-->
कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाची मनपा आयुक्ता समवेत बैठक;

कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाची मनपा आयुक्ता समवेत बैठक;



• आगामी काळातील पाणी पुरवठा नियोजनावर झाली चर्चा
          विजय चौडेकर 
"साप्ताहिक "जनता की आवाज" 

नांदेड :- दि.०१ ऑक्टोंबर  एल-निनोच्या प्रभावामुळे चालू वर्षात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला असून, जिल्ह्यात दुष्काळ जाहिर करण्यात आला आहे त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या गंभीर परिस्थितीची वेळेत दखल घेत, नांदेड शहराचा पाणी पुरवठा या संकट काळात कसा करावा याबाबत पाटबंधारे विभागाने महापालिकेला सतर्क केले आहे.या पार्श्वभुमीवर उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन कसे करता येईल, यासाठी *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोइफोडे* यांनी दि.०१.१०.२०२६ रोजी पालिका मुख्यलयात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत एक तातडीची व महत्त्वाची बैठक घेतली.
एल-निनो प्रभावामुळे यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला असून, आगामी काळात नांदेड शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होऊ नये आणि नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला नांदेड उत्तर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सी.आर.बनसोड, उपअभियंता सतीश चव्हाण, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, शहर अभियंता सुमंत पाटील आणि कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, उपअभियंता प्रकाश कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत प्रामुख्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयामध्ये सद्यस्थितीत ८४.६१ टक्के उपलब्ध पाणीसाठा असुन बाष्पीभवनाचा वेग व मृतसाठा याचा विचार करता सदर पाणीसाठा पुढील ऑगस्ट पर्यंत कसा वापरता येईल यावर सविस्तर चर्चा झाली. तसेच किवळा साठवण तलाव व इसापुर धरणातुन उपलब्ध होणाऱ्या पाणी साठ्ठयावर सुध्दा चर्चा करण्यात आली. त्यानुसार सदरील पाणीसाठ्याचे सुयोग्य नियोजन न केल्यास उन्हाळ्यात शहरात तीव्र पाणीटंचाई होऊ शकते ही बाब पाटबंधारे विभागाने निदर्शनास आणुन दिली.

एल-निनोमुळे पावसाचे प्रमाण घटल्याने आगामी उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू नये, यासाठी मनपा आणि पाटबंधारे विभागाने संयुक्तपणे काम करून पाणी बचतीचा आणि वितरणाचा योग्य आराखडा तयार करावा, असे निर्देश आयुक्त डॉ.महेशकुमार डोइफोडे यांनी दिले. त्याचप्रमाणे पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील व प्रकल्पांमधील पाणीसाठ्याचे वेळोवेळी अचूक मोजमाप करून त्याप्रमाणे पाण्याचे रोटेशन ठरवणे.मुख्य जलवाहिन्यांची होणारी गळती तातडीने रोखणे आणि पाण्याचा अपव्यय किंवा अनधिकृत उपसा करणाऱ्या घटकांना प्रतिबंध करणे आदी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आगामी संकट लक्षात घेता पाणी पुरवठा करण्याचे दिवस वाढविणे, चालु बांधकामे बंद करणे इत्यादी उपाययोजना कराव्या लागु शकतात त्यामुळे नांदेड शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा. पिण्याचे पाणी इतर कामांसाठी वाया घालवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. आगामी काळातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी मनपा आणि पाटबंधारे विभाग पूर्णपणे सज्ज असून, परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे, अशी माहिती मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोइफोडे यांनी यावेळी दिली.

0 Response to "कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाची मनपा आयुक्ता समवेत बैठक;"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article