-->

Happy Diwali

Happy Diwali
आंबेडकरी चळवळीसमोरील आव्हाने आणि उपाय...संकलन हर्षवर्धन देशभ्रतार.

आंबेडकरी चळवळीसमोरील आव्हाने आणि उपाय...संकलन हर्षवर्धन देशभ्रतार.

.                                         प्रभाकर सोमकुवर
                                                नागपूर
                                  भ्रमणध्वनी: ९५९५२५५९५२

          *बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ*

बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही मुख्यत :- समाजवादी समाज निर्मिण्याच्या स्वप्नाची प्रेरणा देणारी एक सामाजिक चळवळ होती. दलितांच्या राजकिय चळवळीनी विचारवंतांना लक्ष देणे भाग पाडले आहे. डॉ. बाबासाहेबांनी विविधांगी जीवनांत मिळाले त्याचे मिळेल तेवढे, मिळेल तेव्हा सहकार्य सर्वांचे घेतले. पण त्यांच्या आणि त्यापैकी प्रत्येकांच्या मर्यादांची तीव्र जाणीव त्यांना सतत होती-बोचत होती आणि म्हणूनच डॉ. आंबेडकर कोणाचे झाले नाहीत, ते आपण आपलेच एकटेच... म्हणजे शुद्र-अतिशुद्रांचेच राहिले आणि त्याबद्दचा कडवा अभिमान त्यांनी दिमाखाने सतत जन्मभर मिरविला! महात्मा फुल्यांकडुन त्यांनी स्फुर्ती घेतली. आच घेतली. पण परिस्थितीनुसार मार्ग मात्र त्यांचा त्यांनाच शोधून काढावा लागला. अक्षरक्षः काट्याकुट्यातून, खाच-खळग्यांतून, चढ-उतारातून, डोंगर-दऱ्यातून, नदी-नाल्यातून, वाऱ्या-वादळातून, पाण्या-पावसातून, रखरखत्या भयाण एकाकी वाळवंटातून ही वाट त्यांनी खोदून-खणून काढली आणि कोटयावधी अनुयायांनाही त्यांनी त्या वाटेने अक्षरक्षः बांधून, धरून-ओढून कधी कधी फरफटत सुध्दा नेले. डॉ. बाबासाहेबांना सतत चटके बसत राहिले आणि त्यांनीही सतत सगळ्यांना चटके दिले. बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन हा एक चिरंतन संघर्ष होता.

                          प्रभाकर सोमकुवर 
 संघर्ष आणि समन्वय हे त्यांच्या चळवळीचे प्रमुख सुत्र होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमध्ये एक जाणीव मात्र रोकडया खडतर अनुभवामुळे सतत सलत राहिली-ती म्हणजे शुद्र-अतिशूद्राची (जी फक्त सर्वार्थाने त्याची त्यालाच जाणवते, इतरांची जाणीव - सहानुभूती कदाचित खरी असली तरी तिच्या मर्यादाच जास्त खऱ्या असतात. अगदी हार्दिक म्हटली तरी ती सहनुभूती खरोखर बरीचशी काल्पनिक किंवा उसनीच असते) हा अनुभव फार कडवट आहे. ही जाणीव फार भयंकर आहे, पण सत्यच तसे आहे, वस्तुस्थितीच तशी आहे. म्हणून डॉ. आंबेडकरांनी शुद्र-अतिशूद्रामध्ये धगधगता स्वाभिमान जागविला. त्यांना स्वावलंबनाची कठोर दीक्षा दिली. इतरांची खरीखुरी सहानुभुती असली तर तिचा त्यांनी मनोमन आदर केला, पण उपकाराच्या, उध्दाराच्या भाषेचा त्यांनी त्वेषाने सतत धिक्कार केला. पापाचे प्रायश्चित घेण्याच्या भाषेचाही त्यांनी तिरस्कार केला. डॉ. बाबासाहेबांना वैयक्तिक कटु अनुभवाचे जहर क्षणोक्षणी कंठी धारण करावे लागले होते आणि ते जहर केवळ वैयक्तिक नव्हते तर हजारो वर्षे कोटी कोटी स्त्री-पुरूषांनी कंठी बाळगलेल्या-पचविलेल्या विषाचा तो अर्कातला, कटुतम अर्क होता.

 त्यांची व्यथा केवळ एका व्यक्तिची नव्हती, कोटी कोटी दलित मानवतेची होती. म्हणुनच त्यांचा त्वेष-द्वेष वैयक्तिक नव्हता, तर जन्मजात विषमते विरूध्द होता, पदोपदी-क्षणोक्षणी होणाऱ्या विषमतेच्या विविध विषारी अविष्काराविरूध्द होता. तो धगधगता ज्वालामुखी होता. धर्मांतराच्या चळवळीत हा संघर्षाचा विचार आधिक प्रखर झालेला आहे.डॉ. बाबासाहेबांच्या उदयामुळे अस्पृष्य वर्गात जी जागृती झाली, स्वाभिमानी-स्वावलंबी आंदोलनाची जी लाट उसळली, त्यामध्ये विशेषतः महार समाज आघाडीला होता. महार समाज आघाडीवर इतर अस्पृष्यांच्या मानाने अधिक जागृत, पुढारलेला, लढाऊ, संघटीत, त्यातच त्यांच्यातून डॉ. आंबेडकरांसारखा लोकोत्तर नेता निर्माण झालेला ! त्यामुळे स्वाभाविकपणेच त्या समाजात एक प्रकारचे परिवर्तन घडुन आले. ती केवळ जागृती नव्हती, तर ते एक उधाण होते, तुफान होते. एकूण समाजाचा कायापालट घडवून आणणारे ते एक क्रांतीकारक परिवर्तनच होते. त्याची व्याप्ती, वेग, तेज यांचा खरे म्हणजे, कोणालाच यथायोग्य अंदाज आला नाही. कोणालाच ते पेलले नाही. तेव्हाच नव्हे, तर आज-आतासुध्दा.

