक्रारदारांकडून सांगण्यात आले आहे.
आता MPCB प्रशासनाकडून या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित कंपन्यांच्या उत्सर्जनाची तपासणी केली जाणार का? तसेच रात्रीच्या वेळी नियमबाह्य पद्धतीने उत्सर्जन होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
उग्र रासायनिक वासामुळे नागरिक हैराण झाले असून, प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी होत आहे.
0 Response to "पावसाचा फायदा घेत रात्री हवेत रासायनिक वायू? MPCB कडे तक्रार; चौकशीची मागणी.."
एक टिप्पणी भेजें