वाचनालयाच्या भूमिपूजनातून ज्ञानक्रांतीचा संकल्प.
शुक्रवार, 16 अक्टूबर 2026
Comment
• कमलेश भोयर यांच्या प्रबोधनाने विचारांचा जागर..
प्रदीप बि.कडबे
साप्ताहिक "जनता की आवाज"
नागपूर :- जिथे धम्माची ज्योत तेवते, तिथे समतेचा सूर्य उगवतो आणि जिथे ज्ञानाची पायाभरणी होते, तिथे परिवर्तनाच्या नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली जाते. समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी धम्मविचारांचा जागर करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. रमण चौधरी यांनी केले.
बहुउद्देशीय महाकारुणिक महिला संघटना, बुटीबोरी यांच्या वतीने १४ ऑक्टोबर रोजी तथागत गार्डन, लाकूडकर लेआउट येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाचनालयाचे भूमिपूजन करून ज्ञानाच्या नव्या पर्वाचा शुभारंभ करण्यात आला, तर प्रबोधनकार कमलेश भोयर यांच्या विचारप्रवर्तक प्रबोधनाने उपस्थितांच्या मनात परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित केली. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ उत्सव नसून तो अन्याय, विषमता आणि अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर पडण्याचा वैचारिक मार्ग आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मदीक्षेच्या माध्यमातून समता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण, स्वाभिमान आणि समान संधी मिळवून देण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे आवश्यक आहे, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आतिष उमरे, बोथली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अरुण वानखेडे, पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम, डॉ. रमण चौधरी, पत्रकार राजेश पाठक आणि समाजसेवक शरद ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अंगणवाडी सेविका भेलावे मॅडम आणि समाजसेवक गौतम बनसोड यांचा सत्कार ही करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन संघटनेच्या अध्यक्ष वैशाली चव्हाण यांनी केले, तर आभारप्रदर्शन सचिव स्वाती पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता महाकारुनिक बहुउद्देशीय महिला संघटनेच्या लक्ष्मी नारनवरे, उज्वला थुल, शकुंतला शंभरकर, मंदा वंजारी, कुसुम थुल, दिक्षा पिल्लेवान, रिता पिल्लेवान, नीलिमा तामगाडगे, सिंधू भगत, मनीषा वाहने, कल्पना लाहूत्रे व संतकला गेडाम यांनी परिश्रम घेतले.
0 Response to "वाचनालयाच्या भूमिपूजनातून ज्ञानक्रांतीचा संकल्प."
एक टिप्पणी भेजें