जय भीम सोयरे ग्रुपच्या मंगल परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; १५५ पाहुण्यांची उपस्थिती, ९३ बायोडाटा प्राप्त.
शनिवार, 14 नवंबर 2026
Comment
नागपूर विभाग विशेष प्रतिनिधी
प्रदीप कडबे
साप्ताहिक"जनता की आवाज"
नागपूर :- येथे मंगळवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी जय भीम सोयरे ग्रुपच्या वतीने आयोजित मंगल परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यास तब्बल १५५ पाहुण्यांनी उपस्थिती दर्शविली, तर विवाह इच्छुक मुला-मुलींचे एकूण ९३ बायोडाटा प्राप्त झाले.
विशेष म्हणजे, मुलींची उपस्थितीही लक्षणीय होती. कार्यक्रमाचे पहिले सत्र सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत आयोजित करण्यात आले होते. या सत्रासाठी उद्घाटक म्हणून लातूर महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई भालचंद्र सोनकांबळे, अध्यक्ष म्हणून आयु. विलासजी आल्टे सर (समता सैनिक दल), प्रमुख व्याख्याते प्रा.बापूसाहेब गायकवाड (राज्य संघटक, भारतीय बौद्ध महासभा), तसेच अतीष चिकटे, विनय भैया जागते (नगरसेवक) आणि विनोदजी कोल्हे (राज्य संघटक, भीम आर्मी) उपस्थित राहणार होते.
मात्र, दूरवरून येणाऱ्या पाहुण्यांच्या आगमनास विलंब झाल्याने सकाळचे सत्र रद्द करून थेट दुपारच्या सत्राला सुरुवात करण्यात आली. दुपारच्या सत्राच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथे कार्यरत असलेले पी. एस. आय. कल्याण ढोकणे साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून बीड येथे कार्यरत असलेले पीएसआय दयानंद वामन ढोकणे साहेब, मंगलताई भुंबे आणि
उद्योजिका कविता बिभीषण ढगे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बौद्धाचार्य डॉ.बी.आर.ढगे (महावितरण, लातूर) यांनी केले.मेळाव्यात सहभागी झालेल्या ९३ विवाह इच्छुक मुला-मुलींनी एकमेकांसमोर स्वतःचा परिचय करून दिला. उपस्थितांनी एकमेकांचे फोन नंबर व बायोडाटा नोंदवून घेतले, तसेच समोरासमोर संवाद साधून योग्य जोडीदार निवडण्याच्या दृष्टीने एकमेकांना जाणून घेतले. अनेकांनी आपले मनोगतही व्यक्त केले.
या उपक्रमामुळे विवाह इच्छुकांना परिचय आणि संवादासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले. कार्यक्रमातील रुचकर भोजन व्यवस्थेचेही पाहुण्यांनी कौतुक केले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या समाजोपयोगी उपक्रमाचे स्वागत करत जय भीम सोयरे ग्रुपच्या अॅडमिन टीमने असे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली, तर बौद्धाचार्य सुरेश नाना आदमाने साहेब यांनी आभार प्रदर्शन केले. पहिल्याच मंगल परिचय मेळाव्याला मिळालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जय भीम सोयरे ग्रुपच्या अॅडमिन टीमचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवर, पाहुणे आणि सहभागी विवाह इच्छुकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
0 Response to "जय भीम सोयरे ग्रुपच्या मंगल परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; १५५ पाहुण्यांची उपस्थिती, ९३ बायोडाटा प्राप्त."
एक टिप्पणी भेजें