मार्कंडा मंदिर पुनर्बांधणीच्या कामाची खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडून पाहणी
सोमवार, 28 जुलाई 2025
Comment
• संबंधित अधिकाऱ्यांना काम जलद व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना
''साप्ता.जनता की आवाज"
गडचिरोली ::
विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणारे मार्कंडा येथील प्राचीन हेमाडपंथी मंदिर गेल्या अनेक वर्षांपासून जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. तब्बल दहा वर्षांपूर्वी पुरातत्त्व विभागाने मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुरुवात केली होती, मात्र अद्यापही काम पूर्ण झाले नसल्यामुळे परिसरातील भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही बाब गांभीर्याने घेत गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांनी मार्कंडा येथे भेट देऊन मंदिराच्या जीर्णोद्धार कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत कामाच्या धीम्या गतीवर चिंता व्यक्त केली आणि कामास गती देऊन दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
या आधी देखील, डॉ. किरसान यांनी एक वर्षापूर्वी मंदिर परिसरात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काम तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर काही प्रमाणात कामाला सुरुवात झाली होती. मात्र अपेक्षित गती नसल्यामुळे हरनघाटचे श्री मुरलीधर महाराज यांनी या कामाला चालना देण्यासाठी उत्तरवाहिनी वैनगंगा नदीकाठी 108 दिवसांची पदयात्रा सुरू केली आहे. ही परिक्रमा रोज 51 किमी या हिशोबाने मार्कंडा-रामाडा-घारगाव-हरनघाट-उसेगाव-शिरशी- लोंढोली -चिचडोह मार्गे - मार्कंडा होत आहे.
या उपक्रमाची माहिती मिळताच खासदार डॉ. किरसान यांनी श्री मुरलीधर महाराजांची भेट घेऊन त्यांचे अभिप्राय जाणून घेतले, तसेच तातडीने मार्कंडा मंदिर परिसरात जाऊन पुनर्बांधणीच्या कामाची थेट पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यात पुरातत्त्व विभागाचे अधिकारी डॉ. अरुण मलिक, नीरज तिवारी, शुभम कोरे, तसेच नायब तहसीलदार श्री. कावळे उपस्थित होते. यावेळी चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद भगत, नगरपंचायत उपाध्यक्ष लोमेश बुरांडे, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, नगरसेवक सुमेध तुरे, जिल्हा उपाध्यक्ष निकेश गद्देवार, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, तसेच गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, विजय लाड, गौरव येनप्रेड्डीवार, सरपंच संगीताताई मोगरे, माजी सरपंच मुखरु शेंडे, सुरेश बंडावर, मनोज हेजीब, रामू महाराज गायकवाड, राजू मोगरे, अमर मोगरे, वर्षाताई सरपे, प्रेम कोडापे यांच्यासह तलाठी श्री चंदनखेडे, ग्रामसेवक श्री बारशिंगे, महसूल सेवक श्री माणिक कोडापे, प्रफुल बारसागडे, तेजस कोंडेकर आणि अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार डॉ. किरसान यांनी या ऐतिहासिक मंदिराचे जीर्णोद्धार काम लवकरात लवकर पूर्ण होऊन भाविकांना सुविधा मिळाव्यात यासाठी संसदेत सुद्धा यापूर्वी मागणी केली असून यापुढेही आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
0 Response to "मार्कंडा मंदिर पुनर्बांधणीच्या कामाची खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडून पाहणी"
एक टिप्पणी भेजें