प्राथ. आरोग्य केंद्र चान्ना बाक्टी येथे सांस अभियानाची जनजागृती.
शनिवार, 14 नवंबर 2026
Comment
युगांतर बारसागडे
साप्ताहिक"जनता की आवाज"
अर्जुनी मोरगाव :- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाक्टी येथे १२ नोव्हेंबर रोजी 'जागतिक न्यूमोनिया दिन' आणि 'सांस अभियान' अंतर्गत विशेष जनजागृती व बालकांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक न्यूमोनिया दिनाचे औचित्य साधून १२ नोव्हेंबर ते फेब्रुवारी २०२७ पर्यंत सदर अभियान राबविण्यात येणार आहे. बालकांमधील न्यूमोनियाचे प्रमाण कमी करणे, न्यूमोनियाची लक्षणे वेळेत ओळखणे, योग्य उपचार उपलब्ध करून देणे आणि बालमृत्यू रोखणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुलकर्णी यांनी यावेळी दिली.
न्यूमोनिया नाही तर बालपण सही' या घोषवाक्याद्वारे पालक, कुटुंबीय आणि समाजातील सर्व घटकांनी बालकांना न्यूमोनियापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. श्वेता कुलकर्णी यांनी यावेळी केले. जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपान सुरू करणे, पहिले सहा महिने केवळ स्तनपान, सहा महिन्यांनंतरपूरक आहार, वेळापत्रकानुसार लसीकरण, जीवनसत्त्व 'अ'ची मात्रा, हातांची स्वच्छता आणि घरातील हवा
प्रदूषणमुक्त ठेवणे याबाबत जनजागृती महत्वाचे असल्याचे डॉ. अपुर्वा चांदेवार यांनी यावेळी माहीती दिली. याप्रसंगी बोलताना वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी उपस्थित पालकांना न्यूमोनिया आजाराची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर उपचार घेण्याचे महत्त्व समजावून सांगितले. ५ वर्षांखालील बालकांमध्ये न्यूमोनियाचे लवकर निदान व्हावे आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी 'सांस' मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन बालकांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच बालकांचे नियमित लसीकरण पूर्ण करणे, स्तनपान आणि स्वच्छता राखणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांची व लहान बालकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात आले. या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुलकर्णी, डॉ. अपुर्वा चांदेवार, आरोग्य सहायिका वंदना भोवते तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र चाना बाक्टी येथील सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "प्राथ. आरोग्य केंद्र चान्ना बाक्टी येथे सांस अभियानाची जनजागृती."
एक टिप्पणी भेजें