शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अन्यथा २८ ऑक्टोबरला आंदोलन!
गुरुवार, 4 सितंबर 2025
Comment
माजी आमदार बच्चू कडू यांचा शासनाला इशारा
पालांदुरात जाहीर सभा, सभेला भरगच्च गर्दी
नरेंद्र मेश्राम
"सापताहीक की आवाज"
पालांदूर :- शेतकरी बांधवांनो, जाती- धर्माचे बंधने मोकळे करा. तुम्ही अन्नदाते आहात, स्वतःच्या अस्तित्वाला जागा. पक्षीय गुलामगिरी मोडून काढा. स्वतःच्या हक्काकरिता जागृत रहा. शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अन्यथा २८ ऑक्टोबरला भव्यदिव्य जनआंदोलन उभारणार. असा इशारा माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला.
पालांदूर येथे सातबारा कोरा या मागणीसह १९ मागण्यांची दखल शासनाने घ्यावी व त्याकरिता जनसामान्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार बच्चू कडू यांनी पालांदूर येथील जाहीर सभेतून नागरिकांना केले.
मंचावर ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत, संपर्कप्रमुख संजय देशमुख, जिल्हाप्रमुख अंकुश वंजारी, जिल्हा रुग्णसेवक प्रमुख जयेंद्र देशपांडे, दिव्यांग जिल्हा सचिव योगेंद्र घाटबांधे, शाखाप्रमुख जितेंद्र कुंभरे, जि प सर्कल प्रमुख प्रकाश बांते आदी मान्यवर उपस्थित होते. दामाजी खंडाईत यांनी स्थानिक पालांदूरच्या समस्या मांडल्या. आपला भिडू बच्चू कडू अशा घोषणा देत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
धानाला ३१००₹ दर द्या...
बाप मरो पण नेता जगो, ही धारणा बदलविणे काळाची गरज आहे. लगतच्या छत्तीसगड जिल्ह्यात धानाला ३१००₹ दर मिळतो मात्र विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही आम्हाला २३००₹ पर्यंत धान विकावा लागतो. ७ महिन्यातही धानाचे चुकारे मिळत नाही.विदेशात धानाला मागणी असूनही आमच्या धानाची निर्यात शासन अपेक्षितपणे करीत नाही. त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्याला अल्पभावात शासनाला धान विकण्याची वेळ आली आहे.
ज्येष्ठांना व दिव्यांगाना अल्पशे मानधन...
आमदार खासदारांना महिन्याला लाखोचा मानधन दिला जातो. मात्र आमचा मतदार आमदार- खासदारांना घडवणारा राजा केवळ १५००₹ वर थांबून आहे. शासनाने यावर सकारात्मक विचार करण्याची गरज असून मतदार राजानी सुद्धा विचार करण्याची गरज आहे.
दररोज १२ शेतकऱ्यांच्या हातात आत्महत्या...
शेतकरी या देशाचा आधार असला तरी त्याचा जगण्याचा आधार शासनाने चुकीच्या धोरणामुळे निराधार केला आहे. राज्यात दररोज १२ आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत. शासनाने याकडे सकारात्मकता दाखवून ध्येय धोरणात बदल करण्याची गरज आहे.
हिंदू धोक्यात नसून शेतकरी धोक्यात आहे...
जातीधर्माच्या नावाने एकमेकांना लढवून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बटेंगे तो कटेंगे ची गरज नसून न्याय हक्कासाठी रस्त्यावरील लढाई करण्याची गरज आहे. महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन पेटून उठण्याची नितांत गरज आहे.
आदी विविध विषयावर थेट शासनाच्या धोरणावर टीका करीत वास्तव परिस्थितीला उजागर केले. नागरिकांनी सुद्धा टाळ्यांच्या गजरात त्यांच्या विचाराला (संशोधनाला) दाद दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार जिल्हा रुग्णसेवक जयेंद्र देशपांडे यांनी केले.
फोटो: मंचावर बोलताना बच्चू कडू
0 Response to "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अन्यथा २८ ऑक्टोबरला आंदोलन! "
एक टिप्पणी भेजें