
मराठीचा अभिमान बाळगा, पण जबरदस्ती नको – शिवाजी महाराजांचा मार्ग विसरू नका!"
सोमवार, 7 जुलाई 2025
Comment
- "भाषेवर प्रेम हे कृतीतून सिद्ध होऊ दे, मारहाणीतून नव्हे"
दुर्गाप्रसाद घरतकर
डिजिटल मिडिया पत्रकार
नमस्कार मंडळी सध्या महाराष्ट्रात एक घटना चांगलीच गाजत आहे – ठाण्यात एका गुजराती दुकानदाराला केवळ मराठी न बोलल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची ही घटना केवळ एक किरकोळ बातमी नाही – तर ती मराठी अस्मिता, लोकशाहीची मर्यादा, आणि आपल्या सामाजिक शिस्तीच्या मूलभूत प्रश्नांवर बोट ठेवणारी असं मला वाटते.
मराठी ही केवळ एक भाषा नाही, ती महाराष्ट्राची भावना आहे – पण ती भावना जर कोणी दहशतीने लादू पाहत असेल, तर ते चुकीचे आहे तर त्यामागे भाषा टिकवण्याची नाही, तर वर्चस्व गाजवण्याची मानसिकता दिसून येते.
ठाणे जिल्ह्यात एका स्थानिक दुकानात ग्राहकांशी व्यवहार करताना दुकानदार हिंदी किंवा गुजराती भाषेचा वापर करत होता. यावरून काही कार्यकर्त्यांनी त्याला ‘महाराष्ट्रात राहतोस आणि मराठी बोलत नाहीस’ म्हणत मारहाण केली.
हा प्रकार सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला. आणि अर्थातच, राज्यभरातून सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रियां येऊ लागल्या आहेत.
भाषेचा सन्मान दहशतीतून मिळतो का?
या भारत देशात मराठीचा अभिमान बाळगणं हे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे. पण त्या अभिमानासाठी जर कुणावर बळजबरी करावी लागली, तर तो अभिमान नाही – ती हिंसक मानसिकता ठरते.
मराठी ही लोकाभिमुख भाषा आहे. ग्रामीण महाराष्ट्रापासून ते नागरी केंद्रांपर्यंत मराठीचं अस्तित्व सर्वत्र आहे.
पण एखाद्या दुसऱ्या भाषिक व्यक्तीला 'मराठी शिक नाहीतर नको इथे राहूस' असं सांगणं हे संविधानाच्या मूलभूत हक्कांना हादरा देणं आहे.
शिवाजी महाराजांचा मार्ग – भाषेचं नव्हे, माणुसकीचं राज्य!
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ तलवारीच्या जोरावर राज्य करणारे राजा नव्हते, तर समजूतदार, सहिष्णु, आणि दूरदृष्टी असलेले प्रशासक होते.
त्यांच्या दरबारात वेगवेगळ्या भाषेतील लोक, विविध धर्मांचे लोक होते – पण त्यांनी कधीही कोणावर भाषा, जात, धर्म लादला नाही. त्यांनी मराठी भाषा बोलण्यासाठी कधी सामान्य लोकांनवर हिंसेचा प्रकार नाही लादला.
शिवाजी महाराज म्हणायचे
राज्य हे जनतेसाठी असतं, जनतेला त्रास देण्यासाठी नाही.
तेव्हा आपण जर महाराजांना आदर्श मानतो, तर मग त्यांच्या मार्गावरून चालायला हवं शिवाजी महाराजांनी कधीही कोणालाही 'तू मराठी बोल नाहीतर शिक्षा' असं कधीच सांगितलं नव्हतं. त्यांनी महाराष्ट्रात मराठीचं महत्त्व वाढवलं आहे पण ते आदराने, संस्काराने, आणि आचरणाने म्हणून आपण मराठी आहोत तर शिवाजी
इतिहास सांगतोय – भाषा रुजते प्रेमातून
मराठी साहित्याचा इतिहास पाहिला तर तुकोबारायांची अभंगवाणी, ज्ञानेश्वर माउलींचं ज्ञानेश्वरी भाष्य, संत नामदेव, एकनाथ यांची सुलभ मराठी… हे सर्व लोकांनी लोकांसाठी लिहिलं. त्यांनी भाषा लोकांच्या हृदयात उतरवली – भीतीने नाही, भक्तीने.
आज जर आपणच मराठीसाठी हात उचलणार, तर ही भाषा जगेल का मरेल?
मी मराठी पत्रकार दुर्गाप्रसाद घरतकर, एक मराठी माणूस आणि पत्रकार म्हणून हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणत्याही भाषेचा आदर भीतीने नव्हे तर तो प्रेमाने मिळतो.
जर आपण एखाद्या व्यक्तीला प्रेमाने म्हणालो – "इथे मराठी बोलल्याने आमचं समाधान होतं, आमचा सन्मान होतो," – तर तो माणूस आपोआप मराठी शिकेल.
पण जर त्याच्यावर ओरडलो, मारहाण केली, तर तो केवळ मराठीचं नाही, तर महाराष्ट्राचंही नाव खराब करेल.
समाज म्हणून आपली जबाबदारी काय आहे
आज अनेक स्थलांतरित लोक महाराष्ट्रात व्यवसाय किंवा नौकरी करण्यासाठी येतात. आणि मी पाहिले आहे की ते सुद्धा लोक मराठी बोलतात पण त्यांना वेळ लागतो.
त्यांना जर आपण मार्गदर्शन केलं, मदत केली, आणि प्रेम दिलं, तर ते मराठी नक्की शिकणारच.
मराठीसाठी काम करणं हे फक्त घोषणांपुरतं मर्यादित नसावं ते वास्तविक कृतीतून करून दाखवावा लागतो. आपण दुसऱ्याला आदर देऊ ते आपल्याला आदर देतील आपण जर त्यांच्यावर हात टाकू तर ते सुद्धा हात उचलतील.
राजकारणाच्या नावावर भाषेचं राजकारण नको
मनसे, शिवसेना, किंवा कोणताही पक्ष असो – जर भाषेचा वापर केवळ राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी केला जात असेल, तर त्याचा खरा तोटा मराठी भाषेलाच होतो.
कारण मग ती भाषा लोकांना जवळ वाटत नाही – ती लादली गेल्यासारखी वाटते. आपण जर त्यांना आपल्या महाराष्ट्रात जबरदस्ती ने मराठी बोलायला लावले आणि आपण त्यांच्या राज्यात गेलो तर ते आपल्याला त्यांच्या राज्याची भाषा बोलायला लावतील याच्यामध्ये फक्त वादच होईल आणि भाषेची आणि राज्याची बदनामी होईल. म्हणून कोणालाही नुसतं भाषेच्या नांवावर मारणे किंवा भाषेची जबरदस्ती करणे हे मराठी माणसाला योग्य नाही.
मराठी ही आपली ओळख आहे अभिमान आहे. पण तो अभिमान दुसऱ्यांवर लादून नाही, तर त्यांच्या मनात निर्माण करून वाढवावा लागतो.
शिवाजी महाराजांचे अनुकरण करायचे असेल, तर माणुसकी जपा, संवाद साधा, आणि संस्कृती जपा.
एक समाज म्हणून आपणच ठरवायचं आहे – आपण मराठीला भीतीतून जगवणार की प्रेमातून
0 Response to "मराठीचा अभिमान बाळगा, पण जबरदस्ती नको – शिवाजी महाराजांचा मार्ग विसरू नका!" "
एक टिप्पणी भेजें