समर्थ महाविद्यालयात “जागर स्त्रीशक्तीचा” विशेष कार्यक्रम संपन्न.
शनिवार, 4 अक्टूबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"सापताहीक जनता की आवाज"
लाखनी :- समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक विभाग व महिला तक्रार निवारण समितीद्वारे “जागर स्त्रीशक्तीचा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महाविद्यालयातील नऊ महिला प्राध्यापकांनी विविध विषयांवर आपले विचार मांडून स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रा. एकता जाधव यांनी छत्तीसगड, बस्तर येथील दंतेश्वरी देवीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले. डॉ. स्मिता गजभिये यांनी आपल्या मनोगतातून स्त्री-पुरुष समानतेवर भाष्य करत स्त्रीशक्तीविषयक अभंग सादर केला. प्रा. मनिषा मदनकर आणि प्रा. पूजा नवखरे यांनी विषयानुरूप मते व्यक्त केली.
“ज्या घरात स्त्रीला सन्मान मिळतो त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वतीचा वावर असतो,” असे प्रा. रूपाली खेडीकर यांनी नमूद केले. प्रा. बावनकुळे यांनी पद्मश्री हिंदुजा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, तर प्रा. गोंदुळे व प्रा. मालन सरोदे यांनी स्त्रीशक्तीच्या जागरावर विचार मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या डॉ. सुनंदा देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात “स्त्री या शब्दात प्रेम, करूणा, त्याग आणि अतूट शक्ती दडलेली आहे. ती आजी, आई, बहीण, प्राध्यापिका, डॉक्टर, अधिकारी या सर्व रूपांत समाजाला दिशा देते. स्त्री सक्षम झाली तर कुटुंब, समाज आणि देश प्रगत होतो,” असे प्रतिपादन केले. तसेच, “जागर म्हणजे मुलींना शिक्षण, मतप्रदर्शनाचा अधिकार व त्या मताचा सन्मान” असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे यांचे लाभले. आपल्या समारोपीय भाषणात त्यांनी “देवता मूर्तींतील अनेक हात हे स्त्रीच्या बहुगुणी व बहुप्रतिभावान कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. स्त्री पुरुषांपेक्षा अधिक कार्यक्षमतेने अनेक कामे एकाच वेळी पार पाडते,” असे सांगितले.
यावेळी महिला प्राध्यापिका व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संगीता हाडगे यांनी केले, संचालन प्रा. आस्था चेटुले यांनी केले तर आभार प्रा. नेहा वंजारी यांनी मानले.
0 Response to "समर्थ महाविद्यालयात “जागर स्त्रीशक्तीचा” विशेष कार्यक्रम संपन्न."
एक टिप्पणी भेजें