रिपब्लिकन पक्ष म्हणजे एक पुरोगामी डावा पक्ष व्हावा, शुद्र-अतिषुद्र दलित शोषित, श्रमिकांच्या हिताच्या दृष्टीने कणखर लढाऊ, एकजुटीच्या आंदोलनाचे एक प्रभावी हत्यार त्याने बनावे, अशी त्यांची आंतरिक अपेक्षा होती. पण दुर्देवाने एकाचे दोन, दोनाचे तीन, तीनांची एकजूट करण्यासाठी आणखी नवा एक असे करता करता पक्षाचे तुकडे छिन्न विछिन्न झाले. पुढाऱ्यांगणिक गट, गटागणिक विशिष्ट हितसंबंध आणि त्यासाठी सौदेबाजी असे प्रकार सुरू झाले. काँग्रेसच्या उच्चवर्णीय-वर्गीय भ्रष्टाचारी राजवटीशी कसंही करून सोयरिक जमविण्याच्या प्रयत्नात रिपब्लिकन पक्ष डॉ. आंबेडकरांची तेजस्वी शिकवण, स्वाभिमानी परंपरा, स्वतंत्र, लढाऊ अस्तित्व, उज्जवल ध्येयवाद सर्वच गमावून बसलेत. लक्षावधी निष्ठावंत लढावू अनुयायांना वाऱ्यावर सोडून लहान-मोठी सर्वच पुढारी मंडळी सर्रास बाजारात बसली. त्याला अपवाद म्हणून जवळ जवळ एकही पुढारी मागे राहिला नाही. काँग्रेसपासून भाजपा-शिवसेनेपर्यंत कोणाशीही, कशासाठीही, केव्हाही लागेबांधे जमवायला सारेच तयार, असा अनवस्था प्रसंग निर्माण झाला. वर्षानुवर्षे एकीचे प्रयत्न होत राहिले आणि विविध कारणांनी चौफेर विघटन वाढतच चालली आहे. त्यामुळे एकोपा होणे कदापी शक्य नाही, तडजोड तर नाहीच नाही.

सामाजिक समतेचे लढे, आर्थिक मागण्यांचे लढे, वर्गलढे याचा साधा विचार करायलाही कोणाला फारशी फुरसत मिळेनाशी झाली. या सर्वांची लज्जास्पद परिणीती म्हणजे डॉ. बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षातील व बौध्दजनांतील कार्यकर्ते चार्तुवर्णवादी भाजपात किवा हिंदु फॅसिस्ट शिवसेनेमध्ये सुध्दा खुशाल दिसु लागले आणि त्यांचे मतदार तर कोठेही कोणाच्याही दारात द्वारपाल म्हणून चाकरी करताहेत, अशी दुरावस्था पक्षाची सत्ताधाऱ्या व उच्चवर्णीयांकडुन आणि त्यातूनही दुर्देव म्हणजे संधीसाधु पुढाऱ्यांकडुनही होत आहे आणि हे अव्याहत सुरूच राहणार आहे, बेदरकारपणे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा आपले व्यक्तिगत हेतू साध्य करण्यासाठी जाणीवपूर्वक उपयोग करून घेतलेल्या त्याचे अनेक दुष्परिणाम दलिचळवळींना भोगावे लागलेत, तसेच त्यामुळे उद्याच्या समग्र परिवर्तन मागणाऱ्या चळवळीही विकलांग झाल्यातच जमा आहेत. हे नाकारून चालणार नाही, त्याची बोच आज सर्वांना जाणवत आहे. बाबासाहेब केवळ एक तत्वज्ञ नव्हते तर त्यांना भारतात प्रत्यक्ष सामाजिक, राजकिय व सांस्कृतिक चळवळी कराव्या लागल्या आणि त्यासाठी त्यांचा बहुतेक वेळ या चळवळीचे एकमेव नेते या अर्थाने व्यतीत झाला.उपाव ! समाजाच्या वैशिष्टयांपैकी सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणजे सुशिक्षित वर्गाची पराकोटीला गेलेली स्वार्थीवृत्ती, आपआपसातील मतभेद व एकीमेकांबद्दलची द्वेषभावना. सुशिक्षित लोकांनी निदान आपल्या भावी पिढीसाठी आपल्या समाजाचा मागील इतिहास विसरून चालणार नाही. कारण आपण आपल्या समाजाचा मागील इतिहास विरसलो तर आपण आपल्या समाजाची प्रगतीच करू शकणार नाही. तेव्हा सुशिक्षित बांधवांनी ही जाणीव ठेवावी की, आपल्याला जे वैभव लाभले आहे. ते केवळ डॉ. बाबासाहेबांच्या अथक परिश्रमामुळे... त्यांच्या पुण्याईनेच. एवढा तरी त्यांनी आपल्या मनात सदैव कृतज्ञतेचा भाव ठेवून इतरांना सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक बाबतीत प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करण्यासाठी मदत करावी. त्यामुळे त्यांचे कल्याण होईल, त्यांची सर्वांगीण प्रगतीही होईल इतकेच नव्हे तर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या उच्चतम नैतिक मूल्यांवर आधारलेल्या एका उच्चतम मानवी संस्कृतीचा उदय होईल.

0 Response to "आंबेडकरी चळवळीसमोरील आव्हाने आणि उपाय...संकलन हर्षवर्धन देशभ्रतार. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article