.... लेख...१२ तासांचा कामाचा दिवस : - कामगारहितास प्रतिकूल पाऊल.
बुधवार, 10 सितंबर 2025
Comment
•संकलीत•
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, आठ तासाचं दान,
तेच हिरावून घेणं,हा तर कामगारांचा अपमान,
कामगार आहे माणूस,त्यालाही हक्क हवेत,
राष्ट्रहितासाठी त्याचे जीवनमान जपावेत...
महाराष्ट्र सरकारने राज्यातील कामगारांच्या कामकाजाच्या तासांमध्ये वाढ करून ८ ऐवजी १२ तासांचा दिवस करण्याचा निर्णय अलीकडे जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्याचे कामगारमंत्री श्रीयुत आकाश फुंडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना या निर्णयाची माहिती दिली. वाढीव तासांबद्दल ओव्हरटाईमची तरतूद तसेच अर्धा तास विश्रांतीचा उल्लेख करण्यात आला आहे. तथापि, या निर्णयाचा दीर्घकालीन परिणाम विचारात घेतला असता तो कामगारांच्या हितासाठी नव्हे, तर उद्योगपतींच्या सोयीसाठी जास्त अनुकूल असल्याचे स्पष्ट होते.
भारतीय कामगार कायद्याचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ तासांचा कामाचा दिवस हा मानवी हक्क म्हणून स्थापित केला. त्यांच्या मते कामगार हा केवळ उत्पादनाचे साधन नसून एक सामाजिक अस्तित्व असलेला माणूस आहे. त्याचे शारीरिक आरोग्य, मानसिक संतुलन, कुटुंबीयांशी संवाद आणि सामाजिक आयुष्य यांचा समतोल राखला गेला पाहिजे. हीच त्यांची दूरदृष्टी होती. शासनाचा विद्यमान निर्णय या ऐतिहासिक दृष्टीकोनाला धक्का देणारा व प्रतिकूल ठरतो.
१२ तासांच्या कामकाजाचे परिणाम दूरगामी व घातक ठरू शकतात. दीर्घकाळ शारीरिक श्रमांमुळे थकवा, हृदयविकार, स्नायूंचे आजार व मानसिक ताण वाढण्याची शक्यता अधिक आहे. सामाजिक जीवनाकडे दुर्लक्ष होऊन कुटुंबातील नातेसंबंधांवर दुष्परिणाम होऊ शकतात. मुलांच्या संगोपनात अडथळे येण्याबरोबरच नैराश्य, आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याचा धोका नाकारता येणार नाही. आर्थिक दृष्ट्या काही प्रमाणात ओव्हरटाईमचा लाभ होईल, परंतु त्याच्या बदल्यात कामगारांचे जीवनमान व आरोग्य धोक्यात घालणे हा अन्यायकारक व्यवहारच ठरतो.
लोकशाही व्यवस्थेत शासनाचे प्रमुख दायित्व म्हणजे जनतेचे, विशेषतः श्रमिक वर्गाचे कल्याण साधणे. "जास्त उत्पादन, जास्त नफा" या धोरणाखाली कामगारांवर अन्याय करण्यास समाज मान्यता देऊ शकत नाही. राष्ट्रहिताचा पाया हा आरोग्यदायी, समाधानी आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम कामगारवर्गावरच उभा राहतो, हे विसरून चालणार नाही.
म्हणूनच, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचा सन्मान राखत आणि कामगारांचे जीवनमान सुरक्षित ठेवत सरकारने १२ तासांचा कामाचा दिवस लागू करण्याचा निर्णयावर पुनर्विचार करणे आवश्यक आहे.
सरतेशेवटी असे म्हणावेसे वाटते की,...
बारा तासाचा जाच, आरोग्य धोक्यात येईल,
थकलेला कामगार राष्ट्र कसं उभं करील?
शासनाने ऐकले नाही,तर संघर्ष पेटेल,
कामगारांचा आवाज शेवटी आकाश फाडेल......
•लेखक•
राहुल डोंगरे
"पारस निवास" शिवाजी नगर,
तुमसर. जि. भंडारा
मो. न.9423413826
0 Response to ".... लेख...१२ तासांचा कामाचा दिवस : - कामगारहितास प्रतिकूल पाऊल."
एक टिप्पणी भेजें